देवदारांच्या वनातील देवांची नगरी - जागेश्वर

    04-Oct-2026
 
Jageshwar Temple Uttarakhand
 
हिमालयातील देवदारांच्या घनदाट जंगलातून, एक अरुंद रस्ता खाली उतरतो. दोन्ही बाजूंना आकाशाला भिडणारे देवदार, त्यांच्या गर्द फांद्यांमधूनच सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या शांत जंगलातून पुढे जाताना, अचानक झाडांच्या मधून एक दगडी शिखर दिसते. त्याच्याच मागे दुसरे, मग तिसरे. काही क्षणांतच आपल्यासमोर दगडी शिखरांचे एक छोटेसे नगरच उभे राहते. एक-दोन नव्हे, शंभराहून अधिक मंदिरे! हे आहे उत्तराखंडातील अल्मोडा जिल्ह्यात वसलेले जागेश्वर!
 
जागेश्वरला शिव मंदिर म्हणणेच मुळात अपुरे. येथे सुमारे १२५ मंदिरे आणि जवळपास १७४ शिल्पांची नोंद आहेे. मंदिरांच्या भिंती आणि स्तंभांवर, २५हून अधिक शिलालेख आढळले आहेत. हा पवित्र परिसर जवळपास साडेतीन किलोमीटरपर्यंत पसरला आहे. पण, या मंदिरांचे वय नेमके किती?
 
जागेश्वरविषयीच्या लोकप्रिय कथनांमध्ये, कधीकधी या मंदिरांना अडीच हजार वर्षे प्राचीन म्हटले जाते. मात्र, आज आपल्याला दिसणारी मंदिरे सरसकट इतकी प्राचीन मानणे योग्य नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या नोंदीनुसार, येथील शिलालेख आठव्या शतकात येथे देवालये अस्तित्वात असल्याचे निश्चितपणे सांगतात. कदाचित त्याआधीही येथे उपासनेचे केंद्र असावे. पुढे मध्य हिमालयातील कत्युरी राजांच्या काळात, मोठ्या प्रमाणावर मंदिरनिर्मिती आणि पुनर्बांधणी झाली. नंतरच्या काळातही हा प्रवास थांबला नाही. म्हणूनच, जागेश्वर एका राजाने एका काळात उभारलेले मंदिर नाही. पिढ्यान्पिढ्या वाढत गेलेले एक धार्मिक केंद्र आहे.
 
यातील सर्वांत प्राचीन आणि महत्त्वाच्या देवालयांपैकी एक म्हणजे, महामृत्युंजय मंदिर! साधारण आठव्या शतकातील हे पूर्वाभिमुख मंदिर नागर स्थापत्य परंपरेतील आहे. त्रिरथ गर्भगृह, अंतराळ, स्तंभयुक्त मंडप आणि त्यावर उंचावत जाणारे वक्ररेषीय शिखर अशी त्याची रचना. शिखरावरील शुकनासिकेत असलेली एक प्रतिमा मात्र जागेश्वरच्या कथेला आणखी खोलवर घेऊन जाते. ही प्रतिमा आहे शिष्यांसह लकुलीश!
 
लकुलीश हे पाशुपत शैव परंपरेशी जोडलेले आचार्य. त्यामुळे जागेश्वरकडे केवळ शिवभक्तीच्या दृष्टीने न पाहता, मध्ययुगीन हिमालयातील शैव साधना आणि संप्रदायांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पाहणेही आवश्यकच. याच परिसरातील प्रमुख जागेश्वर महादेव अर्थात स्थानिक परंपरेतील जागनाथ मंदिरही, साधारण आठव्या शतकातील मानले जाते. पश्चिमाभिमुख मंदिराचे गर्भगृह त्रिरथ असून, त्यावर नागर शैलीतील वक्ररेषीय शिखर आहे, पुढे मंडप. काळाने त्याच्या मूळ रचनेत काही बदल केले असले, तरी त्या दगडी वास्तूमधून हिमालयातील प्रारंभिक मंदिर स्थापत्याची भाषा आजही वाचता येते. पण, जागेश्वरची खरी गंमत आहे ती शिखरांच्या समूहात.
 
एका मंदिरामागून दुसरे मंदिर, त्याच्या शेजारी आणखी एखादे छोटे देवालय, मधे दगडी अंगण आणि या सगळ्यांच्या पाठीशी उभे असलेले प्रचंड देवदार. काही मंदिरे शिवाची, काही सूर्याची, नवग्रहांची, नवदुर्गेची, कालिकेची, नीलकंठेश्वराची. कुमाऊं प्रशासनाच्या नोंदीनुसार, महामृत्युंजयानंतर जागेश्वर, नवदुर्गा, कालिका, पुष्टिदेवी, बालेश्वर आदी देवालये प्रारंभिक कत्युरी काळाशी; तर सूर्य, नवग्रह आणि नीलकंठेश्वर यांसारखी मंदिरे पुढील टप्प्यांशी जोडली आहेत. म्हणजेच, आज आपल्या डोळ्यांना एकाच वेळी दिसणार्‍या शिखरांमध्ये, प्रत्यक्षात अनेक शतकांचा इतिहास एकत्र उभा ठाकला आहे.
 
