‘ऋणानुबंधाच्या जिथून पडती गाठी...’ प्रतिभाताई मोडक

    04-Oct-2026
 
 Pratibha Modak Snehanjali Award
 
सौ. अंजली रवींद्र घाटपांडे ‘स्नेहल प्रकाशन’च्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या ‘स्नेहांजली पुरस्काराने’ यंदा कवयित्री, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता प्रतिभाताई शाहू मोडक यांना आज सन्मानित करण्यात येणार आहे. मंदिर स्थापत्य व मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या शुभहस्ते पुण्यातील एस. एम. जोशी सभागृह, सदाशिव पेठ येथे सायंकाळी ६ वाजता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सुप्रसिद्ध गायिका मधुरा दातार यांचा प्रतिभाताईंशी असलेले त्यांचे ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
 
आयुष्याच्या प्रवासात काही माणसे अशी भेटतात, ज्यांच्या स्पर्शाने आपल्या जगण्याला एक वेगळाच दृष्टिकोन प्राप्त होतो. ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि अतिशय जिंदादिल व्यक्तिमत्त्व प्रतिभाताई शाहू मोडक, हे असेच माझ्या आयुष्यात आलेले एक अत्यंत जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे नाव!
 
त्यांचा आणि माझा हा स्नेहबंध कसा जुळला, हा एक विलक्षण योग आहे. दि. १७ मार्च २००१ रोजी भावे प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या माझ्या ‘स्वरमधुरा’ या कार्यक्रमाला त्या उपस्थित होत्या. तो कार्यक्रम ऐकल्यानंतर, दि. २५ एप्रिल २००१ रोजी सुप्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा मानाचा ‘शाहू मोडक पुरस्कार’ त्यांनी मला प्रदान केला. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज २५ वर्षांनंतरही तितयाच उत्साहाने आणि प्रेमाने सुरू आहे. या २५ वर्षांत त्यांनी मला केवळ एक कलाकार म्हणून नव्हे, तर स्वतःच्या मुलीसारखे प्रेम दिले.
 
प्रतिभाताईंचे व्यक्तिमत्त्व म्हणजे चैतन्याचा एक वाहता झरा! त्या उत्तम लेखिका आहेत, उत्कृष्ट कवयित्री आहेत आणि ज्योतिषाचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांची शेरोशायरी ऐकणे, हा तर एक सुरेख अनुभव असतो. वयाच्या ८७व्या वर्षीही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. चेहर्‍यावरचे ते विलक्षण प्रसन्न हसू, अतिशय टापटीप राहणीमान आणि साड्यांची अप्रतिम निवड... त्यांची उंच आणि देखणी व्यक्तिमत्त्वशैली त्या साड्यांमध्ये अधिकच खुलून दिसते. प्रतिभाताई पुण्यामध्ये आल्या आणि बघता बघता त्यांनी असंख्य माणसे जोडली. त्यांनी पुणेकरांना आणि पुणेकरांनी त्यांना अगदी मनापासून आपलेसे केले आहे.
 
माझ्या गायनावर त्यांचे विशेष प्रेम! आजही शय असेल तेव्हा त्या माझ्या कार्यक्रमाला आवर्जून येतात आणि भरभरून दाद देतात. माझ्या आवाजाची त्यांना इतकी काळजी असते की, कार्यक्रमादरम्यान त्या समोर बसून मला ‘रेकी’ (सकारात्मक ऊर्जा) देतात. कलाकाराला श्रोत्यांकडून मिळणारी ही दाद आणि हे संरक्षक कवच मिळणे, यातच कलाकाराचे खर्‍या अर्थाने सार्थक असते. त्या केवळ कलेच्या रसिक नाहीत, तर अतिशय सुगरणही आहेत; त्यांच्या हातचा बदामाचा शिरा तर आस्वाद घेणार्‍याच्या कायम लक्षात राहील असाच!
 
त्या सर्वार्थाने माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप मोठ्या आहेत. पण, तरीही एखाद्या मैत्रिणीशी गप्पा माराव्यात इतक्या सहजतेने त्या कोणत्याही विषयावर संवाद साधू शकतात. समाजकार्याची आवड असणार्‍या प्रतिभाताई शाहूरावांच्या आठवणी जपतानाच, विविध क्षेत्रांतील गुणवंतांना पुरस्कार देऊन त्यांना नेहमी प्रोत्साहन देतात.
 
गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझ्या गाण्याचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतः पुण्यातील प्रसिद्ध ‘पल्लोड’मधून माझ्यासाठी एक अतिशय सुंदर ड्रेस मटेरियल घेऊन त्याचा ड्रेस शिवून घेतला आणि वाढदिवसाच्या दिवशी तोच घालायला सांगितले. अतिशय दर्दी आणि सुजाण श्रोत्यांच्या उपस्थितीत तो सोहळा पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेत्री आशाताई काळे आणि ज्येष्ठ नृत्यांगना लीलाताई गांधी यांच्या उपस्थितीने त्या सभेला वेगळीच शोभा आली होती. त्या कार्यक्रमात गाण्याच्या तालावर त्यांनी धरलेला ठेका आणि त्यानंतरचे आत्मीयतेने दिलेले मेजवानीचे भोजन, हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.
 
आज २५ वर्षे झाली, प्रतिभाताई आणि आमचे नाते केवळ ओळखीचे राहिलेले नाही, तर ते पूर्णतः घरच्यासारखे झाले आहे. यालाच कदाचित ‘गेल्या जन्मीचे ऋणानुबंध’ म्हणतात.
 
आज दि. ४ ऑक्टोबर रोजी ‘स्नेहल प्रकाशन’तर्फे एस. एम. जोशी सभागृह येथे प्रतिभाताईंना त्यांच्या उत्कृष्ट लेखनासाठी अत्यंत मानाचा ‘स्नेहांजली’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रतिभाताईंच्या या यशाबद्दल मी, माझे आई आणि बाबा यांच्याकडून त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!
 
विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी ज्यांचे सूर अगदी सहज जुळून येतात, अशा या गुणग्राहक, समृद्ध आणि चैतन्यमयी व्यक्तिमत्त्वाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!
 
प्रतिभाताई ‘स्नेहांजली’ पुरस्काराबद्दल पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन!

- मधुरा दातार




संबंधित मजकूर