६४ घरांवरचे भारतीय सामर्थ्य...

    05-Oct-2026
 
 India Chess Olympiad 2026
 
‘ऑलिम्पियाड’ म्हणजे, एका विशिष्ट क्षेत्रात आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाणारी सर्वोच्च स्पर्धा. प्राचीन ग्रीसमध्ये दर चार वर्षांनी होणार्‍या खेळांतील कालावधीला ‘ऑलिम्पियाड’ म्हणत. क्रीडा क्षेत्रात सुरु झालेलं ऑलिम्पियाड आता ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’, ‘रोबोटिस ऑलिम्पियाड’ ते विज्ञान आणि गणित विषयातून जगभरात प्रचलित होत आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक अथवा माहिती तंत्रज्ञान, खगोलशास्त्र अशी विविधांगी ऑलिम्पियाड प्रसिद्ध असून, भारत त्यातील सगळ्याच ऑलिम्पियाडमध्ये आपले वर्चस्व गाजवू लागला आहे.
 
‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’ ही ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा’द्वारे (फिडे) आयोजित, जगातील सर्वांत मोठी सांघिक बुद्धिबळ स्पर्धा. यामध्ये विविध देशांचे पुरुष/खुला गट आणि महिला गटांचे राष्ट्रीय संघ एकत्र येऊन, बुद्धिबळाचे पट मांडतात. ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’ अधिकृतपणे पहिल्यांदा १९२७ मध्ये, लंडन येथे आयोजित करण्यात आले. ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा’ दर दोन वर्षांनी भरवली जाते. पूर्वी चीन, भारत, मध्य आशिया आणि युरोप यांच्यातील व्यापार आणि संस्कृतीची देवाणघेवाण ज्या ऐतिहासिक रस्त्याने व्हायची; त्यास ‘रेशीम मार्ग’ म्हणत. याच मार्गावर प्रवास करणार्‍या व्यापारी आणि काफिल्यांसाठी, ‘समरकंद’ हे विश्रांतीचे, मोठ्या व्यवहारांचे एक मुख्य केंद्र. त्याच ‘समरकंद’ येथे, ४६वे २०२६चे ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’ नुकतेच संपन्न झाले. याआधीचे ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’ २०१८ : बाटुमी (जॉर्जिया), २०२० व २०२१ : ऑनलाईन (कोरोना महामारीमुळे), २०२२ : चेन्नई (भारत) - ४४वे ऑलिम्पियाड, २०२४ : बुडापेस्ट (हंगेरी) - ४५वे ऑलिम्पियाड तर आताचे २०२६: समरकंद (उझबेकिस्तान) - ४६वे ऑलिम्पियाड पार पडले आहे.
 
भारत १९५६ च्या ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मध्ये, पहिल्यांदा सहभागी झाला. सुरुवातीच्या काही दशकांत भारतीय संघ मध्यम किंवा खालच्या स्थानांवर असे. पण, १९९० साली ’आनंद युग’ उजाडले. विश्वनाथन आनंदच्या आगमनानंतर, भारताची पत वाढली आणि भारत अव्वल दहा देशांच्या शर्यतीत आला. नॉर्वे येथे झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये, भारताने प्रथमच कांस्यपदक जिंकले. २०२०ला ऑनलाईन प्रकारातही, भारताने रशियासोबत संयुक्त सुवर्णपदक जिंकले. भारतात पार पडलेल्या २०२२च्या चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये, पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी कांस्यपदके पटकावली. त्यानंतर २०२४ला बुडापेस्ट येथे, भारताने पुरुष आणि महिला दोन्ही विभागांत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक असे दुहेरी यश मिळवले. ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’ नुकतेच दि. १५ ते २७ सप्टेंबर या काळात, उझबेकिस्तान येथे आयोजित करण्यात आलं होतं. २०२६च्या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरुष संघाने रौप्यपदक, तर महिला संघाने कांस्यपदक मिळवले. तसेच दोन्ही विभागांतील सर्वोत्तम एकत्रित कामगिरीबद्दल मिळणारी ‘गॅप्रिंडाश्विली ट्रॉफी’ही, भारतानेच जिंकली. थोडयात, आज भारतीय बुद्धिबळ ही ‘महासत्ता’ झाली आहे.
 
