डॉल्फिनच्या दोन दुनिया!

    05-Oct-2026
 
National Dolphin Day India 2026
 
भारतात दरवर्षी दि. ५ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय डॉल्फिन दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘राष्ट्रीय वन्यजीव मंडळा’च्या स्थायी समितीने दि. २५ मार्च २०२२ रोजी दि. ५ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय डॉल्फिन दिन’ म्हणून साजरा करण्याची शिफारस केली. डॉल्फिन या जलपरिसंस्थेच्या आरोग्याच्या ‘सूचक प्रजाती’ असल्याने त्यांच्या संवर्धनातून संपूर्ण जलपरिसंस्थेचे संरक्षण साधता येते, ही या दिवसामागची प्रमुख भूमिका आहे.
 
भारताच्या गोड्या पाण्यातील डॉल्फिनची चर्चा झाली की, सर्वप्रथम नाव येते, ते गंगा नदीतील डॉल्फिनचेGanges River Dolphin (Platanista gangetica). भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून या प्रजातीला मान्यता मिळाली आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी तिच्या उपनद्या आणि खोर या क्षेत्रात राहणारी भारतातील फक्त एकच गोड्या पाण्यातील डॉल्फिनची ही प्रजात आहे. जरी या प्रजातीचा वावर नदीत असतो, असे म्हटले आहे तरी, काही वेळा या डॉल्फिन खाडी किंवा समुद्र किनारीदेखील दिसून येते. जसे की, पश्चिम बंगाल सागरी किनार आणि सुंदरबन क्षेत्रात जिकडे नदी सागराला मिळते. गंगा डॉल्फिनची ओळख तिच्या अत्यंत लांब आणि पातळ चोचीवरून करता येते, ज्यात दात स्पष्ट दिसतात. तिचे डोळे अगदी लहान असून त्यात भिंग (Lens) नसते, त्यामुळे ती जवळजवळ आंधळी असते. तिला खरा पाठीचा कपर (Dorsal Fin) नसतो; फक्त एक लहानसा कुबडासारखा भाग असतो. ही डॉल्फिन बहुतेक वेळा कलंडून, म्हणजेच कडेवर पोहताना दिसते. पाण्याबाहेर येताना ती मोठ्याने श्वास सोडते, ज्यामुळे स्पष्ट आवाज होतो. आकाराच्या बाबतीत मादी नरापेक्षा मोठी असते. थोडक्यात, लांब पातळ चोच, दात दिसणारे तोंड, अगदी लहान डोळे, कल्ल्याऐवजी फक्त कुबड आणि कलंडून पोहण्याची सवय हीच गंगा डॉल्फिनची खास ओळख आहे. ‘सिंधू नदी डॉल्फिन’ ही प्रजातीदेखील पूर्वी भारतात सिंधू नदी खोर्‍यात आढळत असल्याचे नोंद आहे. आताची परिस्थिती पाहता पंजाबमधील बियास नदीत अजूनदेखील काही एक किंवा दोन डॉल्फिन शिल्लक असल्याचा संशोधक मंडळींचा कयास आहे. या प्रजातीचे डॉल्फिन मोठ्या संख्येने पाकव्याप्त सिंधू नदी खोर्‍यात आहेत. सिंधू डॉल्फिन दिसायला गंगा डॉल्फिनसारखीच असते, त्यामुळे तिला केवळ दिसण्यावरून ओळखणे कठीण जाते. तिची ओळख मुख्यतः ती कुठे आढळते यावरून, म्हणजेच बियास नदीत राहणार्‍या डॉल्फिनवरून करता येते. शिवाय, तिच्या कवटीच्या (Skull) रचनेतील काही ठळक फरकांवरूनही तिला गंगा डॉल्फिनपासून वेगळे ओळखता येते.

किनारी डॉल्फिन
 
किनारी आणि खाडी अधिवासात डॉल्फिनच्या जवळपास सहा प्रजातींचा वावर आढळतो. इरावडी डॉल्फिन ही डॉल्फिन प्रजाती विशेषतः चिल्का सरोवर (ओडिशा) आणि सुंदरबनमध्ये आढळते. खार्‍या पाण्याचे खाडी-सरोवरे, खाड्या आणि नद्यांची मुखे या ठिकाणी ती अधिवास करते. इरावडी डॉल्फिनची ओळख तिच्या गोलसर डोयावरून सहज करता येते. कारण तिला इतर डॉल्फिनसारखी पुढे आलेली चोच नसते. तिचे कपाळ फुगीर आणि गोल असते, ज्यामुळे तिचा चेहरा वेगळाच दिसतो. तिला लहान आणि बोथट पाठीचा कल्ला असतो, जो फारसा ठळक दिसत नाही. तिचा रंग निळसर-करडा (Blue-grey) असतो. थोडक्यात, चोच नसलेले गोल डोके, फुगीर कपाळ, लहान बोथट कल्ला आणि निळसर-करडा रंग हीच इरावडी डॉल्फिनची खास ओळख आहे. इंडो-पॅसिफिक हम्पबॅक डॉल्फिन आणि हिंदी महासागरातील हम्पबॅक डॉल्फिन दोन प्रजाती किनार्‍यालगतचे उथळ पाणी आणि खाड्या या भागात मुक्तपणे संचार करतात. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कारवार (कर्नाटक), कच्छचे आखात, मन्नारचे आखात आणि केरळ याठिकाणी इंडो-पॅसिफिक हम्पबॅक डॉल्फिन, तसेच भारताची पूर्व किनारपट्टी मुख्यते हिंदी महासागरातील हम्पबॅक डॉल्फिन विपुलतेने आढळतात. या दोन्ही प्रजाती किनारी सर्वत्र मच्छीमार मंडळींना नेहमीच दिसतात. इंडो-पॅसिफिक बॉटलनोझ डॉल्फिन ही डॉल्फिन प्रजात किनारालगतची आणि किनारपट्टीच्या जलक्षेत्रामध्ये संपूर्ण भारतीय सागरी क्षेत्रात दिसून येते. इंडो-पॅसिफिक बॉटलनोज डॉल्फिनची ओळख तिच्या चोचीवरून करता येते. सामान्य बॉटलनोज डॉल्फिनपेक्षा तिची चोच जास्त लांब असते. प्रौढ डॉल्फिनच्या पोटावर दिसणारे ठिपके हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. थोडक्यात, सामान्य बॉटलनोजपेक्षा लांब चोच आणि प्रौढांच्या पोटावरील ठिपके हीच इंडो-पॅसिफिक बॉटलनोज डॉल्फिनची खास ओळख आहे. इंडो-पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिनची ओळख तिच्या पाठीच्या परा खाली असलेला चरबीयुक्त कुबड (Fatty Hump). थोडक्यात, लांब चोच, करडा रंग आणि पाठीच्या कल्ल्याखालील चरबीयुक्त कुबड हीच इंडो-पॅसिफिक हम्पबॅक डॉल्फिनची खास ओळख आहे. ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन’चा रंग बहुतेक करडा (Grey) असतो. तिची ओळख तिच्या पाठीवरील रचनेवरून करता येते. तिला एका लहान कुबडावर (Low Hump) बसलेला छोटा त्रिकोणी पाठीचा पर (Triangular Dorsal Fin) असतो. थोडक्यात, करडा रंग आणि लहान कुबडावर बसलेला छोटा त्रिकोणी कल्ला हीच ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन’ची खास ओळख आहे.
 
प्रदीप चोगले
(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ या संस्थेत सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
९०२९१४५१७७




संबंधित मजकूर