मध्य रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक; डोंबिवली, दिवा, कसारा आणि घाटकोपरमध्ये पादचारी पुलाचे काम करणार

डोंबिवलीत नवीन पादचारी पुलाचे गर्डर बसवणार; दिवा स्थानकातही गर्डर लॉन्चिंग, लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम

    31-Oct-2026
 
 
Central Railway Mega Block
 
ठाणे (Central Railway Mega Block): मध्य रेल्वेकडून शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री तसेच शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री विविध पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. डोंबिवली स्थानकात नवीन उत्तर पादचारी पुलाचे गर्डर बसवणे, दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर लॉन्चिंग, घाटकोपरमध्ये जुन्या पादचारी पुलाचा सांगाडा हटवणे आणि कसारा येथे ओव्हरहेड वायरची जोडणी अशी कामे केली जाणार आहेत. यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात काही लोकल कोपर, ठाकुर्ली, उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबणार नाहीत. काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत आणि मार्गातही बदल करण्यात आले आहेत. 
 
लोकल कोपर, ठाकुर्लीला थांबणार नाही
 
डोंबिवली स्थानकावरील नवीन उत्तर पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी शुक्रवार, ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १.२० ते पहाटे ३.५० या वेळेत दिवा ते कल्याणदरम्यान अप आणि डाउन मार्गावर अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून रात्री १२.०८ वाजता सुटणारी कसारा लोकल आणि रात्री १२.१२ वाजता सुटणारी कर्जत लोकल ठाणे ते कल्याणदरम्यान डाउन जलद मार्गावरून वळवण्यात येईल. त्यामुळे या दोन्ही लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच कर्जतहून रात्री २.३० वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येणार असून, तीही ठाकुर्ली आणि कोपर येथे थांबणार नाही.  (Central Railway Mega Block)
 
दिवा स्थानकातही गर्डर बसवणार
 
दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी शनिवार, ३१ ऑक्टोबर आणि रविवार, १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.२५ या वेळेत मुंब्रा ते दातिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
 
या ब्लॉकमुळे १ नोव्हेंबरला सुटणारी एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस (११०९९) रात्री १२.४५ ऐवजी पहाटे ४ वाजता सुटणार आहे. तर मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१३४) निळजे स्थानकात पहाटे ३.३४ ते ४.२५ या वेळेत नियंत्रित केली जाणार आहे. (Central Railway Mega Block)
 
घाटकोपरमध्ये जुना पादचारी पूल हटवणार
 
घाटकोपर स्थानकावरील जुन्या उत्तर पादचारी पुलाचा सांगाडा हटवण्यासाठी शनिवार-रविवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १.१५ ते २.३० या वेळेत अप आणि डाउन थ्रू मार्गावर, तर रात्री १.१५ ते पहाटे ३.४५ या वेळेत उपनगरीय मार्गावर ब्लॉक असेल. 
 
याच रात्री डोंबिवलीतील कामासाठी दिवा-कल्याणदरम्यान थ्रू मार्गावर रात्री १.२० ते २.५० आणि पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर रात्री १.२० ते पहाटे ४.२० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या परिचालनात आवश्यकतेनुसार बदल केले जातील.
 
एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस (२२५३८) ठाणे ते दिवा दरम्यान डाउन जलद आणि दिवा ते कल्याणदरम्यान डाउन धीम्या मार्गावरून वळवण्यात येईल. शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस (१८०३०) आणि विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस (१८५१९) कल्याण ते दिवादरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. (Central Railway Mega Block) 
 
कसारा मार्गावरही दोन दिवस ब्लॉक
 
आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या कामांतर्गत कसारा यार्डमध्ये ओव्हरहेड उपकरणांची जोडणी करण्यासाठी शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार अशा दोन्ही मध्यरात्री ३ ते पहाटे ५.३० या वेळेत अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. उंबरमाळी आणि कसारा दरम्यान अप आणि डाउन मुख्य मार्गावर हा ब्लॉक असेल.
 
यामुळे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी काही मेल-एक्स्प्रेस गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. यामध्ये नंदीग्राम, विदर्भ, देवगिरी, पंजाब मेल, दुरांतो, मंगला लक्षद्वीप आणि कर्मभूमी एक्स्प्रेससह अन्य गाड्यांचा समावेश आहे. (Central Railway Mega Block)
 
कसारा येथून रात्री ३.५१ आणि पहाटे ४.५९ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी दिशेकडील दोन लोकल कसारा ते कल्याणदरम्यान तिसऱ्या मार्गिकेवरून चालवण्यात येतील. त्यामुळे या लोकल उंबरमाळी आणि खर्डी स्थानकांवर थांबणार नाहीत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ब्लॉकमधील बदल लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. (Central Railway Mega Block)
 
 
 




संबंधित मजकूर