कसारा रेल्वे ब्लॉकदरम्यान एसटीचा आधार

आसनगावपर्यंत विशेष बससेवा; प्रवाशांची गर्दी वाढल्यास अतिरिक्त बस सोडणार

    06-Oct-2026
 
Kasara Rail Block
 
ठाणे: आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेने ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केल्याने कसारा मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे सेवा खंडित होणाऱ्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने नाशिक-असनगाव मार्गावर विशेष बससेवा चालवण्याचे नियोजन केले आहे. (Kasara Rail Block)
 
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ या वेळेत आसनगाव-कसारा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे कसारा, खर्डी, उंबरमाळी, आटगाव परिसरातील प्रवाशांसमोर पर्यायी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिकहून आसनगावपर्यंत तसेच आसनगावहून नाशिकच्या दिशेने विशेष एसटी बस चालवण्यात येणार आहेत. सध्या कसारा-नाशिकदरम्यान धावणाऱ्या बसगाड्यांचे नियोजन बदलून त्या ब्लॉकच्या वेळेत आसनगावपर्यंत चालवण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यास अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Kasara Rail Block)
 
रेल्वे बंद, एसटी सुरू
 
रेल्वे ब्लॉकच्या काळात आसनगाव-कसारा रेल्वे संपर्क तुटणार असल्याने नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आणि नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना या बससेवेचा आधार मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर लोकल फेऱ्यांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. सीएसएमटीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या काही लोकल आसनगाव येथेच थांबवण्यात येणार आहेत. (Kasara Rail Block)
 
गरजेनुसार बस वाढणार
 
ब्लॉकच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त एसटी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वेने आसनगावपर्यंत आणून सोडलेल्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी एसटीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान संपूर्ण ब्लॉकचा कालावधी असला तरी ७ ते ९ ऑक्टोबर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे वाहतुकीवरील परिणाम जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित दिवसांच्या ब्लॉकचा तपशील मध्य रेल्वेकडून टप्प्याटप्प्याने जाहीर केला जाणार आहे. (Kasara Rail Block)
 
 




संबंधित मजकूर