मनोहर शुक्ल : शब्दांची सावली आणि मनाची भरारी

    04-Oct-2026
Manohar Shukla Marathi Literature
 
काही माणसे त्यांच्या लेखनातून मोठी ठरतात, तर काही माणसे त्यांच्या माणुसकीमुळे. मनोहर रामचंद्र शुक्ल हे या दोन्हींचा सुंदर संगम होते. त्यांच्या कवितेत जगण्याच्या वेदना होत्या, समाजाविषयीची अस्वस्थता होती, अध्यात्माचा शोध होता आणि माणसाविषयीची खोल आस्था होती. पण, या शब्दांमागचा माणूस त्याहून मोठा होता. नवोदितांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा, चुका प्रेमाने दाखवून देणारा आणि साहित्याची वाट चालणार्‍यांना आपलेसे करणार्‍या या मानवतेच्या कवीला वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
 
कै. कविवर्य मनोहर रामचंद्र शुक्ल हे केवळ ज्येष्ठ साहित्यिक किंवा कवी नव्हते; ते माणसांना आपलेसे करणारे, नवोदितांना वडीलधार्‍यांच्या मायेने जवळ करणारे आणि त्यांच्या लेखणीवर विश्वास ठेवणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्वच होते. गौरवर्ण, मध्यम उंची, सफेद बुशशर्ट इन केलेला आणि बेलबॉटम हा त्यांचा परिचित पेहराव. चेहर्‍यावर सदोदित स्मितहास्य, वयाच्या खुणांनी सुरकुतलेले गाल आणि नेहमीपेक्षा किंचित मोठे वाटणारे, करुणेने भरलेले डोळे; पहिल्याच भेटीत आपलेसे वाटावे असे त्यांचे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मवाळ शब्द, कनवाळू स्वभाव आणि मायेचा स्पर्श माणसाला भारावून टाकत असे. पैशांच्या श्रीमंतीलाही लाजवेल अशी, त्यांच्या मनाची श्रीमंती होती. कुणासाठी ते आजोबा होते, कुणासाठी वडील, तर समवयस्कांसाठी कवितेने ओतप्रोत भरलेला सखा!
 
त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक संवेदनशील कवी, साहित्यिक आणि नवोदितांचा आधारवडच गमावला. त्यांच्या ‘सावली’ या काव्यसंग्रहाला १९९५-९६ मध्ये, महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’ पुरस्कार मिळाला, तर १९९० मध्ये त्यांना ‘कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार’ प्राप्त झाला. कथालेखनातही त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ‘तीर्थयात्रा’ या त्यांच्या कथेला, राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. कविता, कथा, वात्रटिका आणि विविध साहित्यिक मंचांवरील त्यांचा सहभाग, त्यांच्या बहुआयामी साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचीच साक्ष देतो.
 
‘सावली’नंतर आर्थिक परिस्थितीमुळे पुढील संग्रह प्रकाशित करण्यात विलंब झाला; परंतु त्यांची सर्जनशीलता कधीच थांबली नाही. त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात संग्रह तयार केला, त्याला कलात्मक रूप दिले आणि त्याच्या प्रती जवळच्या रसिकांना दिल्या. ‘वेळेत संग्रह प्रसिद्ध करा; माझ्यासारखा वेळ दवडू नका,’ हा त्यांनी अनुभवातून दिलेला सल्ला, त्यांच्या साहित्यनिष्ठेइतकाच अंतःकरणाला भिडणारा आहे. अखेरीस ‘भरारी’ प्रकाशित झाला, अन् त्यांच्या प्रदीर्घ साहित्यप्रवासाला एक महत्त्वपूर्ण वळणच मिळाले.
 