सप्टेंबरच्या ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मधे, भारतीय पुरुष संघाने ११ फेर्‍यांमध्ये उत्कृष्ट खेळ केला. या स्पर्धेतील १८ मॅच पॉईंट्ससह दुसरे स्थान मिळवत भारतीय पुरुष संघाने रौप्यपदक पटकावले, तर यजमान उझबेकिस्तानने सुवर्णपदक जिंकले. या भारतीय संघाचे नेतृत्व करणार्‍या डी. गुकेशने, पहिल्या बोर्डवर जबरदस्त कामगिरी केली. निर्णायक सामन्यांमध्ये महत्त्वपूर्ण विजय मिळवून, त्याने संघाला पदकाच्या शर्यतीत टिकवून ठेवले. कठीण प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध चमकदार कामगिरी करत, आर. प्रज्ञानंदने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विदित गुजरातीनेही अनुभवाचा फायदा घेत, संघाला अनेक महत्त्वाच्या फेर्‍यांमध्ये गुण मिळवून दिले. आपल्या वेगवान आणि अचूक खेळाने, निहाल सरिनने प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करत, संघाला विजयाकडे नेले.
पुरुषांबरोबरच भारतीय महिला संघानेही, ११ फेर्‍यांमध्ये १७ मॅच पॉईंट्स आणि ३१ गेम पॉईंट्ससह कांस्यपदक आपल्या नावे केले. याच स्पर्धेत चीनने सुवर्ण, तर कझाकिस्तानने रौप्यपदक जिंकले. महिलांच्या संघात पहिल्या बोर्डवर खेळताना कोनेरू हंपीने, संघाच्या आघाडीचे नेतृत्व केले. अनेक चांगल्या खेळाडूंविरुद्ध तिने गुण मिळवले. आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत, आर. वैशालीनेही संघाच्या धावसंख्येमध्ये मोठीच भर घातली. दिव्या देशमुखने महत्त्वपूर्ण विजयांची नोंद करत, संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मध्यंतराच्या फेर्‍यांमध्ये सलग विजय मिळवत, वंतिका अग्रवालने संघाला आघाडी मिळवून दिली. या स्पर्धेत सविता श्री.बी.नेही अभूतपूर्व कामगिरीचे प्रदर्शन केले. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागांमधील एकत्रित कामगिरीच्या आधारे, भारताने या स्पर्धेची ‘गॅप्रिंडाश्विली ट्रॉफी’ जिंकली.
 
भारताने ऑलिम्पियाडमधे आपला दबदबा कायम ठेवताना, आपले नाव ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा’च्या (फिडे) उपाध्यक्षपदावरही कोरले आहे. तीन दशकांहून अधिक काळानंतर, पहिल्यांदाच ‘फिडे’चे नेतृत्व रशियन नागरिकाकडे नसेल! यामुळे क्रेमलिनशी जवळचे संबंध असलेल्या व्यक्तींचे, विशेषतः किर्सान इल्युमझिनोव्ह आणि मावळते अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच यांचे वर्चस्व असलेल्या एका युगाचा अंत झाल्याचे म्हणता येते. उझबेकिस्तानमधील ‘समरकंद’ येथे झालेल्या ‘फिडे’च्या महासभेत, ‘कझाकस्तान बुद्धिबळ महासंघा’चे अध्यक्ष तिमूर तुर्लोव यांची ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघा’च्या आठव्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबरोबर भारतीयांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्वाचे म्हणजे, या निवडणुकीत भारताचा पाचवेळचा विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याची, उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. आनंदसारख्या दिग्गज खेळाडूची उपाध्यक्षपदावर झालेली निवड, भारतीय बुद्धिबळासाठी अत्यंत अभिमानास्पदच. या नियुक्तीमुळे जागतिक बुद्धिबळ प्रशासनात भारताचे स्थान अधिक मजबूत झाले असून, भारतीय बुद्धिबळाला एक मानाचे स्थान प्राप्त झाले आह.
 
रशिया आणि जागतिक राजकारणाची पार्श्वभूमी पाहता, तुर्लोव हेही रशियन वंशाचे असल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. तिमूर तुर्लोव हे रशियन वंशाचे कझाक अब्जाधीश असून, त्यांच्या विजयामुळे जागतिक बुद्धिबळातील पारंपरिक रशियन वर्चस्व आणि नेतृत्वाचा प्रवाह नव्या स्वरूपात पुढे चालू राहिला आहे. तुर्लोव यांना ‘रशियन बुद्धिबळ महासंघाचा’ही पाठिंबा होता, यामुळे बुद्धिबळजगतात पुन्हा एकदा रशियाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. जागतिक स्तरावर भारतासहित रशियाचे स्थान बघताना, आपल्याला बुद्धिबळक्षेत्रातील पुढील काही घटनांचा वेध घेणे आवश्यक ठरते.
 
