गोडपणाची कडू किंमत

    06-Oct-2026

Sugary Drinks and Cancer Risk
 
उन्हाळ्यात अपेक्षित थंडावा, जेवणानंतरची सवय किंवा कामाच्या धावपळीत मिळणार्‍या तात्पुरत्या उत्साहामुळे, गोड पेयांचे सेवन वाढत आहे. त्यातील साखरेचे प्रमाण डोळ्यांना दिसत नसल्याने, एकावेळी किती साखर शरीरात जाते, याचा अंदाजही अनेकदा आपल्याला येत नाही. घरच्या आहारात साखर कमी ठेवण्याची काळजी घेणारी व्यक्तीही, तयार पेयांच्या माध्यमातून नकळत अतिरिक्त साखर सेवन करतच असते. त्यामुळे या गोड पेयांमागे लपलेल्या आरोग्याच्या मोठ्या प्रश्नाचा आढावा घेणारा हा लेख...
 
गोड पेये पिताना जिभेला जाणवणारी गोड चव काही क्षणांचीच असते; मात्र नंतर शरीरात सुरू होणार्‍या प्रक्रिया दीर्घ काळ चालू राहतात. शीतपेये किंवा साखर घातलेली इतर पेये यांचे नियमित सेवन स्थूलता आणि मधुमेहासाठी कारणीभूत ठरू शकते, हे आता नवीन नाही. मात्र, अशा पेयांमुळे जठराच्या कर्करोगाचा धोकाही वाढत असल्याचे अलीकडील एका संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे शरीरात साखर गेल्यानंतर चयापचयाच्या पातळीवर नेमके काय घडते, हे समजून घेणे आवश्यक ठरते.
 
साखरयुक्त पेयांमध्ये मोठ्या प्रमाणात साधीच साखर असते. त्यातील ग्लुकोज आणि फ्रुटोज शरीरात वेगवेगळ्या प्रकारे हाताळले जातात. ग्लुकोज रक्तात गेल्यानंतर इन्सुलिनच्या मदतीने पेशींमध्ये पोहोचते. मात्र, अशा पेयांचे सेवन वारंवार होत राहिल्यास, शरीराला सतत मोठ्या प्रमाणात साखरेचा सामना करावा लागतो. कालांतराने ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ निर्माण होण्याची शक्यताही वाढते. म्हणजेच, रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचवण्यासाठी शरीराला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते. यामुळे वजन वाढणे, चयापचयातील बिघाड आणि शरीरातील दीर्घकालीन दाह या समस्या उद्भवतात.
 
फ्रुक्टोजच्या बाबतीत यंत्रणा आणखीच वेगळी आहे. त्याचे चयापचय प्रामुख्याने यकृतात होते. अधिक प्रमाणात फ्रुटोज शरीरात गेल्यास, यकृतातील चरबीचे प्रमाण वाढणे, चयापचयातील असंतुलन अशा बदलांना चालना मिळते. याचा पेशींच्या सामान्य कार्यावरही परिणाम होतो. पेशींची वाढ, त्यांची दुरुस्ती आणि अनियंत्रित वाढ रोखण्याच्या यंत्रणेत बिघाड झाल्यास, कर्करोगाच्या निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
जठराचे आतील अस्तरही महत्त्वाचेच. अन्नाशी सतत संपर्कात असणार्‍या या आवरणावर आम्ल, पित्त आणि विविध रासायनिक घटकांचा परिणाम होतो. जठरातील दीर्घकालीन दाहामुळे पेशींचे वारंवार नुकसान आणि दुरुस्तीची प्रक्रिया सुरू राहते. या प्रक्रियेत पेशींच्या अनुवांशिक पातळीवर बदल होण्याचीही शयता असते. त्यात इतर जोखमीचे घटक सहभागी झाल्यास, कर्करोगाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वाढते.
 
अभ्यासातील निरीक्षण असेही आहे की, दररोज किमान एक साखरयुक्त पेय घेणार्‍यांमध्ये महिन्यातून एकदा किंवा अत्यल्प प्रमाणात अशी पेये घेणार्‍यांच्या तुलनेत, जठराच्या कर्करोगाचा धोका अधिक होता. याचबरोबर, आहार, शरीराचे वजन, शारीरिक हालचाल, धूम्रपान, इतर आहारविषयक सवयी आणि अनुवांशिक घटक अशा अनेक बाबीही कर्करोगाच्या धोयावर परिणाम करू शकतात.
 
त्यामुळे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तहान भागवण्यासाठी पाणी उपलब्ध असताना, रोजच्या आहारात साखरयुक्त पेयांचा समावेश करण्याची आवश्यकताच नसते. साखरयुक्त पेय कमी केल्याने, शरीरावरचा अतिरिक्त साखरेचा आणि चयापचयाचा भार नक्कीच कमी करता येतो. कर्करोगासारख्या बहुकारणी आजारात प्रतिबंधाचा अर्थ एखाद्या एका कारणापासून दूर राहणेच नसून, अनेक जोखमी एकाचवेळी कमी करणे, हाच असतो. गोड पेयांबाबतचा हा निष्कर्ष त्याच व्यापक प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून पाहणे अधिक योग्य ठरेल.
 




संबंधित मजकूर