भारतात ‘जेन-झी’विषयी सध्या भरपूर चर्चा सुरू असते. आंदोलन करणार्यांना विदेशांतून पैशांचा पुरवठा होतो आणि आंदोलनामागची वैचारिकता हीदेखील विदेशांतीलच लोकांकडून येते, असे आरोप होतात. या आरोपात किती तथ्य आहे, याचा शोध घेणे, हे केंद्र सरकारचे काम आहे. केंद्र सरकारच्या गुप्तहेर यंत्रणा हे काम उत्तम प्रकारे करण्यास सक्षम आहेत, याचा विश्वास बाळगायला काहीही हरकत नाही. ज्या अमेरिकेतून ‘जेन-झी’ उच्छादाचा विषय सुरू झाला आहे, असे सांगितले जाते, त्या अमेरिकेची स्थिती काय आहे, हे यानिमित्ताने बघणे फार रंजक होईल.
दोन अतिशय गाजलेल्या पुस्तकांची चर्चा करूया. पहिल्या पुस्तकाचे नाव आहे, 'The Fourth Turning : An American Prophecy' आणि दुसर्या पुस्तकाचे नाव आहे, 'The Fourth Turning is Here.' पहिल्या पुस्तकाच्या लेखकद्वयीचे नाव आहे,William Strauss and Neil Howe आणि दुसर्या पुस्तकाचे लेखक आहेत Neil Howe. पहिले पुस्तक १९९७ साली प्रकाशित झाले आणि दुसरे पुस्तक २०२३ साली. दुसरे पुस्तक प्रकाशित होत असताना विल्यम स्ट्रॉस हयात नव्हते. पहिले पुस्तक खूप गाजले, याचे कारण असे की, लेखकांनी अमेरिकन इतिहासाचे चक्रिय विश्लेषण केले. त्यांचे म्हणणे असे की, अमेरिकेचा इतिहास चार टप्प्यांतून समजून घ्यावा लागतो. ते चार टप्पे असे ः
पहिला टप्पा उत्कर्षाचे उच्चतम टोक - या कालखंडात भौतिक विकास भरपूर होता. सामाजिक ऐय मजबूत होते. समान मूल्यांची जपणूक होते. सामुदायिकतेला फार महत्त्व राहते.
दुसर्या अवस्थेला नाव दिले ‘अवेकनिंग’ (म्हणजे जाणीव, जागृती) - या कालखंडात पारलौकिक आणि सामाजिक जाणिवा वाढायला लागल्या, व्यक्तिवादाची वृद्धी होत गेली, त्याचप्रमाणे प्रस्थापित मूल्यांशी विद्रोह निर्माण झाला.
तिसर्या अवस्थेला नाव दिले ‘अनरेव्हलिंग’ - हा कालखंड समाजाच्या उसवणुकीचा कालखंड आहे. सामाजिक व्यवस्था मोडकळीस येण्याचा, त्यांच्या विच्छेदीकरणाचा, संस्थांच्या र्हासाचा, सामाजिक गटांच्या ध्रुवीकरणाचा आणि सर्व प्रकारच्या अपेक्षाभंगाचा कालखंड आहे.
चौथ्या कालखंडाला त्यांनी नाव दिले ‘क्रायसिस’ - ‘आणीबाणी’चा किंवा ‘संकटांचा कालखंड’ असे ते म्हणतात. या कालखंडात समाजात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता, उलथापालथ, जुन्या व्यवस्था कोलमडून पडणे, त्या जागी नवीन व्यवस्था उभ्या करण्याची धडपड, अशाप्रकारचा हा कालखंड आहे.
'The Fourth Turning is Here' या पुस्तकाचा लेखक Neil Howeने अमेरिकेची आताची स्थिती काय आहे, याचे जे विश्लेषण केले आहे, ते आपल्या देशातील आंदोलनासंबंधी फार महत्त्वाचे आहे.