- १९७६चा राजकीय बहिष्कार (हाइफा, इस्रायल) : इस्रायलमध्ये झालेल्या ऑलिम्पियाडवर सोव्हिएत युनियन, पूर्व युरोपीय देश आणि सर्व अरब देशांनी राजकीय कारणांमुळे बहिष्कार टाकला होता. अरब देशांनी तर लिबियात, स्वतःचे स्वतंत्र ‘काऊंटर-ऑलिम्पियाड’च भरवले होते.
 
- २०१०चे डिजिटल चीटिंग स्कॅण्डल (रशिया) : फ्रेंच संघातील तीन खेळाडूंनी सामन्यादरम्यान संगणकीय चाल मिळवत, गुप्त कोडिंगद्वारे चोरी केल्याचे उघड झाले होते. म्हणून, फिडे’ने त्यांच्यावर बंदी घातली होती.
 
- २०२०चा ‘सर्व्हर क्रॅश’ वाद (ऑनलाईन ऑलिम्पियाड) : भारत आणि रशिया यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान, वैश्विक इंटरनेट सर्व्हर डाऊन झाला होता. यामुळे दोन भारतीय खेळाडूंचे कनेशन तुटले आणि त्यांना ‘पराभूत’ घोषित करण्यात आले. भारताने आक्षेप घेतल्यावर, ‘फिडे’ने दोन्ही देशांना ‘संयुक्त सुवर्णपदकविजेते’ घोषित केले होते.
 
त्यानंतर राजकीय आणि व्हिसा वाद उद्भवला होता. अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांमधील राजकीय तणावामुळे ,खेळाडूंनी सुरक्षिततेच्या कारणास्तव ऑलिम्पियाडमध्ये भाग न घेणे किंवा व्हिसा नाकारण्याचे वाद वारंवार घडले आहेत.
 
भारतीय बुद्धिबळपटूंना केंद्र सरकारचे पाठबळ आणि आर्थिक पाठिंबाही मिळत आला आहे. भारतीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांच्याद्वारे, ‘ऑल इंडिया चेस फेडरेशन’ला निधी मिळतो. खेळाडूंचा प्रवास खर्च, निवास, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विशेष राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरे आणि सॉफ्टवेअर व साहित्याचा खर्च, केंद्र सरकार व साई द्वारे केला जातो. ‘टॉप्स’ अर्थात ‘टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’चाही भारतीय बुद्धिबळाला सतत पाठिंबा मिळतो. गेल्या ऑलिम्पियाड आणि जागतिक स्पर्धांसाठी डी. गुकेश, प्रज्ञानानंद यांसारख्या अव्वल खेळाडूंना, केंद्र सरकारच्या ‘टॉप्स’ योजनेतून दरमहा भत्ता व वैयक्तिक प्रशिक्षणासाठी थेट आर्थिक मदत मिळत आहे. सरकारी निधीव्यतिरिक्त भारतीय खेळाडूंना, अनेक खासगी प्रायोजकही पाठबळ देतात. सरकारी व सार्वजनिक उपक्रम जसे ‘ओएनजीसी’, ‘इंडियन ऑईल’, रेल्वे आणि ‘भारत पेट्रोलियम’ या कंपन्या, अनेक खेळाडूंना नोकरी आणि थेट ‘स्पॉन्सरशिप’ही देतात. ‘अदानी समुह’ अनेक तरुण ग्रॅण्डमास्टर्सना आर्थिक मदत पुरवतो. बुद्धिबळातील सर्वांत मोठ्या स्पर्धा व खेळाडूंना ‘टाटा समूह’ प्रायोजित करते. ‘एमबीए फाऊंडेशन’, ‘ड्रीम-इलेव्हन’, ‘क्वांटबॉस’ यांसारख्या टेक व गेमिंग कंपन्या, स्पर्धांना ‘स्पॉन्सर’ करतात. ‘चेसबेस इंडिया’ भारतीय बुद्धिबळपटूंना ‘क्राऊडफण्डिंग’ आणि कॉर्पोरेट्सशी जोडून, स्पॉन्सरशिप मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावत असते.
 
असे हे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या स्वरूपात असो, अथवा जागतिक बुद्धिबळ विजेता असो, अथवा ‘जागतिक बुद्धिबळ महासंघ’ प्रशासन असो, सर्वत्रच चर्चेत आहे. ते सतत दिसत राहील, अशीच आपण खात्री बाळगूया. भारतीय बुद्धिबळ चिरायू राहण्याबरोबरच, भारतीयांचा हा खेळ अभिमानास्पद राहो, अशा शुभेच्छा आपण देऊया.
 
 
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४




संबंधित मजकूर