ठाणे : अंबरनाथ नगरपालिकेची महासभा सुरू असताना पालिकेबाहेर उभ्या असलेल्या संशयास्पद चारचाकी वाहनातून हत्यारे सापडल्याच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. त्या दिवशी भाजप नगरसेवक पवन वाळेकर यांना संपवण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे. या प्रकरणात शिवसेना कार्यकर्ते योगेश गोरे यांचा सहभाग असल्याचा दावा करत त्यांना सहआरोपी करण्याची मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे. (Ambernath Weapons Case)
अंबरनाथ पालिकेची महासभा सुरू असताना नाट्यमंदिराबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून छोटी तलवार आणि दांडके पोलिसांनी जप्त केले होते. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, भाजप नेते गुलाबराव करंजुले पाटील, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, गटनेते अभिजित करंजुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. वाहनातून हत्यारे सापडल्यानंतर योगेश गोरे यांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याचा आणि वाहनातील व्यक्ती आपलेच असल्याचे पोलिसांना सांगितल्याचा दावा भाजपने केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओ पोलिसांना पुरावा म्हणून सादर केल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले. (Ambernath Weapons Case)
"अंबरनाथमध्ये यापूर्वीही नगरसेवकांना संपवण्याचे प्रकार झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पवन वाळेकर यांना लक्ष्य करण्याचा कट होता," असा आरोप भाजपने केला आहे.
या प्रकरणातील तपासावर पवन वाळेकर यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. हत्यारांनी भरलेल्या वाहनाची माहिती सर्वप्रथम आकाश वाळेकर यांनी पोलिसांना दिली असताना, त्यांना फिर्यादी न करता पोलिस कर्मचाऱ्याला फिर्यादी का करण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच योगेश गोरे यांना सहआरोपी करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Ambernath Weapons Case)
दरम्यान, एसीपी शैलेश काळे यांनी भाजपकडून सादर करण्यात आलेल्या व्हिडीओसह सर्व बाबींची दखल घेऊन सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. (Ambernath Weapons Case)