मुंबई : मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असून, त्यांच्या पडण्यामुळे दुर्घटनांची शक्यताही निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी महापालिकेने निश्चित धोरण आखावे, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी महापौरांना पत्र लिहिले. मुंबईतील विविध भागांत अनधिकृतपणे बॅनर आणि होर्डिंग्ज उभारले जात आहेत. या संदर्भात उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित ती कारवाई होत नसल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. अनधिकृत जाहिरात फलक उभारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संयुक्त बैठक आयोजित करावी
दरम्यान, शहरातील विजेच्या खांबांचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करून त्यावर महापालिकेच्या माध्यमातून प्रमाणित आकाराचे जाहिरात फलक उभारता येऊ शकतात. हे फलक भाडेतत्त्वावर देण्यात आल्यास महापालिकेला अतिरिक्त महसूलही मिळू शकतो, अशी सूचनाही अमीत साटम यांनी केली. अनधिकृत जाहिरात फलकांना आळा घालण्यासाठी तसेच अधिकृत जाहिरातींसाठी पारदर्शक आणि निश्चित धोरण तयार करण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या बैठकीत धोरण निश्चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत, असेही अमीत साटम यांनी म्हटले आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....