नागपूर : गेल्यावेळी ही जागा आम्ही जिंकू शकलो नव्हतो. मात्र यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकजुटीने काम करत आहेत. तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यावेळी कोहळे यांचा प्रचंड बहुमताने विजय होईल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
अनिल सोले यांची नाराजी दूर करू
अनिल सोले य़ांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर केली जाईल. ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
अमरावतीच्या जागेबाबत महायुतीत चर्चा
अमरावती विधानपरिषद मतदारसंघाबाबत महायुतीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, ही जागा शिवसेनेने लढवावी, असा विचार बैठकीत मांडण्यात आला आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच महायुतीतील संबंधित पक्षांचे अध्यक्ष संयुक्तपणे करतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Sudhakar Kohale)
दुष्काळाची परिस्थिती गंभीर
राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीन, मका आणि कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीचे पीक घेणेही अवघड होण्याची शक्यता आहे. पुढील काळात चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. पीक विमा तसेच एसडीआरएफच्या माध्यमातून मिळणारी संपूर्ण मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
चारा टंचाईवर वैरण विकासाचा उपाय
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी थोडा ओलावा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी ‘माता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजने’अंतर्गत चारा लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. वैरण विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
विदर्भात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र आहे. या भागात बी-बियाणे उपलब्ध करून देऊन चारा निर्मिती करता येऊ शकते. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून आवश्यक निधी उपलब्ध करून देत वनक्षेत्रातूनही चारा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसोबत झुणका-भाकर, ठेच्याचा अनपेक्षित बेत
शेतकऱ्यांसोबत केलेल्या जेवणाबाबत बावनकुळे म्हणाले की, हा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता. शेतकरी डबा घेऊन आले होते. आपण त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्यांनी प्रेमाने डबा खाण्याची विनंती केली. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत झुणका-भाकर आणि ठेचा खाल्ला.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी दुःखी असला तरी त्याने आपले संस्कार आणि पाहुणचाराची परंपरा विसरलेली नाही, हे या प्रसंगातून दिसून आले, असे बावनकुळे म्हणाले.
तांदूळ घोटाळ्याच्या चौकशीत कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. चौकशीचा अहवाल काय येतो, त्यावर पुढील निर्णय अवलंबून असेल. चौकशी गंभीर स्वरूपाची असल्यास फौजदारी गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांना ट्रोल करणे, मारहाण करणे अयोग्य
महिला संपादकाला करण्यात आलेल्या ट्रोलिंगबाबत बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार जपले पाहिजेत. महिला संपादकाला अशा पद्धतीने वागणूक देण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. ट्रोल करणाऱ्या व्यक्तींचा पोलिसांकडून शोध घेऊन कारवाई केली जाईल. गरज पडल्यास आपणही पोलिसांशी याबाबत चर्चा करू, असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांना मारहाण करणे किंवा ट्रोल करणे योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने व्हावे
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बावनकुळे म्हणाले की, आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र आंदोलन लोकशाही पद्धतीने झाले पाहिजे. सरकारी मालमत्तेचे किंवा समाजाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आंदोलन आक्रमक असले तरी तोडफोड करणे योग्य नाही. आंदोलन कसे करावे, याचे भान आंदोलकांनी ठेवले पाहिजे.
शहरनिहाय पाणी नियोजन; पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य
पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीवर सरकारकडून नियोजन सुरू आहे. प्रत्येक शहराचे पाणी उपलब्धता आणि गरज याचे आकलन करण्यात आले असून त्यानुसार एसओपी तयार केली जात आहे. त्यानुसारच पाणी सोडण्याचे नियोजन केले जाईल. पाण्याच्या वापरामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. (Sudhakar Kohale)
महायुतीत चर्चेतून जागावाटपाचा मार्ग
शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. कधी एखाद्या पक्षाला आघाडी मिळते, तर कधी दुसऱ्या पक्षाला; मात्र महायुतीमध्ये चर्चेतून निर्णय घेतले जातात. ज्या जागा ज्या पक्षाकडे विद्यमान आहेत, त्या ‘सिटिंग-गेटिंग’च्या आधारावर लढविण्याचा प्राथमिक विचार आहे. त्यानंतर उर्वरित जागांबाबत सामंजस्याने निर्णय घेतला जाईल.
बंडखोरीवर माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत चर्चा
निवडणुकीत काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तरी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत परिस्थिती बदलू शकते. बंडखोरी झालेल्या ठिकाणी संबंधित उमेदवारांशी चर्चा करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त करण्याचे प्रयत्न केले जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीवर आरोप-प्रत्यारोप नको
मुंबई विमानतळाच्या धावपट्टीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, धावपट्टीमध्ये काही समस्या निर्माण झाली असेल किंवा भविष्यात त्यातून मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता असेल तर तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अशा विषयावर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे.