ठाणे (Thane-Palghar Banned Tobacco Seizure): महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांची अवैध वाहतूक आणि साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ठाणे-पालघरमध्ये धडक मोहीम राबवली. ठाणे झोन-१०, पालघर झोन-१ आणि ठाणे झोन-७ अंतर्गत केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि तीन वाहने असा तब्बल २ कोटी ६९ लाख २९ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणांत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, प्रतिबंधित पदार्थांच्या मागे संघटित रॅकेट आहे का, याचाही तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Thane-Palghar Banned Tobacco Seizure)
येवई ब्रिजजवळ १ कोटीचा मुद्देमाल
ठाणे झोन-१०च्या पथकाला प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक येवई ब्रिज परिसरातून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने Eicher ट्रक (MH-18-BZ-4528) अडवून तपासणी केली.
ट्रकमध्ये Premium Raj Niwas Pan Masalaची २७ हजार ५४० पाकिटे, किंमत ५५ लाख ८ हजार रुपये, तसेच ZN-01 Zafrani Zardaची २७ हजार ५४० पाकिटे, किंमत २६ लाख ४३ हजार ८४० रुपये, असा एकूण ८१ लाख ५१ हजार ८४० रुपयांचा प्रतिबंधित माल आढळला. याशिवाय सुमारे २० लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. त्यामुळे या कारवाईतील एकूण जप्ती १ कोटी १ लाख ५१ हजार ८४० रुपये इतकी आहे.
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारोटीमध्ये ६३.५० लाखांचा माल जप्त
पालघर झोन-१ अंतर्गत चारोटी टोलनाका परिसरातही मोठी कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करून विक्रीच्या उद्देशाने साठवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने कारवाई केली. या कारवाईत ४३ लाख ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित माल आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचा Eicher Closed Body Truck (TG12U4371) जप्त करण्यात आला.
या प्रकरणात वाहनचालक फिरोज खाजा मिया सय्यद याच्यासह आणखी सहा आरोपींचा सहभाग आढळून आला आहे. कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री यामागे संघटित स्वरूप आहे का, याचा तपास करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात MCOCA लागू होतो किंवा नाही, याबाबत तपास करून पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डोंबिवली प्रकरणात १.१४ कोटींची जप्ती
ठाणे झोन-७च्या कारवाईतही प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात सोनारपाडा, डोंबिवली पूर्व येथील विनय शर्मा याच्याविरुद्ध खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद रफिक रती खान (३१) याला अटक करण्यात आली.
या कारवाईत ८४ लाख २८ हजार २० रुपयांचा प्रतिबंधित माल आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. त्यामुळे या टप्प्यातील जप्ती १ कोटी ४ लाख २८ हजार २० रुपये आहे. यापूर्वीच्या कारवाईसह या प्रकरणातील एकूण जप्ती १ कोटी १४ लाख १३ हजार ५८० रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या प्रकरणातही प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री यामागील संघटित स्वरूपाचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MCOCA लागू होतो किंवा नाही, याबाबतही तपास सुरू आहे.
एकाच मोहिमेत कोट्यवधींचा माल जप्त
ठाणे झोन-१०, पालघर झोन-१ आणि ठाणे झोन-७च्या कारवायांमध्ये प्रतिबंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम पदार्थांसह वाहने जप्त करण्यात आली. या तीन कारवायांची एकत्रित जप्ती २ कोटी ६९ लाख २९ हजार ८६० रुपये इतकी आहे. प्रतिबंधित पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही विशेष मोहीम आणि कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. (Thane-Palghar Banned Tobacco Seizure)