त्यांच्या साहित्याचा विचार करताना, ‘सावली’ आणि ‘भरारी’ ही दोन शीर्षकेच त्यांच्या काव्यविश्वाचे सुंदर रूपक ठरतात. ‘सावली’मध्ये माणूस, समाज, नाती, अंतर्मन, वेदना, माणुसकी आणि अध्यात्माचे प्रतिबिंब दिसते; तर ‘भरारी’मध्ये त्याच अनुभवांना जाणिवेचे पंख फुटताना दिसतात. ‘सावली’ म्हणजे जीवनाच्या उन्हात सोबत करणारी संवेदना आणि ‘भरारी’ म्हणजे, त्या संवेदनांमधून अर्थ शोधत पुढे जाण्याची सर्जनशील आकांक्षा!
 
शुक्लंची कविता जगलेल्या अनुभवातून जन्म घेते. व्यथा-वेदना मनात साठतात, चिंतनात त्यांचे रवंथ होते आणि मग त्या सहज लयीच्या शब्दांत पाझरतात. म्हणूनच, त्यांची कविता केवळ काव्यकौशल्याचा अविष्कार न राहता, अनुभवाचे रूपांतर होते. ‘सावली’तील ‘काय तुमचे?’सारख्या कवितांमधून, दुसर्‍याच्या दुःखाशी स्वतःचे दुःख जोडणार्‍या मानवतेचे दर्शन होते. ‘रक्तदान’, ‘दृष्टिदान’ आणि ‘मृत्युपत्र कवीचं’ यांसारख्या रचनांत रक्त, दृष्टी, वेदना, संवेदना आणि कविता यांना, माणुसकीच्या वारशाचे रूप प्राप्त होते.
 
त्यांची सामाजिक जाणीवही अत्यंत तीव्रच. ‘अंकुश’मध्ये सत्तेवर नियंत्रण ठेवण्याची प्रतिकारवृत्ती, ‘बाज’मध्ये सामाजिक दांभिकता आणि स्त्रीजीवनाचे वास्तव, ‘शाकुंतल’मध्ये समाजाच्या सामूहिक विवेकाला प्रश्न विचारणारे अर्भक, तर ‘चोळीचं गाणं’मध्ये स्त्रीच्या प्रेमापासून अस्मितेपर्यंतचा जीवनपट दिसतो. ‘भरारी’मध्ये ‘तराजू’, ‘बोकड’, ‘सण दिवाळीचा’ आणि ‘दिवाळी अंधारवासीयांची’ यांसारख्या रचनांतून सामाजिक विषमता, दुर्बलांचे जगणे आणि उत्सवाच्या प्रकाशामागील अंधार अधिक स्पष्टपणे समोर येतो. त्यांचा सामाजिक संताप निव्वळ घोषणा नसून, माणुसकीच्या शोधातून व्यक्त होतो.
 
शुक्लंच्या कवितेतील अध्यात्मही कर्मकांडापुरतेच मर्यादित नाही. ‘जहरामृत’, ‘वृंदावन’, ‘अव्यक्ताचे ठायी’ आणि ‘घंटा’ यांसारख्या रचनांत देवाचा शोध माणसापासून दूर न जाता, माणुसकीतून घेतला जातो. ‘देह हेच वृंदावन’ ही अनुभूती त्यांच्या अध्यात्माची दिशा स्पष्ट करते. त्यांच्या कवितेत परमत्वाचा शोध घेताना, माणूस कधीही हरवत नाही. निसर्गही त्यांच्या कवितेत, केवळ सौंदर्यदृश्य म्हणून येत नाही. झाड, फूल, पाऊस, पक्षी, निर्झर यांना ते अंतर्मनाचे प्रतीक होतात. ‘फुलून घेतो’मधील वठलेले झाड आतून फुलत राहण्याची जिद्द व्यक्त करते, तर ‘महामंत्र’मधील वृक्ष अनुभव आणि स्मृतीचे रूपक ठरतो. विशेषतः ‘भरारी’मध्ये, वृद्धत्वाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी महत्त्वाची आहे. वार्धय म्हणजे केवळ क्षीण होणे नव्हे; ते अनुभवाने समृद्ध होणेही आहे, हीच जाणीव त्यांच्या अनेक रचनांतून व्यक्त होते.
 
