‘महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान’ची स्थापना करत, गेल्या २४ वर्षांपासून वेदविद्येच्या प्रसाराचे कार्य करणार्या वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांच्याविषयी...
भारतीय संस्कृतीचा आत्मा असलेल्या वेदविद्येचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी हे वैदिक परंपरेतील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व. नाशिकमधील पंचवटीच्या ‘महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान’ या संस्थेचे संस्थापक सचिव आणि प्रधानाचार्य म्हणून, ते गेल्या २४ वर्षांपासून वेदविद्या प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत.
दि. ११ जून १९७८ रोजी एका सुसंस्कारित वैदिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरातील वैदिक परंपरा, भगवान विष्णूच्या पारंपरिक अर्चकत्वाचा वारसा आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कारातूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. वडिलांकडून प्राथमिक वेदशिक्षण घेतल्यावर, वैदिकसम्राट स्व. श्रीकृष्णशास्त्री भट्ट गोडशे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखे’चे संहितापाठ, पद, क्रमपाठ, जटा आणि घन यांसह सांगोपांग अध्ययन पैठणे गुरुजी यांनी पूर्ण केले. विविध वेदपरीक्षांमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त करून पैठणे गुरुजी यांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. सन २००३ मध्ये गोडशे गुरुजींच्या आज्ञेनेच पंचवटीच्या भक्तिधाम,कैलास मठ येथील वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे स्वतःच्याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेदाध्ययनाची परंपरा अधिक विस्तारली.
‘महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान’मध्ये सध्या सुमारे ४५ विद्यार्थी निवासी स्वरूपात विनामूल्य निवास, भोजन आणि वेदाध्ययनाचा लाभ घेत आहेत. या संस्थेला केंद्रीय शिक्षा मंत्रालयाच्या ‘महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन’ यांची मान्यता असून, यांच्याशी संलग्न विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेदविद्या आणि पौरोहित्य शिक्षणाच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वेदविद्येचे शिक्षण केवळ ग्रंथांपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, धर्मनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी रुजविण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली असून, आजवर अनेक मान्यवरांकडून पैठणे गुरुजींचा सन्मान झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार (२०१९), उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानचा ‘वेदपंडित’ पुरस्कार (२०२०), ‘सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कार, ‘श्रीपरशुराम वेद’ पुरस्कार, ‘स्वर्गीय सुधाताई बेळे स्मृती वेद’ पुरस्कार, इंदूर येथे ‘नरहरी वैदिक आश्रमद्वारे सन्मान’, संस्कृत भाषा सभेतर्फे सन्मान, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते सन्मानपत्र, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान आणि नाशिकच्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा ‘समाजभूषण’ पुरस्कार, ‘स्वर्गीय प्रमिलाताई मिरजकर सामाजिक कृतज्ञता सन्मान’ अशा अनेक सन्मानांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
सन २०१५ मध्ये लंडन येथे आयोजित, ‘चतुर्वेद पारायण’ आणि ‘लक्ष्मीनारायण यागा’चे मुख्य आचार्यत्व त्यांनी भूषविले. थायलंडमध्येही धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांची मुख्य आचार्य म्हणून नियुक्ती झाली होती. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराशी संबंधित वैदिक अनुष्ठानांमध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय असेच. श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आयोजित ‘चतुर्वेद पारायण’ व ‘वेदस्वाहाकारा’मध्ये ‘शुक्ल यजुर्वेदा’चे विद्वान म्हणून त्यांचीच नियुक्ती झाली. पुढे श्रीराम दरबार आणि पंचायत देवतांच्या प्राणप्रतिष्ठा विधीत, तसेच श्रीराम पंचायत यागाच्या आयोजनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण यज्ञाचे संचालन त्यांनीच केले होते. तसेच त्यांच्या वेदघोषातच अयोध्येच्या कळसावर ध्वज स्थापन करण्यात आला.
मार्च २०२६ मध्ये अयोध्येत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंत्र प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने झालेल्या श्रीराम-जानकी यज्ञाच्या आचार्यपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती. वेदविद्येबरोबरच भारतीय ज्ञानपरंपरेतील शास्त्रार्थ संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी पैठणे गुरुजी अविरत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय वेदशास्त्र’ पुरस्कार, वैदिक विद्वानांचे सन्मान सोहळे, अखिल भारतीय शास्त्रार्थ महासभा आणि युवा विद्वत संमेलनांचे आयोजन करण्यात येते. भारतातील युवतींच्या शास्त्राध्ययनाला प्रोत्साहन देणार्या ‘युवती शास्त्र महासभे’चे आयोजन हे वैशिष्ट्यपूर्ण पाऊल ठरल्याचे पैठणे गुरुजी सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील वेदपरीक्षांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवून संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष दिली आहे. वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांचे कार्य म्हणजे गुरुपरंपरेचा सन्मान, वैदिक ज्ञानाचे जतन, विनामूल्य शिक्षणातून विद्यार्थी घडविणे आणि भारतीय संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा अखंड ज्ञानयज्ञच! आपल्या कार्यातून वैदिक परंपरेला नवी ऊर्जा मिळवून देणार्या ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेचा दीप अखंड तेवत ठेवणार्या, रवींद्र पैठणे गुरुजी यांच्या कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
-विराम गांगुर्डे