धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी राहणे, हे मनुष्यापुढचे एक आव्हान आहे. आज जीवनशैलीचे आजार वाढत असतानाच, विविध जंतूंमुळे होणारे संक्रामक आजारही डोके वर काढत आहेत. हे संक्रामक आजार म्हणजे काय, त्याचा होणारा प्रसार, त्याचे प्रकार यांचा आढावा घेणारा हा लेख...
मनुष्य विविध त्रासांनी त्रस्त असतो. आजारी पडणे नेहमीच केवळ शारीरिकच नसते, काही वेळेस भावनात्मक, मानसिक कारणेही मनुष्याला त्रस्त करतात. रोगांची उत्पत्तीही विविध कारणांनी होते. काही रोग संक्रामक प्रकारचे असतात. यांनाच ’कम्युनिकेबल डिसिज’ म्हणतात. तर, काही रोग असंक्रामक असतात, त्यांना ’नॉन कम्युनिकेबल डिसिज’ म्हणतात. यालाच लाईफ स्टाईल डिसॉर्डर्स म्हटले जाते. आजच्या लेखात संक्रामक रोगांबद्दल जाणून घेऊया.
कोणी शिंकले किंवा खोकले असता आपण सांगतो की, "नाक किंवा तोंडावर रुमाल ठेव, हात ठेव.” असे का? तर नाकावाटे-तोंडावाटे उडणारे तुषार इतरांवर उडू नयेत म्हणून. पिण्याच्या पाण्याच्या भांड्यामध्ये हात बुडवू नका म्हणूनही सांगितले जाते, का? तर त्यामुळे बोटातील घाण पाण्यात जाते. पुढे तेच पाणी प्यायल्याने, तीच घाण पोटात जाण्याचाही धोका असतो. मातीत खेळताना अनवाणी खेळू नये म्हणूनही अनेकदा सांगण्यात येते. जर खेळल्यास, घरी आल्यावर लगेचच हात-पाय स्वच्छ धुण्याच्या, आंघोळ करण्याच्या सूचना केल्या जातात, का? कारण, मातीतून जंतू तोंडावाटे, नखांवाटे, जखमांवाटे शरीरात शिरू नयेत, म्हणून ही काळजी घ्यायची असते. आपण बरेचदा मुलांना सांगतो की, वस्त्र (आतले व इतर कपडे), नॅपकिन, टॉवेल, कंगवे एकमेकांचे वापरू नयेत. वापरलेले अथवा न धुतलेले, घामाचे वस्त्र धुतल्याशिवायही पुनःपुनः वापरू नये. असे का? तर, शरीरातील घाम, मृत त्वचा, जखमा, व्रण यांचा धूलिकणांशी संपर्क येऊन, विविध आजार उत्पन्न होऊ शकतात. तसेच कप, मग, जेवणाची भांडीही एकमेकांची वापरु नये. एकमेकांचे उष्टे आणि खरकटे अन्नदेखील खाऊ नये. बिडी-सिगारेट-वॅप-हुक्का इत्यादिबाबतीतही हीच काळजी घ्यावी. कारण, एक व्यक्ती जर संक्रामक आजाराने बाधित असेल, तर त्याच्या गोष्टी वापरल्याने ते संक्रमण पसरण्याचा धोका असतो. शारीरिक संपर्क जसे की हस्तांदोलन, मिठी मारणे, चुंबन घेणे, शारीरिक संबंध ठेवणे या माध्यमातून संक्रमित रोग पसरतात. मनुष्य अथवा प्राण्याच्या मूत्र-विष्ठेचा स्पर्श टाळावा, कुत्रा-मांजरी यांसारखे पशु-पक्षी-प्राणी यांच्या नखांच्या, दातांच्या, जिभेच्या संपर्कानेही आजार पसरण्याची शक्यता असते. तसेच, रक्त चढवणे, अवयव प्रत्यारोपणानेही रोगांचा प्रसार होऊ शकतो. ज्या व्यक्ती अथवा प्राण्याशी संपर्क येतो, तो अथवा ते प्राणी संक्रमित रोगाने ग्रस्त असतील, तर तो संपर्कच जंतू संसर्गासाठी कारणीभूत ठरू शकतो.
संसर्ग हे जिवाणू, विषाणू, परजीवी किंवा बुरशी असे विविध प्रकारचे असू शकतात. प्रत्येक संपर्काने विविध संसर्गजन्य व्याधींचीच लागण होते. गर्भातील अर्भकालाही, काही विशिष्ट संसर्गजन्य व्याधींची लागण मातेद्वारे पोटातच होऊ शकते. संसर्ग हा पाण्यातून, हवेतून, मातीतून, अन्नातून, रक्तातून, लाळेतून पसरण्याचा धोका असतो. यासाठी मुख्य दोन घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे बाधित व्यक्ती अर्थात रुग्ण आणि ज्याच्याशी संपर्क येतो, अशी व्यक्ती. प्रत्येक व्यक्तीलो जंतू संसर्गाची बाधा होत नाही. जर एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यास, या संसर्गांवर मात करता येते. शिवाय, रोगही उत्पन्न होत नाही.