त्यांच्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे सहजता! बोलीतील साधेपणा, संस्कृतनिष्ठ शब्दसंपदा, लय, यमक, अनुप्रास आणि बोलीभाषेतील वाप्रचारांचा त्यांनी, आशयाला अनुरूप वापर केला. सामान्य वस्तूंना व्यापक प्रतीकात्मक अर्थ देणे, ही त्यांच्या कवितेची खासियत. ‘सावली’ अस्तित्व होते, ‘अंकुश’ प्रतिकाराचे प्रतीक ठरतो, ‘चोळी’ स्त्रीजीवनाची साक्ष होते, ‘रक्त’ मानवबंध आणि ‘मृत्युपत्र’ मूल्यांचा वारसा!
 
चिकित्सक दृष्टीने पाहता, काही रचनांमध्ये आशयाची तीव्रता इतकी पुढे येते की, कविता आणि निवेदन यांतील अंतरच कमी होते. काही सामाजिक व प्रबोधनपर कवितांमध्ये, प्रतिमेपेक्षा विधानप्रधानताच जाणवते. परंतु, हीच प्रवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दुसरी बाजूही उलगडते. कवितेबरोबरच जगण्याला काही दिशा द्यावी, पुढच्या पिढीशी अनुभवांची शिदोरी वाटावी, हीच त्यांची आंतरिक तळमळ.
 
मनोहर शुक्लंचे खरे मोठेपण त्यांच्या प्रकाशित साहित्याइतकेच, त्यांच्या माणूसपणात आहे. नवोदितांच्या लेखनातील गुण हेरणे, चुका प्रेमाने दाखवून देणे, प्रोत्साहन देणे आणि साहित्याकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी देणे, हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग. ज्येष्ठतेचा धाक न दाखवता, वडीलधार्‍यांच्या मायेने त्यांनी अनेकांना साहित्याच्या वाटेवर उभे केले. म्हणूनच, त्यांच्या जाण्याने अनेकांच्या डोयावरची केवळ साहित्यिकच नव्हे, तर मायेची सावलीही हरपली. त्यांच्या ‘सावली’ आणि ‘भरारी’ या दोन संग्रहांतून एक सुंदर अंतःसूत्र जाणवते, ते म्हणजे ‘सावली’ म्हणजे जगलेल्या जीवनाची संवेदना आणि ‘भरारी’ म्हणजे त्या संवेदनांना मिळालेली जाणिवेची उंची. या दोन्हींच्या केंद्रस्थानी मात्र एकच गोष्ट आहे ‘माणूस’!
 
म्हणूनच, मनोहर शु्क्लंची कविता देव, मृत्यू, निसर्ग, समाज किंवा स्वतःचा शोध घेत असली; तरी तिच्या केंद्रस्थानी माणूसच राहतो. त्यांच्या साहित्याचे खरे मोल केवळ त्यांनी काय लिहिले यात नाही; तर त्यांच्या शब्दांनी आपल्या आतला माणूस किती जागा केला, यात आहे.
 
आज मनोहरजी प्रत्यक्ष आपल्या सोबत नाहीत. पण, त्यांची कविता, त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी, त्यांचे माणूसपण आणि नवोदितांवर त्यांनी केलेली मायेची उधळण यांची सावली कायम राहील. ‘सावली’ची ऊब आणि ‘भरारी’ची जाणीव त्यांच्या साहित्यिक वारशाला पुढे नेत राहील. मनोहरजी, आपण निघून गेलात; पण आपल्या शब्दांची सावली आणि आपल्या कवितेची भरारी आमच्यासोबत कायम राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
 
शरद देवराय
८७६७१३९०२९




संबंधित मजकूर