लेखक अमेरिकेच्या संसदेविषयी (काँग्रेस) म्हणतो की, "काँग्रेसची परिणामकारकता खूप मर्यादित होत चालली आहे. कारण, अमेरिकेतील दोन पक्ष ‘डेमोक्रॅट’ आणि ‘रिपब्लिक’ परस्परांशी अजिबात जुळवून घेत नाहीत. मागील दशकाचा विचार करता, फार थोडे नवीन कायदे संमत झालेले आहेत. राज्य ‘व्हाईट हाऊस’मधून कार्यकारी आदेश काढून चालविले जाते. (म्हणजे राज्य काँग्रेसच्या कायद्याने चालत नाही.) राज्याच्या स्तरावर कोणताही पक्ष सत्तेवर येणार, तो पक्ष कायदेमंडळाद्वारे त्याला जे हवे ते करीत राहतो. म्हणून, काहीजणांना अशी चिंता वाटते की, अशा परिस्थितीत नको तो पक्ष जर केंद्रस्थानी सत्तेवर आला, तर काय होईल?”
लेखकाचे पुढचे विश्लेषण असे आहे की, प्रत्येक निवडणूक, मग ती स्थानिक का असेना; ती राष्ट्रीय निवडणूक समजली जाते (आता आपल्याकडे विधान परिषदेच्या निवडणुकांचा विषय चालू आहे. त्यावर होणारी चर्चा लक्षात घ्यावी.) आणि प्रत्येक राष्ट्रीय निवडणूक ही जीवन-मरणाचा विषय बनविला जाते. पक्षाला मतदान करणारे मतदार म्हणतात की, "चुकीच्या पक्षाला मत दिले असता, देशाचे भवितव्य धोयात आल्याशिवाय राहणार नाही.” अर्धे म्हणतात की, "संघर्ष हा सत्य आणि असत्य यांच्यामधील आहे.” एक-तृतीयांश म्हणतात की, "राजकीय लक्ष्य प्राप्त करण्यासाठी हिंसाचार समर्थनीय आहे.” आणि दोन-तृतीयांश लोकांचे मत असे आहे की, "भविष्यकालीन निवडणूक निकालाच्या संदर्भात हिंसाचार अनिवार्य आहे.”
निवडणूक निकाल लागल्यानंतर काय होते? लेखकNeil Howe म्हणतो की, "विजयी झालेले देशाच्या पुनर्रचनेचा आराखडा ठेवतात आणि ज्यांचा पराभव झाला, ते म्हणतात, ‘निवडणुकीत घोटाळे झाले आहेत. मतदानात घोटाळे झाले आहेत.’ ते आंदोलनाची तयारी करू लागतात. शासनाच्या प्रतिकाराची रचना करू लागतात. विजयी पक्ष आणि पराजित पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. विरोधी असे म्हणत नाहीत की, ‘हा जनादेश आहे, तो आम्हाला मान्य आहे.’ प्रत्येक पक्षाचा दावा असतो की, जनमत आमच्याच बाजूने उभे आहे.”
लेखक पुढे लिहितो की, या प्रकारची उलथापालथ किंवा प्रवृत्ती, अस्वस्थता अमेरिकेच्या दृष्टीने जरी विशेष दखल घेण्याची असली, तरी त्या तत्कालिक आहेत आणि त्या संपतील; पण तसे होणार नाही. लेखक पुढे लिहितो की, अशाप्रकारच्या अस्वस्थतेचे वारे जगातील विकसनशील आणि विकसित देशांमधून वाहू लागलेले आहेत. लेखकाचा संदर्भ मुख्यतः युरोपातील देशांकडे आहे. आर्थिक असमानता, उगवत्या पिढीचे सामाजिक अभिसरण, त्यावरील मर्यादा, तसेच वांशिक आणि धार्मिक जमातवाद याचा समाजमाध्यमांतून शस्त्रासारखा केला जाणारा उपयोग, या गोष्टी वाढू लागलेल्या आहेत. लोक ‘अधिसत्तावादी’ शासनाची अपेक्षा करू लागले आहेत. दक्षिण आणि मध्य युरोपात, तसेच लॅटिन अमेरिकेतील काही देशांत लोकप्रियतेचे वलय असणारे सत्ताधीश होताना दिसतात.
