‘ज्ञानू इट्स डन ब्रो...’ म्हणत, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार्या अभिजीत दीपकेने त्याच्या आयुष्यात एक नगरसेवकाची निवडणूक जिंकून दाखवावी. तिथेही तो जिंकून येणार नाहीच म्हणा! तरीही, दीपक्याची हौस काय, तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याची! नुकतेच या झुरळांनी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये परवानगी नसताना तिथे आंदोलनाच्या नावावर स्थानिकांना त्रास दिला. त्याला मुंबईच्या समाजनिष्ठ युवापिढीने चोख उत्तर दिले. ज्यांना दीपक्या आणि त्याचे ते ‘आंदोलनजीवी’ आदर्श वाटतात, त्यांनी या लोकांना घरी घेऊन जावे. आपली मुले झुरळासारखी व्हावीत, यासाठी प्रयत्न करावेत. तर, झुरळाचा मुंबईतील उपद्रव आणि मुंबईकर याचा मागोवा आजच्या लेखातून घेतला आहे. त्यावेळी मुंबईकरांच्या भावना आहेत,‘पॅकअप करण्याची वेळ झाली सत्तापिपासू कपटी ब्रो!!!’
नुकतेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कात झुरळांचे आंदोलन झाले. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या लोकांना अभिजीत दीपक्यासारखे आणि त्याच्या समर्थकांसारखी आपली मुलेबाळे व्हावीत, असे वाटत असेल का? कारण, झुरळ आंदोलनात नशेडी आणि स्वैराचाराने उद्ध्वस्त झालेली मुले-मुलीही हिरिरीने सहभागी झालेली दिसली. आंदोलनात सहभागी झालेली १३-१४ वर्षांची एक मुलगी म्हणाली, "पुरुषांच्या लैंगिक वर्चस्वाविरोधात दक्षिण कोरियामध्ये असे आंदोलन सुरू आहे, म्हणून मी या आंदोलनात आले.” तर, एक नाजूकसाजूक मुलगा म्हणाला, "मी गुजरातहून पळून आलो आहे. माझ्या घरातले काय म्हणाले, तर मी त्यांच्यावर केसच ठोकेन.” मोदींच्या तेराव्याचे समोसे वाटणारी ती दिल्लीची मुलगी आठवली का? बीभत्स, अश्लील हरकती करणारी ती मुले-मुली? या मुलांना पाहून वाटते की, ड्रग्ज घेऊन ‘झोंबी’ झालेली व्यसनी मुले आणि ही मुले यांच्यात काय फरक आहे? समाजमूल्य, वास्तव यांपासून ही मुले दूर आहेत. त्यांचे विचार समाजासाठी आणि दस्तुरखुद्द त्या मुला-मुलींसाठीही योग्य आहेत का? व्यक्तिस्वातंत्र्य आहे; पण आपल्या डोळ्यांसमोर ही काही मुले विकृतीकडे जात असून, झुरळ आंदोलनात त्याला खतपाणी मिळत आहे.
पिंड असलेले आजोबा! काय म्हणावे...
मुंबईतील झुरळ आंदोलनात तरुणांसह अनेक वयोवृद्ध लोकही सामील होते. यादरम्यान एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूही झाला. आंदोलनात सहभागी एक आजोबा तर म्हणाले की, "माझा पिंडच आहे. मला माहिती नाही कशासाठी आंदोलन आहे.” तर, एक आजोबा ‘वोटचोरी’ झाली म्हणत होते. त्यांना प्रश्न विचारला, कशी झाली वोटचोरी? तर, आजोबांकडे उत्तर नव्हते. आमिष दाखवून किंवा काहीबाही खोटे सांगून आणलेले हे लोक! यातले काही लोक तर असेही होते की, ज्यांची अख्खी हयात हिंदूविरोधात गेली. आता राम मंदिर बनवणारे भाजप सरकार आले म्हणून, तसेच भारत जगभरात स्वतःचा ठसा उमटवत असल्याने पोटशूळ उठलेलेही लोक होतेच. झुरळ आंदोलनामुळे सज्जनशक्तीविरोधातील या लोकांना एक सडके मडके का होईला; पण व्यासपीठ मिळाले.
