‘जेन-झी’:आळशी, हट्टी की गैरसमजांची शिकार?

    06-Oct-2026

Gen Z Generation
 
‘जेन-झी’ हा सध्याचा सर्वांत चर्चेतील शब्द! या पिढीभोवतीच हे वर्ष फिरत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजमितीला प्रत्येक घरात ‘जेन-झी’ असल्याने, पालकांसमोरील संगोपनाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी या सातत्याने ऐकू येतात. याच पार्श्वभूमीवर ‘जेन-झी’विषयीच्या वाढलेल्या तक्रारी आणि त्यांच्याविषयीच्या आदर्श दृष्टिकोनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
आजच्या तरुणांकडे पाहताना अनेकदा काही ठरावीक प्रतिक्रियाच ऐकू येत आहेत. त्यात ‘आजच्या मुलांना कष्ट करायचे नाहीत’, ‘थोडेसे अपयश आले, तरी ते खचतात’ अशा प्रतिक्रिया, पालकांबरोबरच, शिक्षक आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींही व्यक्त करतात. पण, खरेच आजची तरुण पिढी अधिक आळशी, अधीर आणि आत्मकेंद्रित झाली आहे का? की, आपण तिच्याकडे जुन्याच निकषांतून पाहत आहोत?
 
‘जेन-झी’ पिढी वेगळ्या सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक वातावरणात वाढली आहे. इंटरनेट, स्मार्टफोन, समाज माध्यम, वेगाने बदलणारे रोजगारविश्व आणि मानसिक स्वास्थ्याविषयीची जागरूकतेने, तिच्या विचारांवर आणि अपेक्षांवर प्रभाव टाकला. त्यामुळे तिच्या वर्तनाचा अर्थ लावताना केवळ पूर्वीच्या पिढीशी तुलना करणे, पुरेसे नाही. तरुणांचे वर्तन समजण्यासाठी त्यांच्यासमोरचे विश्वही समजून घ्यावे लागेल.
 
‘जेन-झी’ची प्रत्यक्षात कष्ट करण्याची तयारी कमी झाली आहे की, कष्टांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, हा प्रश्न महत्त्वाचा. पूर्वी नोकरीतील स्थैर्य आणि दीर्घ काळ एकाच संस्थेत काम करणे यशाचे निकष होते; आजच्या तरुणांसाठी कामातील समाधान, योग्य मोबदला, शिकण्याच्या संधी, वैयक्तिक आयुष्य आणि मानसिक स्वास्थ्यही तितकेच महत्त्वाचे आहेत.
 
प्रत्येक पिढीत जबाबदारी टाळणारे आणि मनापासून काम करणारे दोन्ही प्रकारचे लोक असतातच. मात्र, आजचा तरुण कामाच्या ठिकाणी प्रश्न विचारतो की, ‘हे काम का करायचे?’ किंवा ‘या कामाच्या तुलनेत मिळणारा मोबदला आणि वेळ योग्य आहे का?’ वरिष्ठांना हे प्रश्न अवज्ञा वाटूच शकतात; पण ते नेहमी आळशीपणाचे लक्षण नसतात. तर स्वतःच्या कामाची, अपेक्षांची आणि हक्कांची जाणीवही यात असू शकते. तरीही प्रत्येक अडचण म्हणजे अन्याय आणि केवळ आवडीचेच काम करणे म्हणजे स्वातंत्र्य, असा दृष्टिकोनही व्यवहार्य नाही. प्रगतीसाठी सातत्य, संयम, अप्रिय जबाबदार्‍या स्वीकारण्याची तयारी आणि तात्पुरते असमाधान सहन करण्याची क्षमताही आवश्यक असते. त्यामुळे ‘जेन-झी’समोरचे आव्हान केवळ जुन्या पिढीने तिला समजून घेण्याचेच नाही; तर अपेक्षा आणि जबाबदार्‍या यांचा योग्य समतोल साधण्याचेही आहे.
 
अधीरपणा की वेगाची सवय?
 
डिजिटल जगात वाढलेल्या या पिढीसाठी माहिती, मनोरंजन आणि संवाद काही सेकंदांत उपलब्ध होतो. या सगळ्यांची सवय वेगाशी जोडलेली आहे. अशा वातावरणात प्रतीक्षा करणे, एखादे कौशल्य आत्मसात करण्यासाठी दीर्घ काळ सराव करणे किंवा प्रयत्नांचे फळ उशिरा मिळणे, हे अधिकच कठीण वाटते. मात्र, तंत्रज्ञानामुळे प्रत्येक तरुण अधीर झाला आहे, असा निष्कर्षही यातून काढता येणार नाही. डिजिटल माध्यमांचा वापर कसा होतो; व्यक्तीला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे किती प्रशिक्षण मिळाले आहे आणि तिच्या आयुष्यात ताण किती आहे, या गोष्टीही महत्त्वाच्याच असतात. तत्काळ प्रतिसाद मिळण्याची सवय आणि दीर्घकालीन उद्दिष्टासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याची क्षमता यांच्यात संतुलन साधणे, हीच आजच्या काळातील महत्त्वाची मानसिक गरज आहे.
 
टीका सहन होत नाही की, भावनिक मान्यतेची गरज वाढली आहे?
 
