नवी दिल्ली (Al Qaeda Flydubai Threat) : "फ्लाय दुबई’च्या विमानातील कॉकपिटमध्ये जे घडले, तसे हल्ले भविष्यात होऊ शकतात,” अशी धमकीच ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रचारयंत्रणेने दिली आहे. "अमेरिका आणि इस्रायलची विमाने ही आमचे लक्ष्य आहेत,” असा इशाराही देण्यात आला आहे. ‘अल कायदा’समर्थक साप्ताहिकात दि. ३० सप्टेंबर रोजीचा ‘फ्लाय दुबई’ हल्ला आणि दि. ११ सप्टेंबर २००१ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत धमक्या दिल्याने विमान सुरक्षेबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे.
‘अल-बयान’मधील लेखाचे शीर्षक ‘सप्टेंबर ११ ते सप्टेंबर ३०’ असे आहे. लेखात ‘९/११’च्या हल्ल्यात ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर विमान आदळतानाचे छायाचित्र आणि ‘फ्लाय दुबई एफझेड १०७३’ घटनेचा संदर्भ देणारे चित्र वापरण्यात आले आहे. अमेरिकन, इस्रायली आणि इस्लामविरोधात लढणार्यांची विमाने अजूनही आकाशात आहेत आणि ती लक्ष्य बनू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. ‘९/११’ आणि दि. ३० सप्टेंबर रोजीच्या घटनांचा संदर्भ देत, "अशाच प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ शकते,” असा इशारा देण्यात आला आहे. (Al Qaeda Flydubai Threat)
हल्लेखोराचे कौतुक
‘अल कायदा’समर्थक प्रकाशनाने ‘फ्लाय दुबई’ विमानात हल्ल्याचा प्रयत्न करणार्या ओमानी सहवैमानिकाच्या कृत्याचे कौतुक केले आहे. (Al Qaeda Flydubai Threat)