असो, तर मुंबईत आंदोलनाच्या नावावर झुरळ दीपक्याने नक्कल केली. या आंदोलनाचा विषय कोणताही असला, तरी मुख्य मागणी होते ती म्हणजे, ज्ञानेश कुमारांसह नरेंद्र मोदींनीही राजीनामा द्यावा! आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे आपण आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांच्या विधानाची नक्कल ‘मी पुन्हा येईन’ म्हणून केली. काय म्हणावे या अतिआत्मविश्वासाला? संविधानाने निर्देशित केलेल्या प्रक्रियेतून पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींचा राजीनामा मागणारा कोण? तर, देश सोडून परदेशात गेलेला आणि अचानक देशाच्या समस्यांचा साक्षात्कार झालेला दीपके? ज्या छत्रपती संभाजीनगरला तो राहतो, तिथून मुंबईला यायला-जायला पूर्वी किती तास लागायचे आणि आता मोदी-फडणवीसांच्या राज्यात प्रवासाला किती वेळ लागतो, हे तरी दीपक्याच्या डोक्यात येते का? पण, छे! देशाच्या पायाभूत सुविधांचा झालेला विकास किंवा सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने झालेली प्रगती कळून घ्यायची लायकी दीपक्याची नाही. मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवांचे, समाजाचे नुकसान होऊ नये आणि त्या आंदोलनातल्या बीभत्सतेमुळे देशाची प्रतिमा खराब होऊ नये, म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही घेतला. पण, त्यामुळे झुरळाला फुशारकी आली. आपण आता काय वाटेल ते करू शकतो, असा त्याला भलताच आत्मविश्वास आला. त्यामुळेच कधी शाळेच्या नावाने, तर कधी ‘एसआयआर’ प्रक्रियेविरोधात हे झुरळ घाण करू लागले आहे. तरीही, झुरळ आंदोलनात लोक का जमतात? तर जाणवते की, एकतर खोटी माहिती देऊन, चिथावणी देऊन त्यांना आंदोलनस्थळी आणलेले असते. तसेच, ‘मेरा लिंग, मेरी मर्जी’ म्हणत, अवास्तव स्वैराचारासाठी कमरचे सोडून डोेक्यालाही न गुंडाळणारे लोक, काही पुरुषांसारखे दिसणारे लोक, स्त्रियांचे कपडे घालून नाचणारे लोक, हे सगळे पाहायला-अनुभवायला मिळते. त्याचबरोबर खायची-प्यायची सोय होते, म्हणून काही हौशी जीव या आंदोलनात सहभागी होतात. तसेच ज्यांना भाजपची सत्ता आल्यापासून पोटात मुरडा उठला, अशा काही विशिष्ट पक्षाचे लोकही या आंदोलनात असतात.
झुरळाचे ‘फेक नॅरेटिव्ह’
‘एसआयआर’ प्रक्रियेद्वारे लोकांची नावे निवडणूक यादीतून रद्द झाली, म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी झुरळांनी आंदोलनाचा घाट घातला. देशातील दुबार मतदान करणारे, तसेच मृत पावलेल्या लोकांची मतदार यादीतून नावे काढून टाकण्यासाठी ‘एसआयआर’ प्रक्रिया आहे, हे स्पष्ट आहे. त्याविरोधात काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या. त्यावर आधारित साक्षी-पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात खटला उभा राहीलच. पण, ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, झुरळांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले. झुरळ स्वतःला संविधानयुक्त न्यायालयापेक्षा श्रेष्ठ समजू लागले आहेत. ‘समाजाला मूर्ख बनवण्याचे १०१ फंडे’ हा दीपक्याच्या आंदोलनाचा प्राणबिंदू. त्यामुळेच, "देशातील गोरगरीब आणि अज्ञानी, संधी न मिळालेल्या नागरिकांचा मतदानाचा हक्क ज्ञानेश कुमार यांनी हिरावून घेतला. त्यांची नावे मतदारयादीतून काढून टाकली आणि भाजप जिंकला,” असा खोटा समज तो पसरवत आहेत. अर्थात, यात तथ्य नाही, हे पुराव्यासकट प्रशासनाने सिद्ध केले. तसेच भटके-विमुक्त, अनाथ आणि बेघर लोकांसाठी ‘एसआयआर’ पद्धतीत सुलभ तरतूद असून, त्यामुळे या बांधवांची नावे मतदारयादीतून रद्द होणार नाहीत, याचेही पुरावे दिले. पण, लोकांना हे पाहण्यात स्वारस्य नसते. रस्त्यावर जर याच विषयावर गर्दी जमली आणि त्यात आक्षेपार्ह कृत्य, शिवीगाळ आणि विकृत मनोरंजन दिसले, तर लक्ष जाते. मोबाईलवरही याबाबत रतीब घातल्यासारख्या रील्स येतात. या रील्समधून लोकांच्या मनात काय बिंबवले जाते तर, "वोटचोरी झाली, सगळ्या गोरगरिबांची नावे मतदारयादीतून रद्द होणार, फक्त उच्चवर्णीय श्रीमंतांची नावेच या यादीत राहणार आणि तेच लोक मतदान करून भाजप जिंकवणार.” ही अतिशयोक्ती वाटेल; पण सत्य हेच आहे. दिल्लीच्या जंतरमंतर आंदोलनात काय झाले, हेच झाले ना?