‘आजची मुले थोडेसे बोलले तरी मनाला लावून घेतात,’ अशी तक्रार सर्रास केली जाते. काही तरुणांमध्ये टीका किंवा अपयश स्वीकारण्याची क्षमता कमी असूच शकते; पण प्रत्येक भावनिक प्रतिक्रिया ही दुर्बलतेची लक्षण नाही. मानसिक आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे आजचे तरुण ताण, चिंता, भावनिक थकवा आणि वैयक्तिक मर्यादांबद्दल अधिक मोकळेपणाने बोलतात. याचा अर्थ ते अधिक नाजूक आहेत असे नाही; त्यांच्याकडे भावना व्यक्त करण्याची क्षमता अधिक आहे.
मात्र, भावनिक जागरूकता म्हणजेच प्रत्येक अस्वस्थ अनुभवापासून दूर राहणे नव्हे. नकार, अपयश, मतभेद आणि टीका यांना सामोरे जाताना भावना ओळखणे, त्यांचे नियमन करणे आणि त्यातून शिकणे, हीच खरी भावनिक परिपक्वता ठरते. त्यामुळे तरुणांना केवळ ‘मजबूत व्हा,’ म्हणण्यापेक्षा टीका स्वीकारणे, निराशेतून सावरणे आणि गरज पडल्यास मदत मागण्याविषयी शिकवणेही अधिक महत्त्वाचे आहे.
 
स्वातंत्र्य हवे, पण जबाबदारीचे काय?
 
स्वतःचे निर्णय घेण्याची इच्छा, ही व्यक्तिमत्त्व विकासाचा स्वाभाविक भाग आहे. ‘जेन-झी’ करिअर, नातेसंबंध आणि जीवनशैलीबाबत स्वतःच्या निवडींना महत्त्व देते. पण, स्वातंत्र्य म्हणजे केवळ निवडीचा अधिकार नव्हे; त्या निवडीची जबाबदारीही स्वीकारणे.पालकांनी प्रत्येक निर्णय लादणे आणि तरुणांनी प्रत्येक निर्णयात केवळ स्वतःचेच म्हणणे योग्य मानणे, दोन्ही टोकाचेच. तरुणांना निर्णय स्वातंत्र्य, चुकांतून शिकण्याची संधी आणि आवश्यक मर्यादा देतानाच, स्वातंत्र्यासोबत शिस्त, बांधिलकी आणि इतरांच्या गरजांचाही विचार शिकवणे गरजेचे आहे.
 
पिढ्यांमधील अंतर कमी कसे करायचे?
 
प्रत्येक पिढीला पुढची पिढी बदललेली वाटते. कारण तरुणांचे बालपण, शिक्षण, कामाचे स्वरूप आणि सामाजिक अनुभव वेगळे असतात. ज्येष्ठ पिढीने संघर्षातून मिळवलेली मूल्ये महत्त्वाची असतातच; पण ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची पद्धत काळानुसार बदलावी लागते. अनुभव सांगणे आणि अनुभवाच्या आधारे दुसर्‍याचे निर्णय नियंत्रित करणे, यात फरक आहे. तरुणांनीही जुन्या पिढीच्या अनुभवांकडे केवळ कालबाह्य विचार म्हणून पाहू नये. त्यातून संयम, सातत्य, नात्यांतील बांधिलकी आणि कठीण काळात टिकून राहण्याची शिकवण मिळू शकते.
 
मात्र, ‘जेन-झी’शी जोडले जाण्यासाठी, केवळ जुन्या अनुभवांच्या कहाण्या सांगणे पुरेसे नाही. आज काही राजकीय नेते तरुणांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना, आपल्या संघर्षांच्या आणि जुन्या अनुभवांच्या कथा सांगताना दिसतात. पण, तरुणांना अनुभवांचे प्रदर्शन नव्हे, तर त्यांच्या प्रश्नांची समज आणि त्यावर संवाद हवा आहे. म्हणूनच, ज्येष्ठांनी तरुणांच्या प्रश्नांना ‘उद्धटपणा’ समजण्याऐवजी, त्यामागचा विचार समजून घ्यावा आणि तरुणांनीही अनुभवातून शिकण्याची तयारी ठेवावी. पिढ्यांमधील संवाद हा भूतकाळाचा गौरव किंवा वर्तमानाचा नकार नसून, दोन्हींकडून शिकण्याची प्रक्रिया असायला हवी.
‘जेन-झी’ही एकसारखी विचार करणारी, एकाच पद्धतीने वागणारी पिढी नाही. तिच्यातही महत्त्वाकांक्षी, संवेदनशील, मेहनती, गोंधळलेले, जबाबदार आणि जबाबदारी टाळणारे असे विविध स्वभाव आहेत. म्हणूनच संपूर्ण पिढीला ‘आळशी’, ‘हट्टी’ किंवा ‘कमकुवत’ अशा एका लेबलमध्ये बसवणे, हे वास्तवाचे अतिसुलभीकरण ठरेल. तरुणांकडून जबाबदारीची अपेक्षा ठेवतानाच, त्यांचे अनुभव ऐकणे, अडचणी समजून घेणे आणि योग्य दिशेने वाढण्याची संधी देणे, हीच दोन पिढ्यांमधील अंतर कमी करण्याची खरी सुरुवात आहे.
 
-डॉ. शुभांगी पारकर




संबंधित मजकूर