थोडे पुढे गेल्यावर या पवित्र भूगोलाचा आणखी एक अध्याय उलगडतो, तो म्हणजे दंडेश्वर! देवदारांच्या जंगलात स्वतंत्रपणे उभा असलेला दंडेश्वर मंदिरसमूह, १४ मंदिरांचा आहे. मुख्य देवालयात शिवलिंग म्हणून, एका विशाल नैसर्गिक शिळेचीच उपासना केली जाते. इथे एक प्रश्न असाअ पडता की, मंदिरामुळे ही भूमी पवित्र झाली की, ही भूमी आधीच पवित्र असल्यामुळे येथे मंदिरे उभी राहिली? हिमालय, देवदाराचे वन, नैसर्गिक शिळांची उपासना आणि पुढे त्याच परिसरात १००हून अधिक दगडी देवालयांची निर्मिती झाली. जागेश्वरकडे पाहताना निसर्ग आणि मंदिरांमधील सीमा हळूहळू विरघळते.कदाचित, म्हणूनच या ठिकाणासाठी ‘पवित्र भूचित्र’ ही संकल्पना अधिक समर्पक वाटते.
 
जागेश्वरच्या पुरातत्त्व संग्रहालयात गेल्यावर, या इतिहासाचे आणखी एक दालन उघडते. मंदिरांच्या संरक्षणासाठी हलवण्यात आलेल्या अनेक सुंदर प्रतिमा येथे आहेत. नृत्य करणारा गणेश, नंदीवर विराजमान उमामहेश्वर, सूर्य आणि इतर देवप्रतिमा पाहताना, हिमालयातील शिल्पकारांची स्वतंत्र कलाभाषाही जाणवते. नवव्या ते तेराव्या शतकांतील, अनेक कलावस्तू येथे जतन करण्यात आल्या आहेत. त्यानंतर येतो जागेश्वरशी जोडलेला सर्वांत प्रसिद्ध प्रश्न, तो म्हणजे हे द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे का?
 
स्थानिक धार्मिक परंपरेत, जागेश्वराला द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी ‘नागेश ज्योतिर्लिंग’ मानले जाते. कुमाऊं प्रशासनाची अधिकृत नोंददेखील, त्याचा उल्लेख locally revered अर्थानेच करते. भारतातील इतर स्थळांशीही नागेश ज्योतिर्लिंगाची ओळख जोडली जात असल्याने, जागेश्वरची ही ओळख इतिहाससिद्ध निर्विवाद निष्कर्ष म्हणून न मांडता, स्थानिक आणि तीर्थ परंपरेतील श्रद्धा म्हणूनच समजून घेणे अधिक योग्य ठरेल.
 
आदि शंकराचार्य जागेश्वरला आले आणि त्यांनी, येथील देवालयांचे पुनरुज्जीवन केल्याची मान्यता आहे. ‘एएसआय’च्या नोंदीतही या पुनर्रचनेचे श्रेय, शंकराचार्यांनाच दिले जाते. मात्र, याकडेही ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध घटना आणि परंपरा यांच्यातील फरक लक्षात ठेवूनच पाहायला हवे. जागेश्वरला भेट देताना, म्हणूनच फक्त मुख्य मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडू नका. एका देवालयाच्या जगतीवर काही क्षण बसा, समोरच्या शिखराकडे पाहा, महामृत्युंजयाच्या शुकनासिकेतला लकुलीश शोधा, दंडेश्वरच्या नैसर्गिक शिळेकडे पाहा, संग्रहालयातील उमामहेश्वर पाहा आणि मगच या सगळ्यापासून नजर काढून एकदा वरच्या देवदारांकडे पाहा. तेव्हा कदाचित जाणवेल की, जागेश्वरचे खरे मंदिर कोणते हे ठरवणेच कठीण आहे!
 
जागेश्वर आपल्याला एका मंदिराचेच दर्शन घडवत नाही; ते मंदिर, नदी, पर्वत, वन आणि श्रद्धा यांनी मिळून पवित्र भूगोल कसा निर्माण होतो, हे अनुभवायला शिकवते. म्हणूनच, हिमालयाच्या त्या शांत दरीतून परतताना आपल्या स्मरणात राहते, ती देवदारांच्या वनात दडलेली-देवांची एक संपूर्ण नगरीच!
 
इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४




संबंधित मजकूर