मुंबई (Ohio Hindu Temple Attack) : अमेरिकेतील हिंदू मंदिरांवर सातत्याने होत असलेले हल्ले आणि तोडफोड आता सामान्य 'व्हॅंडलिझम' (गुंडगिरी) म्हणून दुर्लक्षित करता येणार नाहीत, असा थेट आणि आक्रमक इशारा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी दिला आहे. ओहायो राज्यातील रिचमंड हाइट्स येथील श्री स्वामीनारायण वडतालधाम मंदिरावर २ ऑक्टोबर रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्हीएचपीने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. (Ohio Hindu Temple Attack)
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला झाला तेव्हा मंदिरात पुजारी आणि अनेक भाविक उपस्थित होते. अशा धार्मिक वातावरणात अचानक मंदिरावर विटा फेकण्यात आल्या, ज्यामध्ये मंदिराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून, तपासासाठी ते उपलब्ध आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक प्रशासन या अत्यंत गंभीर संवेदनशील मुद्द्यावर पूर्णपणे मौन बाळगून आहे. (Ohio Hindu Temple Attack)
या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना विनोद बंसल म्हणाले की, जगाच्या कोणत्याही भागात हिंदू समाज आपल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पूजा स्थळांवर होणारे हल्ले गप्प बसून कधीही सहन करणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेत हिंदू असुरक्षित असणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. (Ohio Hindu Temple Attack)
अमेरिकेत हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही हिंदू समाज आणि त्यांच्या श्रद्धास्थानांवर सातत्याने पद्धतशीरपणे हल्ले करण्यात आले आहेत. सातत्याने होणाऱ्या छळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विनोद बंसल यांनी अमेरिकी यंत्रणेचे वाभाडे काढले. हिंदू मंदिरांना वारंवार लक्ष्य केले जात असतानाही अमेरिका अखेर कधी जागे होणार? भारतात काही घडल्यास लगेच ढोंग करणारे आणि नेहमी भारतविरोधी खोटे कथानक मांडणारे युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम या हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या विदारक सत्याबाबत कधी तोंड उघडणार का? अमेरिकेत मुक्तपणे द्वेष पसरवणाऱ्या हिंदुद्वेष्ट्यांवर आणि धार्मिक हल्लेखोरांवर निष्पक्ष चौकशी करून कारवाई, दोषींची अटक आणि मंदिरांच्या सुरक्षेसाठी ठोस प्रोटोकॉल अखेर कधी लागू होणार? असे थेट सवाल त्यांनी केले आहेत. (Ohio Hindu Temple Attack)
अमेरिकी प्रशासनाने हिंदू मंदिरांच्या आणि तिथे जाणाऱ्या हिंदू नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. अशा कट्टरतावादी घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी बायडेन प्रशासनाने तात्काळ ठोस आणि कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जोर धरू लागली आहे. (Ohio Hindu Temple Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक