‘बेन गुरियन’वर विमान धडकविण्याची होती योजना!

    06-Oct-2026

Flydubai FZ1073 Attack
 
‘फ्लायदुबई’ या हवाई कंपनीच्या विमानाला इस्रायलमध्ये कोसळवून, ‘९/११’ सारखा दहशतवादी हल्ला घडविण्याचा कट हमाम अल-हमामी या दहशतवादी वैमानिकाने आखला होता. मात्र, कॅप्टन स्मित मच्छार यांच्या साहसामुळे अनेकांचे प्राण वाचले. या दहशतवाद्याची आता चौकशी सुरु असून, नवनवीन माहिती समोर येत आहे.
 
‘हमास’ या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलमध्ये भीषण हल्ला करण्याच्या घटनेला उद्या, बुधवारी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. ‘हमास’ने दि. ७ ऑटोबर २०२३ रोजी ‘सुपरनोवा संगीत महोत्सवा’वर, तसेच इस्रायलच्या लष्करी तळांवर, शहरांवर पूर्वनियोजित हल्ले केले. इस्रायलच्या इतिहासातील अत्यंत भीषण असाच हा हल्ला मानण्यात आला. या घटनेस तीन वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच एका इस्लामी दहशतवादी वैमानिकाने ‘फ्लायदुबई’ या हवाई कंपनीचे विमान ताब्यात घेण्याचा आणि ते विमान तेल अवीवलगत असलेल्या ‘बेन गुरियन’ विमानतळावर किंवा तेल अवीव शहरातील गगनचुंबी इमारतीवर धडकविण्याची योजना आखली होती. पण, त्या विमानाचा प्रमुख वैमानिक असलेल्या कॅप्टन स्मित मच्छार नावाच्या भारतीय वैमानिकाने, आपला जीव धोक्यात घालून दहशतवादी सहवैमानिकाचा डाव हाणून पाडला. कॅप्टन स्मित मच्छार आणि त्या विमानातील अन्य धाडसी सहप्रवासी, वैमानिकांमुळे, त्या विमानातून प्रवास करीत असलेल्या इस्रायली नागरिकांचे प्राण वाचले. कॅप्टन स्मित मच्छार याने दाखविलेल्या साहसाबद्दल, जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी कॅप्टन स्मित याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्याच्या धाडसाचे कौतुक केले. दहशतवादी सहवैमानिक नेमका होता कोण? याबद्दलची माहिती आता बाहेर येऊ लागली आहे.
 
कॅप्टन स्मित मच्छार याच्यासमवेत जो सहवैमानिक होता, त्याचे नाव हमाम अल-हमामी असल्याचे आणि तो ओमानी नागरिक असल्याचे तपासात आढळले. त्या सहवैमानिकाची चौकशी सुरू असून, त्यातून विविध प्रकारची माहिती बाहेर येत आहे. विमानाचा वापर करून इस्रायलमध्ये भीषण हल्ला करण्याची त्याची प्रदीर्घ काळापासूनची योजना होती, असेही तपासातून पुढे आले आहे. तेल अवीवकडे येणार्‍या-जाणार्‍या विविध विमान कंपन्यांच्या सेवांचा ‘हमामी’ने अभ्यास केला होता. तो अभ्यास लक्षात घेऊनच त्याने, ‘फ्लायदुबई’ या विमान कंपनीची निवड केली. ‘बेन गुरियन’ विमानतळावर विमान धडकविण्याचे आपले स्वप्न होते, अशी माहिती त्याच्याच चौकशीतून बाहेर आली आहे.
 
इस्रायली गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार, हमामीने व्यवसायाच्या निमित्ताने, ‘बेन गुरियन’ या विमानतळास वैमानिक या नात्याने अनेकदा भेट दिली होती. त्याने जुलैअखेरीस शेवटची भेट दिली असल्याचेही सांगण्यात आले. हल्ला करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती त्याने गोळा करुन, हल्ला करण्याची योजना आखली असावी. या घटनेच्या आधी, इस्रायलकडे जाणारे अन्य विमान कंपनीचे विमान इस्रायली प्रदेशात धडकविण्याची त्याची योजना होती. पण, त्या कंपनीतील विमान सेवकांशी त्याचे मतभेद झाल्याने, त्याची योजना मूर्त स्वरूपात येऊ शकली नाही.
सहवैमानिक हमामी याची कॅप्टन स्मित मच्छारची हत्या करून विमानाचा ताबा घ्यायचा, आणि ते विमान तेल अवीव शहरावर धडकविण्याची योजना होती. सदर सहवैमानिक हमामी याने एकट्यानेच हे कृत्य करायचे ठरविले होते की, त्याच्यामागे एखादा दहशतवादी गटही होता, याचा शोध सध्या इस्रायली गुप्तचर यंत्रणा घेत आहे. इस्रायलची लढाऊ विमाने हस्तक्षेप करण्याच्या आधीच, त्याला आपला हेतू साध्य करायचा होता. पण, प्रत्यक्षात तसे घडले नाही. कॅप्टन स्मित मच्छार याने दाखविलेल्या साहसामुळे, त्याचा प्रयत्न फसला आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. सहवैमानिक हमामी हा ऑस्ट्रेलियामध्येही होता. त्यामुळे तेथील व्यवहारांचीही माहिती गोळा केली जात आहे. कॅप्टन स्मित मच्छार याने दाखविलेल्या धाडसामुळे, अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. त्याच्या या धाडसाचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.
 
