"तिरुवल्लुवर यांचे ‘तिरुक्कुरल’ हे पुस्तक त्यांची ज्ञानपरंपरा, भाषा आणि सीमांचे बंधन झुगारून जगभर घेऊन जात आहे,” असे, पंतप्रधान मोदींनी ‘तिरुक्कुरल’ची रूसी भाषांतराची प्रत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देताना म्हटले. त्यानिमित्ताने ‘तिरुक्कुरल’ ग्रंथांची रचना, महत्त्व यांसह तिरुवल्लुवर यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
रत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून; त्याला एक सांस्कृतिक गाभाही आहे. भारतवर्षातील बहुभाषिकत्व, विविध प्रांतांतील बहुआयामी ज्ञानपरंपरा हीच भारताची खरी ओळख. संस्कृतमधील ‘वेद-उपनिषदे’, ‘भगवद्गीता’, ‘रामायण’, ‘महाभारता’पासून ते संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकारामांच्या साहित्यापर्यंत प्रत्येक भाषेत मानवी जीवन समजून घेण्याचा, ते अधिक समृद्ध करण्याचा एक विशिष्ट मार्ग सांगितला आहे. या मानवी जीवनाच्या तत्त्वांना एखाद्या भाषेच्या चौकटीत बांधून ठेवणे, खचितच अन्यायकारकच ठरेल, मग तो ग्रंथ तामिळ का असेना! तिरुवल्लुवर लिखित हा ‘तिरुक्कुरल’ ग्रंथ तर, भारतीय पारंपरिक साहित्यातील जणू एक अनुपम रत्नच. ‘तिरुक्कुरल’ हे नाव जरीन अपरिचित भासत असले, तरी त्यातील संदेश सृष्टीतील प्रत्येकाला दैनंदिन जीवनाशी संबंधित असल्यासारखाच वाटतो.
कोण आहेत तिरुवल्लुवर?
‘तिरुक्कुरल’ ग्रंथाचे ग्रंथकार तिरुवल्लुवर, हे एक थोर विचारवंत, नैतिक तत्त्ववेत्ता आणि महान कवी होते. बर्याच प्राचीन कवींप्रमाणे, यांच्याही जन्मकाळाविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयीही फारशी माहिती उपलब्ध नाही. पण, तामिळनाडूतील चेन्नई, म्हणजे तत्कालीन ‘मयिलापूर’ ही त्यांची जन्मभूमी-कर्मभूमी असल्याचे मानतात. ‘तिरुवल्लुवर’ हे नाव भारतीय साहित्यात अमर झाले, ते ‘तिरुक्कुरल’ ग्रंथामुळेच. यामुळेच त्यांची गणना काही महानतम कवींमध्ये होऊ लागली. आजही तामिळनाडूसह आजूबाजूच्या राज्यांमधील लोक, तिरुवल्लुवर यांचे श्रद्धेने स्मरण करतात. चेन्नईतील ‘वल्लुवर कोट्टम्’, कन्याकुमारीतील भव्य पुतळा आणि ‘तिरुवल्लुवर पुरस्कार’ हीही त्याच श्रद्धेचे प्रतीके.
‘तिरुक्कुरल’ काय आहे?
‘तिरुक्कुरल’ म्हणजे आदर्श जीवन जगण्याची कला शिकवणारा एक मार्गदर्शक ग्रंथ. व्यक्तीच्या जीवनोपयोगी गोष्टी, ‘सूत्र’रुपाने त्यात सांगितल्या आहेत. ‘तिरुक्कुरल’मध्ये १३३ अध्याय असून, प्रत्येकी दहा असे १ हजार ३३० ‘कुरल’ म्हणजेच द्विपदी श्लोकही आहेत. इतया शिस्तबद्ध पद्धतीने, संक्षिप्त रचनेत सामावलेले मानवी जीवनाचे पैलूच या ग्रंथाचे खरे वैशिष्ट्य ठरावे.
‘तिरुक्कुरल’ची विभागणी तीन ‘मुप्पल’ म्हणजेच भागांमध्ये केली जाते. पहिला भाग ‘अरम्’मध्ये ३८ अध्याय असून, त्यामध्ये सदाचार, नैतिकता आणि उत्तम जीवनाचा उपदेश आहे. दुसर्या भाग म्हणजे ‘पोरुल्’मधील अध्यायांची संख्या ७० असून, समाज, शासन, राजनीती, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक जीवनाबद्दल मार्गदर्शन यात केले आहे. यातील शेवटचा तिसरा भाग ‘इन्बम्’ म्हणून प्रसिद्ध असून, त्याच्या २५ अध्यायातून प्रेम आणि मानवीय भावनांचे उत्तम वर्णन केले आहे.
