सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मानवी तस्करी प्रतिबंधाबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

    06-Oct-2026
 
   
Human Trafficking Prevention
 
मुंबई (Human Trafficking Prevention): संकल्प संस्था, मुंबई स्माईल्स आणि सारथी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथील पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयात मानवी तस्करी : कारणे, परिणाम, प्रतिबंध, सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका आणि समुपदेशन या विषयावर एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
 
या कार्यशाळेत ३५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. कार्यशाळेचे आयोजन संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई स्माईल्सचे संस्थापक जौमे सान्लोरेन्टे उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयन सविता हेंडवे आणि सुवर्णा सोरटे यांनी केले, तर मुंबई स्माईल्सचे समन्वयक विकास गायकवाड यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले. (Human Trafficking Prevention)
 
कार्यशाळेत मानवी तस्करी म्हणजे काय?, तिची कारणे व परिणाम, तस्करीचे विविध प्रकार, बालक व महिलांच्या तस्करीची जोखीम, प्रतिबंधात्मक उपाययोजना, संबंधित कायदेशीर तरतुदी, पीडित व्यक्तींशी संवेदनशीलतेने संवाद साधणे, प्राथमिक समुपदेशन, पीडितांना आवश्यक मदत उपलब्ध करून देणे, पुनर्वसन आणि समाजात पुनर्समावेशन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. (Human Trafficking Prevention)
 
मानवी तस्करी प्रतिबंध, पीडित सहाय्य व पुनर्वसनामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर विनोद हिवाळे यांनी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्त्यांनी केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता पीडित व्यक्तींना योग्य शासकीय व कायदेशीर यंत्रणेशी जोडणे, समुपदेशन व पुनर्वसनासाठी सहकार्य करणे आणि समुदाय पातळीवर प्रतिबंधात्मक काम उभे करणे आवश्यक असल्याचे सांगितले.कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी चर्चासत्रे, प्रश्नोत्तरे आणि अनुभव मांडणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला. काही प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाबाबत आपले मनोगत व्यक्त केले आणि या विषयावर पुढे काम करण्याची तयारी दर्शविली. (Human Trafficking Prevention)
 
 




संबंधित मजकूर