लग्न, संसार आणि कौटुंबिक जबाबदार्या सांभाळत असतानाच, पतीचा सामाजिक कार्याचा वारसा जपत विद्यार्थी घडवण्याचे कार्य करणार्या सुमित्रा गंगाधर गुर्जर यांच्याविषयी...
लग्न, संसार आणि कौटुंबिक जबाबदार्या सांभाळत असतानाच, पतीच्या प्रोत्साहनामुळे शिक्षणाचा ध्यास पूर्ण करत, आज इतर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणार्या सुमित्रा गंगाधर गुर्जर यांचा प्रवास प्रेरणादायीच! त्यांनी पतीचा सामाजिक कार्याचा वारसाही जपला. आदर्श शिक्षिका असलेल्या सुमित्रांचा जन्म दि. १२ मार्च १९३५ रोजीचा. त्यांचे वडील रामचंद्र जतकर रेल्वेत सेवेला, तर आई रंगूताई गृहिणी. सुमित्रांचे प्राथमिक शिक्षण कल्याणच्या ‘गर्ल्स हायस्कूल’मध्ये झाले. त्यांनी कलाशाखेची पदवी ‘एसएनडीटी’ महाविद्यालयातून मिळविली व पुढे त्यांनी ‘एमए’, ‘एमएड’ या पदव्याही संपादन केल्या.'
१९५५ मध्ये सुमित्रांचे लग्न झाले. त्यांचे पती डॉ. गंगाधर गुर्जर यांनी संस्कृतमध्ये ‘डॉक्टरेट’ मिळविली होती. तसेच, विविध सात विषयांतही त्यांनी ‘एमए’ केले होते. ते पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.१९५४ मध्ये ‘राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा’तर्फे संचालित, ‘राष्ट्रभाषा कोविद परीक्षे’त देशभरात सुमित्रा प्रथम आल्या. त्यांच्या या यशामुळेच डॉ. गंगाधर यांनी सुमित्रांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुमित्रा यांचे ‘एमए’ला हिंदी आणि संस्कृत हे विषय होते. लग्नानंतर कौटुंबिक जबाबदारी सांभाळतच त्यांनी, शिक्षण पूर्ण केले.
सुमित्रा यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा संजय हा ‘आयआयटी इंजिनियर’ असून, मुलगी डॉ. संहिता केळकर यांनी ‘एमडी मेडिसीन’ केले आहे. त्या सध्या ठाण्यात ‘प्रॅक्टिस’ करत आहेत, तर मुलगा श्रीराम याने ‘एमएससी’ पूर्ण केले आहे. त्यांचा आता स्वतःचा व्यवसाय करतात. सुमित्रा यांनी माध्यामिक शिक्षिका म्हणून, एकूण ३३ वर्षे सेवा दिली. अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयातून, त्यांनी शिक्षकी सेवेला प्रारंभ केला. नंतर त्या भारत सरकारच्या संरक्षण खात्यातर्फे संचालित ऑर्डनन्स फॅटरी विद्यालय, अंबरनाथ कार्यरत होत्या.
१९९३ला त्या माध्यमिक शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी, संस्कृत, समाजशास्त्राचे अध्यापन केले आहे. याशिवाय, त्यांची १९६९ ते १९७२ या काळात, पुणे विद्यापीठाच्या ‘बीएड’ परीक्षा (प्रात्यक्षिक) परीक्षक म्हणूनही नेमणूक झाली होती. १९६९ ते १९७५ या काळात त्यांनी ‘एसएससी’ परीक्षा परीक्षक म्हणूनही काम पाहिले. विविध शाळा व अनेक संस्थांत निबंध, वक्तृत्व, पाठांतर स्पर्धांसाठीही, परीक्षक स्वरूपात कार्य केले आहे. विविध शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही त्यांनी केले. १९९० ते ९३ या काळात त्यांनी, ‘आकाशवाणी मुंबई’च्या ‘अस्मिता वाहिनी’वर व्याख्यानेही दिली.
सुमित्रा यांचे पती हे सामाजिक कार्यात कार्यरत होते. त्यांनी ‘डोंबिवली ब्राह्मण सभे’चे अध्यक्षपद भूषविले आहे. ‘श्री गणेश मंदिर संस्थान’ आणि ‘भारतीय संस्कृतपीठ’तर्फे, भारतीय तत्त्वज्ञान वर्गात ते कार्यरत होते. त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा सुमित्रा यांनीही घेतला. त्यामुळेच सेवानिवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी त्यांनी खासगी शिकवणीही घेतली. आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना संस्कृतचे विनामूल्य अध्यापनही केले. विद्यार्थ्यांना मदत करणे, शैक्षणिक अडचणी दूर करण्याचे कामही सुमित्रा यांनी वयाच्या ८५व्या वर्षांपर्यंत केले आहे. अलीकडे वाढत्या वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केले. खासगी शिकवणी घेताना त्यांनी त्यामागे पैसे कमविणे, हा हेतू कधीच ठेवला नाही. गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण दिले.
त्यांना अध्यापन कार्यकालात १९८० मध्ये, ‘ऑर्डनन्स फॅटरी अंबरनाथ’कडून उत्तम अध्यापन कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते, तर दि. ५ सप्टेंबर १९९३ रोजी शिक्षक दिनानिमित्त, ‘ऑर्डनन्स फॅटरी बोर्ड कलकत्ता’ यांच्यातर्फे संचालित अखिल भारतातील प्राथमिक माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सर्वोत्तम शिक्षिका पुरस्कारही त्यांना मिळाला. या पुरस्काराच्या रक्कमेत स्वतःची भर घालून त्यांनी, शाळेलाच देणगी स्वरूपात रक्कम दिली. त्यातूनच त्यांच्या पतीच्या नावे, संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्याला दरवर्षी बक्षीस दिले जाते.
सुमित्रा यांचा ‘संस्कृत’ हा विषय आवडीचा असल्याने, त्यांची संस्कृतमधील दोन पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्यात ‘सार्थ संस्कृत सुभाषितमाला’ आणि ‘शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कृत निबंधमाला’ या दोन पुस्तकांचा समावेश होता. ‘सार्थ संस्कृत सुभाषितमाला’ या पुस्तकात, सुमारे १ हजार ३०० सुभाषिते व त्यांचा अर्थ दिला आहे, तर, दुसरे पुस्तक दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ‘सार्थ संस्कृत सुभाषितमाला’ हे पुस्तक सुमित्रा यांनी, पतीच्या स्मरणार्थ सुमारे ५०० शाळांना भेट दिले. सुमित्रा आता ९१ वर्षांच्या असल्या, तरीही आजही त्यांना पुस्तके वाचण्याचा छंद आहे. याशिवाय, सुमित्रा यांना बागकाम आणि शिवणकामाचीही आवड आहे. इमारतीच्या आवारातील झाडांना पाणी देण्याचे कामही त्या करत असत. लहान मुलांचे स्वेटर, बाळांचे कपडे बनविणे आणि ते लहान मुलांना भेट म्हणून देणे, यातही त्यांना एक वेगळाच आनंद मिळे असे. आयुष्यभर ज्ञानदान आणि अन्य मार्गातून समाजसेवाव्रताचे पालन करणार्या सुमित्रा गुर्जर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!