दीपप्रज्वलन करू देण्याची मागणी
 
तामिळनाडू राज्यातील तिरुपरंकुंद्रम येथील मंदिरात, दीप प्रज्वलित करण्यास अनुमती देणारा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने पूर्वीच दिला होता. पण, त्यास प्रशासनाकडून अनुमती दिली जात नव्हती. आता सणांचे दिवस जवळ येत असून, ते लक्षात घेऊन त्या मंदिरावर होणार्‍या दीपप्रज्वलनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदू मुन्ननी’ या संघटनेने केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, तिरुपरंकुंद्रम टेकडीवर परंपरागत दीपप्रज्वलनास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी, नव्या आंदोलनाचा इशाराही ‘हिंदू मुन्ननी’ संघटनेने दिला आहे. याच मागणीसाठी दि. ४ ऑटोबर रोजी ‘हिंदू मुन्ननी’ने चेन्नई आणि उपनगरांमध्ये निदर्शनांचे आयोजन केले होते. येत्या दि. ११ ऑटोबर रोजी संपूर्ण तामिळनाडूमध्येच, निदर्शनांच्या दुसर्‍या फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने कार्तिगाई दीपम तिरुपरंकुंद्रम टेकडीवर प्रज्वलित करण्यास अनुमती दिली असल्याने त्या आदेशाचे पालन व्हावे, अशी ‘मुन्ननी’ची मागणी आहे.
 
या मंदिरावर दीप प्रज्वलित करण्याचा वाद नेमका काय आहे? ज्या मंदिरासंदर्भात हा वाद आहे, ते मंदिर मदुराईजवळ आहे. तेथील ऐतिहासिक अरुलमिगु सुब्रमण्य स्वामी मंदिर, हे तामिळनाडू राज्यातील एक प्रमुख ‘मुरुगन’ मंदिर. या मंदिरात दीपप्रज्वलन कोठे करायचे, यावरूनच वाद आहे. या टेकडीवर जो ऐतिहासिक दगडी स्तंभ आहे, त्याठिकाणीच दीप प्रज्वलित करण्यात यावा, अशी भक्तांची आणि हिंदू संघटनांची मागणी आहे. सदर स्थान तेथूनच जवळ असलेल्या, सिकंदर बधुशा दर्ग्याजवळ आहे. त्यामुळेच हा वाद आणखीच चिघळला आहे. पण, परंपरेनुसार ठरलेल्या स्थानीच दीप प्रज्वलित करू द्यावेत, अशी हिंदू संघटनांची मागणी आहे. सदर वाद मद्रास उच्च न्यायालयात गेल्यावर, न्यायालयाने परंपरागत स्थानीच दीप प्रज्वलित करण्याचा आदेश दिला.
 
प्रशासनाने जो बंदी आदेश जारी केला, तो मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केला आणि पोलिसांना दीपप्रज्वलनासाठी संरक्षण देण्याचा आदेश दिला. नंतर तामिळनाडू सरकारने, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तपासण्याची तयारी दर्शविली पण, मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार दिला. दरम्यान, मद्रास उच्च न्यायालयाने ‘हिंदू मुन्ननी’च्या ३००हून अधिक कार्यकर्त्यांवर जे गुन्हे नोंदविण्यात आले होते, ते रद्द केले. त्यामुळे यासंदर्भात पुन्हा तीव्र आंदोलन करण्यास कार्यकर्त्यांना हुरूप आला आहे. हा दीपप्रज्वलन कार्यक्रम डिसेंबर महिन्यात असल्याने, ‘हिंदू मुन्ननी’ने आपले आंदोलन राज्यव्यापी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाहुया पुढे काय काय होते ते!
 
इमामाकडून महिलांच्या मारहाणीचे समर्थन
 
लंडन शहरातील एका इमामाने मुस्लीम महिलांना त्यांच्या पतीकडून जी मारहाण होते, त्याचे समर्थन केले आहे. पूर्व लंडनमध्ये असलेल्या एका मशिदीतून सदर इमामाने, आपल्या मुस्लीम धर्म बांधवांना हा ‘संदेश’ दिला आहे. लंडनमधील या इमामाचे नाव यासीन मुनये असे आहे. या इमामाने जे तारे तोडले आहेत, त्याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी तेथील धर्मादाय आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. या इमामाने जे भाषण दिले, ते भाषण सदर मशिदीच्या ‘युट्यूब’ चॅनेलवरही झळकले. नवर्‍याचे न ऐकणार्‍या बायकांना, मारहाण करण्यास प्रवृत्त करणारा सल्ला त्या इमामाने दिला होता. नवर्‍याची परवानगी न घेता घराबाहेर पडणार्‍या महिलांना शारीरिक शिक्षा करावी, असा सल्लाही या इमामाने दिला.
 
‘शरिया’ कायद्यामध्ये अशी शिक्षा अंतर्भूत असल्याचा युक्तिवाद यासंदर्भात करण्यात आला. सदर इमामाने समलिंगी संबंध ठेवणे हे घोर पाप असल्याचे आणि तो भीषण गुन्हा असल्याचेही आपल्या भाषणात सांगितले. "अशा अपराधास ‘शरिया’ कायद्यानुसार ‘देहदंड’ हीच शिक्षा असल्याचे त्याने म्हटले. तसेच, अशांचा तलवारीने शिरच्छेद करण्यात यावा किंवा त्यांना इमारतीवरून ढकलून देण्यात यावे, असे ‘शरिया’ कायदा सांगतो,” असेही त्या इमामाने सांगितले. याप्रकरणी ब्रिटनच्या धर्मादाय आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून, याचा अधिक तपास केला जात आहे.
 
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२




संबंधित मजकूर