पण, काही विशिष्ट कारणांमध्ये ही रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यातील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे. आजारातून नुकतेच त्यातून बरे झाले असल्यास किंवा रोगप्रतिकारक शक्तीमंद असल्यास. पाच वर्षांखालील बालकांची रोगप्रतिकार शक्ती, संपूर्णतः विकसित झालेली नसते. अशा वेळेस संसर्ग संक्रमित होण्याची शक्यताच अधिक असते. वृद्धापकाळातही ही शक्ती ताकद कमी झाल्यावर, रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. काही विशिष्ट अवस्थांमध्ये जसे की, मधुमेहामध्ये मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. स्थूल व्यक्तींमध्ये, विविध त्वचा रोगांचे प्रमाण अधिक असू शकते, काही विशिष्ट जागी जंतू संसर्गाचे प्रमाणही अधिक असू शकते. जर माणसाची रोगप्रतिकार शक्ती सुदृढ नसेल, तर रुग्णालये, सार्वजनिक कचराकुंड्या इ. ठिकाणीही जंतू संसर्गाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असते. व्यसनाधीनतेमुळेही रोगप्रतिकारक शक्तीवर आणखी परिणाम होतो. ज्यांचा सततचा प्रवास असतो, ज्यांची दिनचर्या चुकीची असते, झोपेच्या-जेवायच्या वेळा चुकलेल्या असतात, परदेशी प्रवासामुळे हवामानातील बदलांना सातत्याने ज्यांना तोंड द्यावे लागते, तापमानातील त्वरित बदलांचा अनुभव ज्यांना घ्यावा लागतो, अशांमध्येही रोगप्रतिकारक शक्ती क्षीण असण्याची शक्यता अधिक असते. गर्भवती अवस्थेतही स्वाभाविकतः प्रतिकारशक्ती थोडी नाजूक असते. अशा सगळ्यांनीच आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रोग होऊ न देणे यावर भर द्यावा आणि झाल्यास, तो लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा, दुर्लक्ष करणे प्रकर्षाने टाळावे.
संक्रामक रोग हे बॉडीली फ्ल्युएड जसे की रक्त, लाळ, मूत्र, विष्ठा, नाकातील स्राव इ. अर्थात आंतरिक स्रावामुळेपसरतात. यात बहुतांशी लैंगिक आजारांचा समावेश होतो. यात प्रत्यक्ष या अंतरिक स्रावांचा संपर्क एकमेकांशी येतो. हवेतून, पाण्यातून होणारे संक्रमण, शारीरिक स्रावांंच्या संपर्काने होणारे संक्रमण आणि दोन्हींतून उत्पन्न होणार्या व्याधी भिन्न भिन्न आहेत. व्याधी उत्पन्न होण्यापूर्वीची लक्षणेही वेगवेगळी असतात. त्यांची तीव्रता व चिकित्साही भिन्न भिन्नच असते.
मनुष्याच्या प्रत्यक्ष बाह्य संपर्कानेही काही व्याधी होतात. विशेषतः त्वचा आणि केसांमधील विविध तक्रारींचे मूळ कारण यात असू शकते. उदा : उवा, लिखा होणे हे प्रकार मुख्यत्वे करून, बाधित व्यक्तीच्या जवळ बसल्याने किंवा त्याचा कंगवा, टॉवेलसारख्या वस्तू वापरल्याने पसरू शकतात. भारतामध्ये संक्रामक व्याधीचे प्रमाण सुमारे ३३ टक्के आहे. प्रत्येक संक्रामक रोग हा तीव्र स्वरूपाचा नसतो. पण, त्याच्या विस्ताराचा वेग लक्षात घेता, त्याला वेळीच आटोक्यात आणणे गरजेचे आहे. उदा. मलेरिया, डेंग्यू (जे डासांनी उत्पन्न होणारे रोग आहेत), त्यांच्यावर मात करण्यासाठी पावसाळ्यात जागोजागी फवारणी केली जाते. प्रत्येक संक्रमित रोगाचे मूळ कारण भिन्न आहे, त्याची लक्षणे, काळ, वेगही वेगळे आहेत. तसेच, त्याची चिकित्साही वेगळीच आहे. संक्रमित रोगांबद्दल आणखी विस्तारात पुढील लेखात वाचूया. (क्रमशः)
वैद्य कीर्ती देव
९८२०२८६४२९
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)