भारतीय ज्योतिष परंपरेसाठी...

    06-Oct-2026
 

Anil Chandwadkar
 
भारतीय ज्ञानपरंपरेतील ज्योतिष हे शास्त्र असून, त्याचे संवर्धन होणे गरजेचे. यासाठी कार्य करणारे नाशिकचे अनिल चांदवडकर. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा समृद्ध आहे. या आयामात ज्योतिषशास्त्रसुद्धा विज्ञान असून अनुभव-अभ्यासाने ते समृद्ध होते. अशा आशयाने गेली अनेक दशके ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि त्यासाठी कार्य करणारे अनिल चांदवडकर. ज्योतिषशास्त्रासह पौरोहित्य क्षेत्रामध्ये अभ्यास आणि कार्य करण्याची संधी सर्व समाजाला मिळावी, यासाठीची त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ते ‘महाराष्ट्र राज्य ज्योतिष परिषद’चे अध्यक्ष असून, ‘ज्योतिष अभ्यास मंडळ’ नवीन नाशिकचे संस्थापक-अध्यक्ष आणि ‘श्रीगणेश ज्योतिष अभ्यास मंडळ’ पुणेचे संस्थापक सचिव आहेत. ’श्री पवनपूत्र हनुमान मित्र मंडळ’चे संस्थापक-सचिव असून, ‘साईरंग उपासना केंद्र व बहुउद्देशीय संस्था’ नाशिकचे अध्यक्ष आहेत. याचबरोबर ‘हिंदू एकजूट, शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थे’चे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. रा. स्व. संघातर्फे नाशिकमध्ये सर्व समाजासाठी पूजा प्रशिक्षणवर्ग चालतो, त्याचे ते व्यवस्थापकही आहेत. समता, समरसता आणि भारतीय संस्कृतीच्या संस्कारांचे संवर्धन करत भारतीय प्राचीन शास्त्रांसाठी काम करणारे असे हे अनिल चांदवडकर.
 
खचलेल्या व्यक्तीची आत्मशक्ती वाढावी, समाजाचे आध्यात्मिक बळ वाढून सकारात्मकतेवर विश्वास वाढवावा, यासाठी ज्योतिषशास्त्राचा उपयोग चांदवडकर करतात. समाजविघातक, त्यातही हिंदूद्वेष्टे हे भारतीय ज्ञानविज्ञान-परंपरेवर अविश्वास दाखवतात. सहेतू बदनामी करतात, निंदा करतात. अशा वेळी त्यांच्या उथळ वाचाळतेला भीक न घालता, आपल्या श्रेष्ठ परंपरेचे संवर्धन जोमाने व्हावे, यासाठीचे अनिल यांचे विचारकार्य महत्त्वाचे आहे. ‘महाराष्ट्र ज्योतिष परिषदे’च्या अंतर्गत ज्योतिषशास्त्राचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासक्रमाला दरवर्षी साडेतीनशे विद्यार्थी प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांनी ज्योतिषशास्त्राची विज्ञानाधिष्ठता समजून समाजाला मार्गदर्शन करावे, हा हेतू या अभ्यासक्रमाचा आहे. तसेच पूजा प्रशिक्षण अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विविध समाजातील बांधवांना पूजापाठाचे शास्त्र अवगत व्हावे, या इच्छेने ते अनेक वर्षे कार्य करतात. धार्मिक आणि पारंपरिक ज्ञान-वारशाच्या क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. समस्याग्रस्त लोकांचे सकारात्मक समुपदेशन करणे, गरजू गरिबांना शक्य होईल ते सहकार्य करणे, यासोबतच ‘कोरोना’ काळातही त्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी मोलाचे सेवाकार्य केले. या सर्व कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘विज्ञान वारकरी पुरस्कार’, ‘ज्योतिषरत्न पुरस्कार’, ‘ज्योतिषभूषण पुरस्कार’, ‘ज्योतिष कार्य गौरव पुरस्कार’, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, ‘वारकरी कार्यकर्ता पुरस्कार’, ‘संस्कृतीरत्न पुरस्कार’, ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. धर्मश्रद्धा भारतीय ज्ञानपरंपरेच्या सेवेबद्दल प. पू. शंकराचार्य संकेश्वर पीठ यांनी त्यांना ‘ज्योतिष धर्माचार्य’ या उपाधीनेही सन्मानित केले आहे, तर ज्योतिष धर्माचार्य अनिल चांदवडकर यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेऊ.
 
देविदास आणि शालिनी चांदवडकर हे दाम्पत्य मूळचे त्र्यंबकेश्वरचे. कामानिमित्त चांदवडकर कुटुंब मनमाडला स्थायिक झाले. दोघेही शिक्षक आणि उभयतांना दोन अपत्ये. त्यापैकी एक अनिल. घरी धार्मिक पारंपरिक वातावरण होते. या ब्राह्मण कुटुंबात अस्पृश्यतेच्या अमानवी प्रथेला थारा नव्हता. अत्यंत संस्कारित कुटुंबातले अनिल खेळायला मिळते म्हणून संघाच्या शाखेत जाऊ लागले. तिथे मुकुंद साठे, गिरीश कुबेर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. एकदा गिरीश कुबेर ‘चरण चालू दे ध्येय मंदिराकडे’ हे संघगीत गात होते. ते गीत ऐकून अनिल यांच्या मनात ध्येयाबद्दल विचार सुरू झाले. आपले ध्येय काय? तर, पुढे रा. स्व. संघाच्या प्रेरणादायी विचारांनी त्यांना त्यांचे समाजहिताचे ध्येय मिळाले.
 
असो. देविदास अनिल यांना म्हणत की, "भारताच्या प्राचीन ज्ञानशास्त्र परंपरेतील एकातरी विषयाचा अभ्यास कर.” त्यामुळेच अनिल यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. कला शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण करून ‘बीएड’चेही शिक्षण घेतले. इंजिनिअर म्हणून त्यांना नोकरीही मिळाली. ते रा. स्व. संघाच्या विविध आयामात सक्रिय काम करू लागले. त्यांना भारतीय ज्ञानपरंपरेतल्या विषयावर अभ्यास करायचा होता. त्यांचे आजोबा ज्योतिषशास्त्रात पारंगत होते. तो वारसा पुढे नेऊया, या विचारांनी त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ज्योतिषशास्त्राचा तर्कसुसंगत आणि विज्ञानाधिष्ठ अभ्यास त्यांनी सुरू केला. दरम्यान, त्यांचा विवाह स्मिता यांच्याशी झाला. त्यांनी अनिल यांना सदैव साथ दिली. अनिल म्हणतात, "ज्योतिषशास्त्र हे विज्ञाननिष्ठ आहे. त्याचे संवर्धन व्हावे आणि त्याचा उपयोग सदैव समाजाच्या कल्याणासाठी करायचा, हा माझा निश्चय आहे.” ज्योतिष धर्माचार्य अनिल चांदवडकर यांच्या विचारकार्याला शुभेच्छा!

-योगिता साळवी
९५९४९६९६३८




संबंधित मजकूर