मुंबईत काय झाले?
मुंबईतही झुरळांना हेच करायचे आहे. पण, मुंबईकर काही दीपक्यासारखे रिकामटेकडे नाहीत. त्यांनी दीपक्याच्या झुरळ आंदोलनाकडे कसे पाहिले? त्यांनी झुरळ आंदोलनाला विरोध केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या २०१३ मधील एका निवाड्याचा दाखला देत, अॅडव्होकेट सिद्धी देवळकर यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. तरीही, ‘सीजेपी’च्या लोकांनी एखाद्या उपद्रवी गटाप्रमाणे गर्दी जमा केली आणि निदर्शने केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास झाला, असे तक्रारीत म्हटले. त्यांच्या म्हणण्याला बहुसंख्य मुंबईकरांनी पाठिंबा दिला. नव्हे, काम सोडून कधीच विनाकारण कोणत्याच बाबीत न गुंतणारा मुंबईचा खरा ‘जेन-झी’ युवावर्ग झुरळ आंदोलनाविरोधात मुंबईमध्ये रस्त्यावर उतरला. पण, तरी आताही सोशल मीडियावर पाहिले, तर दीपक्याचे चिरक्या आवाजातले केकाटणे जास्तीत जास्त वेळा दिसते. झुरळाला समर्थन म्हणून नसरुद्दीन शहा, विशाल ददलानी आणि त्याच मानसिकतेचे लोक कसे दीपकेला मिठ्या मारून गेले हे दिसते. लोक कसे भाजप, मोदीविरोधात बोलत आहेत हे दाखवण्याच्या खटाटोपामध्ये मुद्दाम मोदी-भाजपविरोधी लोकांची विधाने दिसत आहेत. ‘पेड प्रमोशन’ आणि अशाच प्रकारचे उपद्व्याप केल्याशिवाय हे शक्य नाही. पण, या माध्यमातून जनतेच्या मनात संभ्रम पसरवणेे आणि द्वेषाची बीजे रोवली जात आहेत. हे ‘पेड प्रमोशन’ करणारे ‘झारीतले शुक्राचार्य’ कोण असतील? कारण, दीपक्याच्या मते, तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
झुरळ आंदोलन एक ‘लिटमस टेस्ट’
या परिप्रेक्ष्यात वाटते की, झुरळाचा मोर्चा ही एक ‘लिटमस टेस्ट’ असते. जर झुरळाच्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला देशभरातून समर्थन मिळाले, तर लगेच तो विषय घेऊन आंदोलन करायचे. जसे मागे झुरळाचे आंदोलन झाले आणि त्यानंतर लगेच राहुल गांधींसह उबाठा आणि मनसेने आंदोलन केले होते, आताही तसेच. दुसरीकडे दीपक्या संविधान आणि डॉ. बाबासाहेबांचे नाव घेतो. (ज्यांच्याबद्दल त्याच्या मनात जराही आदर नाही, असे दिसते) तसेच झुरळ आंदोलनात हिंदूविरोधी विधाने होतात. त्यामुळे आपले हक्काचे मतदार दीपक्याकडे जातात, अशी धास्ती काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीलाही वाटते. मग काय? दीपक्याच्या आंदोलनाआधी लगेच वंचित बहुजन आघाडीने, ‘भारताने इराणला पाठिंबा द्यावा’ यासाठी मोर्चा काढला. त्यामुळे मुस्लीम खूश होतील, असे या पक्षाला वाटत असावे, असे दिसते. यावरून वाटते की, झुरळ पार्टीमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाला राजकीयदृष्ट्या काही फरक पडत नसल्याचे स्पष्ट दिसते, तर दुसरीकडे विरोधी पक्ष धास्तावला आहे. या परिप्रेक्ष्यात ‘ज्ञानू इट्स डन ब्रो’ म्हणत, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मागणार्या दीपकेने समजून जावे की, समाजाला तुझे फुटीरतावादी आणि सत्तापिपासू अंतरंग समजले आहेत. त्यामुळेच आता तुझी ‘पॅकअप’ करण्याची वेळ आली आहे, सत्तापिपासू कपटी ब्रो!
९५९४९६९६३८