राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जनजागृती; नियमित रक्तदानाचे आवाहन

    04-Oct-2026
 
National Voluntary Blood Donation Day 
 
ठाणे : रक्ताचा एक थेंब एखाद्या रुग्णासाठी जीवनाची आशा ठरू शकतो. थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, मोठ्या शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी रक्तसाठा कायम उपलब्ध राहणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त ठाणे जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ‘मानवतेचा एक थेंब, रक्त द्या; जीव वाचवा’ या संदेशातून नागरिकांना नियमित स्वेच्छा रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत गेल्या वर्षभरात २ हजार ७०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाची ही माणुसकीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी नागरिकांनी गैरसमज दूर करून वर्षभर नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. महेंद्र केंद्रे, डॉ. दुबे, रक्तपेढीची टीम, नर्सिंग स्कूलच्या इन्चार्ज तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. पवार यांनी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदात्यांसाठी आवश्यक निकष आणि नियमित रक्तदानाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
 
एक रक्तदान, तीन रुग्णांना मदत
 
संकलित केलेल्या रक्तापासून प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि पॅक्ड सेल्स असे तीन प्रमुख घटक तयार केले जातात. त्यामुळे एका रक्तदानातून मिळालेल्या रक्तघटकांचा उपयोग तीन वेगवेगळ्या रुग्णांसाठी होऊ शकतो. मानवी रक्ताला अद्याप कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा साठा राखण्यासाठी स्वेच्छा रक्तदानाला विशेष महत्त्व आहे.
 
१८ ते ६० वर्षे वयोगटातील, ४५ किलोपेक्षा अधिक वजन आणि १२.५ ग्रॅमपेक्षा अधिक हिमोग्लोबिन असलेले नागरिक वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदान करू शकतात. रक्तदानापूर्वी रक्तदात्याचा रक्तदाब, वैद्यकीय इतिहास आणि आवश्यक आरोग्यविषयक बाबी तपासल्या जातात. त्यानंतर साधारण ३५० मिली रक्त संकलित केले जाते.
 
थॅलेसेमिया, सिकलसेल, कर्करोग, रक्तक्षय असलेले रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रिया तसेच गर्भवती मातांच्या उपचारांमध्ये रक्ताची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे केवळ एखाद्या आपत्कालीन प्रसंगी नव्हे, तर वर्षभर नियमित स्वेच्छा रक्तदान करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रक्तदानाची प्रतिज्ञा देण्यात आली.
 
रक्तदाता म्हणजे आशेचा किरण
 
“रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याचे जीवन वाचविण्याची संधी आहे. रक्ताला पर्याय नसल्याने नागरिकांनी गैरसमज दूर करून नियमितपणे स्वेच्छेने रक्तदान करावे. प्रत्येक रक्तदाता हा कोणाच्या तरी जीवनातील आशेचा किरण ठरतो.” – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे




संबंधित मजकूर