‘तामिळ वेद’ की ‘पाचवा वेद’?
अपार श्रद्धेपोटी, तामिळजनांमध्ये ‘तिरुक्कुरल’ला ‘वेदा’समान दर्जा दिला जातो. काहीजण याला ‘पाचवा वेद’च मानतात. ‘वेदां’मध्ये सत्य, धर्म, यज्ञ आणि जीवनातील मुख्य उद्देशांचे सविस्तर चिंतन आहे; तर ‘तिरुक्कुरल’मध्ये सत्य, सदाचार, करुणा, संयम, दान, न्याय, कर्तव्य, शासन आणि प्रेम यांसारख्या जीवनमूल्यांचे. त्यामुळे ‘तिरुक्कुरल’ आणि वेदांमध्ये थोडेफार साम्य असले, तरी त्याला ‘वेद’ मानण्याऐवजी भारतीय ज्ञानपरंपरेतील एक महान नैतिक ग्रंथच म्हणणे उचित ठरेल.
‘तिरुक्कुरल’ आणि भारतीय संतसाहित्यातील भाषावैविध्य आणि मानवता.
संस्कृतातील सुभाषिते कमी शब्दांत मोठी शिकवण देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ‘भगवद्गीता’ कर्म आणि कर्तव्यांबद्दल उपदेश करते; ‘पंचतंत्र’ व्यवहार आणि नीतीची शिकवण देते; ‘उपनिषदां’त गहन विचार सूत्ररूपातून मांडलेले आहेत. ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक ज्ञान लोकभाषेतून जनसामान्यांपर्यंत नेले, तुकारामांचे ‘अभंग’ आपल्याला भक्ती, विनम्रता आणि मानवतेचा संदेश देतात, कबीरांच्या ‘दोह्या’तून जीवनाचे अंतिम सत्य समजते. हे विविध संतांचे साहित्य विविध भाषा, प्रांतातील असूनही, मानवी जीवनोन्नतीसाठीच्या तळमळीने एकसुत्ररुप झाले आहे. याच सूत्रातील आणखी एक मोती म्हणजे, जीवनदर्शन घडवणारा ग्रंथ ‘तिरुक्कुरल!’
‘तिरुक्कुरल’च्या नुसत्या माहितीपेक्षा, त्यातील काही ‘कुरल’ समजून घेतल्यावरच त्याच्या भावसौंदर्याचे आकलन होते. एखादा भाव व्यक्त करण्यासाठी मधुर शब्द उपलब्ध असताना, आपण कटू शब्द का वापरावे? कटू शब्दांचा त्याग आणि मधुर वाणीचे महत्त्व सांगताना तिरुवेल्लुवर म्हणतात,
इनिय उलवाग इन्नाथ कूरल्|
कनियिरुप्पाग काइ कवर्न्थत्रु॥१००॥
अर्थात, मधुर शब्द असतानाही कटू शब्द उच्चारणे म्हणजे, पिकलेले फळ असतानाही, शेजारचे कच्चे फळ तोडण्यासारखेच आहे! हाच संदेश संत कबीर ’दोह्या’तून देताना म्हणतात,
ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय|
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होय॥
म्हणजेच, भाषिक भिन्नत्त्व असले, तरी कबीर आणि तिरुवेल्लुवर या दोन्ही संतांची शिकवण एकच आहे. आपल्या संतपरंपरेतील भक्ती, मानवता आणि ‘तिरुक्कुरल’मधील प्रेम संकल्पनेतील साम्यस्थळेही मनमोहकच.
अन्बिलार एल्लाम थमक्कु उरियर अन्पुदैयार्
एन्पुम उरियर पिरर्क्कु
अर्थात, ज्यांच्यात प्रेम नाही, ते सर्व काही आपल्या स्वतःचे मानतात; परंतु प्रेम असणारे मात्र आपले तन-मन इतरांनाच समर्पित करतात. संत एकनाथांनीही भक्तीमध्ये ईश्वर आणि समाजाप्रति समर्पणभाव ठेवण्यास सुचवले आहे. ‘मी’पासून ‘आपण’पर्यंतचा हा परंपरागत प्रवास तिरुवेल्लुवर यांनीही मांडला.