लोकशाही विषयीच्या जागतिक सर्वेक्षणाचा निष्कर्ष लेखकाने दिलेला आहे. ‘ग्लोबल डेमोक्रॅटिक रिसेशन म्हणजे, लोकशाहीला जागतिक उतरती कळा’ असा या सर्वेक्षणाचा अर्थ आहे. ही प्रवृत्ती बहुतेक सर्व देशांत, त्याचप्रमाणे अमेरिकेत उगवत्या पिढीच्या तरुणांमध्ये आढळते. त्याला पूरक म्हणून ‘केंब्रिज’ विद्यापीठाने ‘लोकशाहीचे भवितव्य’ याविषयी जो अभ्यास केला, त्याचा निष्कर्ष असा दिला, "आमच्या असे लक्षात आले की, बहुतेक सर्व जगात नवीन पिढी लोकशाहीविषयी कमालीची असंतुष्ट आहे. या पिढीच्या निर्देशांकात समृद्ध राष्ट्राची पिढी आघाडीवर आहे.”
आपल्या देशात काही लोक अशी भाषा करू लागले आहेत की, ‘आता निर्णय संसदेत केले जाणार नाहीत, निर्णय सडकेवर करावे लागतील.’ त्याचा दुसरा अर्थ असा होतो की, ‘लोकशाही गेली उडत, आम्हाला अधिकारशाहीचे राज्य हवे!’ वर दिलेली दोन पुस्तके एकाच विषयावरची असली, तरी त्यांच्या प्रकाशनात २६ वर्षांचे अंतर आहे आणि त्यांचे सर्व विश्लेषण हे सामाजिक स्थित्यंतराचे असल्यामुळे त्याला एक आगळेवेगळे महत्त्व आहे.
जगभर असंतोष आणि राजवटी बदलण्याचा कार्यक्रम चालविणारी एक टोळी अमेरिकेत असली; तरी दुसरा एक अभ्यासू गट आहे, जो अमेरिकेच्या संदर्भात वेगळी मांडणी करतो. अमेरिकेतल्या विद्यापीठात आणि ‘अॅकेडमिक’ क्षेत्रात ज्ञानसाधना चालते. त्यामुळे ज्ञानात भर घालणारी आणि विचारांना गतिमान करणारी पुस्तके इथे प्रकाशित होतात. आपल्या विद्यापीठांविषयी फारसे न लिहिलेले बरे! आपल्या बुडाखाली काय जळत आहे, हे अमेरिकेच्या सत्ताधारी वर्गाने लक्षात घ्यायला पाहिजे. लेखकाने अमेरिकेच्या संदर्भात प्रत्येक कालखंडाच्या परिणामाचे विश्लेषण केलेले आहे. आणि एकाच कालखंडात दुसर्या कालखंडाची बीजे कशी असतात, हे दाखवून दिले आहे. समाजाच्या गतिशीलतेचा हा जैविक विकासक्रम म्हटला पाहिजे. आपल्या देशाचा विचार करायचा झाला, तर स्वातंत्र्यानंतर आता येणारी ही चौथी पिढी समजली पाहिजे. प्रत्येक पिढीच्या आशा-आकांक्षा निराळ्या आहेत. त्यांचे गाठोडे बरोबर घेऊन पुढची पिढी वाटचाल करते. आताच्या पिढीला मागच्या पिढीने एक वारसा दिलेला आहे. ‘संसदीय लोकशाही’चा राजकीय वारसा आहे. ‘कायद्याचे राज्य’ हा संविधानिक वारसा आहे. ‘सांस्कृतिक ऐक्य’ हा सांस्कृतिक वारसा आहे आणि आपल्या मुळाचा शोध, ‘अस्मितेचा शोध’ हा मागच्या पिढीने दिलेला वारसा आहे. अमेरिकेतील स्थित्यंतराचे बिंदू हे राजकीय आणि आर्थिक आहेत. वरील पुस्तकांच्या लेखकांनी राजकीय आणि आर्थिक संकल्पनांभोवतीच आपली पुस्तके लिहिलेली आहेत.
तसे आपले नाही. आपण परंपरेने ‘राजसत्तावादी’ किंवा ‘आर्थिक उपभोगवादी’ नसतो. आपल्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू हा सर्वसमावेशक आणि सर्वांची धारणा करणारा धर्म असतो. दिल्लीत जे संघर्ष करीत आहेत, ते अमेरिकन विचाराने प्रभावित होऊन करीत आहेत, त्यांना संघर्ष करू द्यावा. परंतु, अमेरिकेसारखी उलथापालथ ते इथे करू शकत नाहीत. कारण, आम्ही ‘आम्ही’ आहोत आणि विदेशी विचारांवर पोसलेले ‘तुम्ही’ आहात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१