‘तिरुक्कुरल’चे अध्ययन म्हणजे केवळ आध्यात्मिक साधना नाही, तर त्यातून जीवनात व्यावहारिक साफल्य प्राप्त करणे. भारतीय संतसाहित्यात चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण मानल्या गेलेले ’इंद्रियसंयम’ आणि ’आत्मसंयमा’बद्दल सांगताना तिरुवेल्लुवर म्हणतात,
थाक्कम अमररुल उइक्कुम अदङ्कामै
आरिरुल यित्तु विदुम
अर्थात, संयम मनुष्याचा उद्धार करतो, तर असंयम त्याला खोल अंधकारात नेतो! भारतीय साहित्यातील क्षमा आणि नैतिक विजयाची भावनाही ‘तिरुक्कुरल’च्या ‘कुरल’मधून प्रतित होते. तिरुवेल्लुवर म्हणतात,
इन्न सेइदरै ओरुथ्थल अवर नान
नन्नयम सेइथ्थु विदल
अर्थात, आपले वाईट करणार्याला, स्वतःच्या वागण्याची लाज वाटेल, असे उत्तर द्यावे. यातून आपले वाईट करणार्याप्रतिही, क्षमाभाव ठेवण्याचीच शिकवण दिली आहे.
तिरुवेल्लुवर आणि वासुकी : एक सुई आणि एक वाटी पाणी
तिरुवेल्लुवरांच्याविषयी काही दंतकथा प्रसिद्ध आहेत. यात त्यांच्या पत्नी वासुकीची कथा विशेषरूपाने लोकप्रिय आहे. असे म्हटले जाते की, तिरुवेल्लुवर जेवायला बसताना पत्नी वासुकीला, नेहमी एक सुई आणि एक वाटी पाणी जवळ ठेवायला सांगत. वर्षानुवर्षे वासुकी तसे ठेवत होती. पण, तिरुवेल्लुवर मात्र कधीच ती वापरत नसत. शेवटी, तिने मृत्युशय्येवर असताना त्यांना विचारले की, "स्वामी, इतकी वर्षं तुम्ही सुई आणि पाणी जवळ ठेवण्यास सांगतिले, त्याचे नेमके कारण काय?” ते म्हणाले, "वाढताना जर एखादे शित खाली पडले, तर ते सुईने उचलायचे आणि पाण्याने लगेच साफ करायचे, जेणेकरून अन्नाचा एकही कण वाया जाऊ नये. यासाठीच ती योजना होती.” पण, वासुकी इतया काटेकोरपणे वाढत असे की, कधीही त्याची गरजच भासली नाही!
तामिळनाडूच्या ‘साहित्य अकादमी’मधील तिरुवेल्लुवरसंबंधी ग्रंथांमध्ये, ही कथा वाचायला मिळते. लहानश्या या गोष्टीतून, अन्नाचा मान, संसाधनांचा सन्मान आणि जीवनाप्रति सजगता सहज सांगितली आहे. दैनंदिन जीवनातील उदाहरणांतून केलेला हा तत्त्वबोध, नक्कीच वाचकांच्या काळजाला भिडतो.
तिरुवेल्लुवर आणि वासुकी यांच्या सहजीवनातील प्रसंगही प्रसिद्ध आहेत. एकदा वासुकी विहिरीतून पाणी शेंदत होती. पण, पोहरा वर काढते न काढते, तोच तिरुवेल्लुवर यांनी तिला हाक मारली. ती ऐकताच, दोरी सोडून देऊन ती प्रथम पतीसेवेत दाखल झाली. परंतु, आश्चर्य म्हणजे तो पोहरा विहिरीत न जाता, जागच्या जागीच राहिला! हा प्रसंग आजूबाजूचे लोक आ वासून पाहतच राहिले. मात्र, हा तिच्या पातिव्रत्याचाच महिमा असल्याचे किंवदंती म्हणतात.
तिरुवेल्लुवरांची स्मारके
तिरुवेल्लुवरांप्रतिच्या जनसामान्यांच्या भक्तिभावाची प्रचिती काही स्मारकांमधून येते. चेन्नईतील ‘वल्लुवर कोट्टम्’ हे त्यांना समर्पित मुख्य स्थान. तेथील रथसदृश मंदिर हा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. त्याच्या अंगणातील शिलांवर ‘तिरुक्कुरल’चे, सर्व १ हजार ३३० ‘कुरल’ कोरलेले आहेत.
कन्याकुमारीच्या मध्यसमुद्रातील भव्य पुतळाही तिरुवेल्लुवरांचाच आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की, ३८ फुटी चौथर्यावर उभा ९५ फुटी पुतळा म्हणजे, एकूण १३३ फूट उंची ही ‘तिरुक्कुरल’च्या १३३ अध्यायांचे प्रतीक! तसेच चौथर्याच्या ३८ फूट उंचीचा संबंधही, ग्रंथाचा प्रथम भाग ‘अरम्’च्या ३८ अध्यायांशी जोडण्यात येतो. त्यात सांगितलेल्या धर्म आणि सदाचाराच्या चौथर्यावरच जीवनातील अर्थ आणि आनंद उभा असतो, हीच शिकवण आपल्याला यातून मिळते.
तिरुवेल्लुवर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
महान संत तिरुवेल्लुवर यांच्या स्मरणार्थ तामिळनाडू सरकारतर्फे १९८६ पासून ‘तिरुवेल्लुवर’ पुरस्कार दिला जातो. राज्यात ‘तिरुवेल्लुवर दिवस’ही साजरा केला जात असून, या दिवशी तामिळ भाषा आणि साहित्य क्षेत्रातील विद्वानांचा गौरव करण्यात येतो.
‘तिरुक्कुरल’ आणि ‘मध्यवर्ती शास्त्रीय तामिल संस्थाना’चे योगदान
आजघडीला ‘तिरुक्कुरल’ तामिळनाडूच्या सीमा लंघून, परदेशांपर्यंत गेले आहे. विविध भाषांमध्ये याचे अनुवाद होऊन, त्याची शिकवण आज जगभरात पोहोचली आहे. अलीकडेच दि. ११ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना दिलेली ‘तिरुक्कुरल’ची ‘रूस’ भाषेतील प्रत त्याचेच द्योतक! "तिरुक्कुरल’ तिरुवेल्लुवर यांची ज्ञानपरंपरा भाषा आणि सीमांचे बंधन झुगारून जगभर घेऊन जात आहे,” असेही मोदी त्यावेळी म्हणाले. ‘तिरुक्कुरल’च्या संरक्षण, संवर्धन आणि प्रचार-प्रसारात ‘मध्यवर्ती शास्त्रीय तामिल संस्थाना’ चेही (उशपीींरश्र खपीींर्ळीीींंश ेष उश्ररीीळलरश्र ढराळश्र) मोठेच योगदान आहे. ज्ञानाला सीमा नसते या भावनेतूनच, या ग्रंथाचे विविध भाषांमध्ये अनुवाद दत करून, तिरुवेल्लुवरांचे कालजयी जीवनदर्शन जगभरात पोहोचवण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे.
तिरुवेल्लुवर आणि महाराष्ट्र : एक आत्मीय सेतू
‘तिरुक्कुरल’चे वैशिष्ट्य म्हणजे, एखादा जेव्हा पहिल्यांद्याच ग्रंथ वाचायला घेईल, तेव्हा त्याला त्यात काहीही अबोध भासणार नाही. कबीरांच्या वाणीतील माधुर्य, ज्ञानेश्वरांच्या संदेशाची लोकभाषेतील अभिव्यक्ती, नामदेवांची भक्ती, एकनाथांची नैतिक दृष्टी आणि तुकारामांची मानवता आणि आत्मसमर्पणाची भावना ‘तिरुक्कुरल’मध्ये ध्वनित होते. अर्थातच, या दोन परंपरांमध्ये साम्य असले, तरी त्या संपूर्ण ०एकरूप नक्कीच नाहीत. परंतु, त्यातील पुरुषाला ‘पुरुषोत्तम’ करण्याचा विचार, या रचनेला अमरत्व प्रदान करतो.
समारोप : इतिहासात तिरुवेल्लुवर यांच्याबद्दल फार माहिती उपलब्ध नाही, आहे त्याविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. परंतु, त्यांची शिकवण मात्र सातासमुद्रापार लोकप्रिय आहे. त्यांच्या केवळ १ हजार ३३० ‘कुरल’ म्हणजे, ‘द्विपदीं’मध्येच संपूर्ण जीवनाचा महासागर सामावला आहे. कबीरांचे ‘दोहे’ असो किंवा तुकारामांचे ‘अभंग’, ज्ञानेश्वरांची वाणी असो किंवा तिरुवेल्लुवरांचे ‘तिरुक्कुरल’, भारतातील कोणत्याही भाषेतील ग्रंथ संपूर्ण मानवजातीला सत्य, सदाचार, संयम, करुणा, कर्तव्य आणि प्रेम हीच शाश्वत मूल्ये शिकवतात. ‘तिरुक्कुरल’ हाही भारताच्या ज्ञानधारेचेच प्रतीक ठरावा. ‘तिरुक्कुरल’ हा फक्त एक ग्रंथ नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा सम्यक दृष्टिकोन आहे.
- प्रा. ललिता एन.
(लेखिका ‘तिरुक्कुरल’ ग्रंथाच्या मराठी अनुवादक असून, ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेत्या साहित्यिका आहेत.)