नाशिक (Nashik Simhastha Kumbh Mela) : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभासाठी प्रशासन सज्ज झाले असून, आज, दि. ३० ऑक्टोबर आणि उद्या, दि. ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस धार्मिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार आहे. धार्मिक शोभायात्रा, धर्मध्वज ग्रामपरिक्रमा, राष्ट्रपतींचा दौरा, ध्वजारोहण आणि गोदावरी महाआरतीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
शोभायात्रेने उत्सवाला प्रारंभ
आज दुपारी २ वाजता मोदी मैदान येथून सांस्कृतिक शोभायात्रा निघून तिचा समारोप सायंकाळी ७ वाजता रामकुंड परिसरात होईल. धर्मध्वज ग्रामपरिक्रमा आणि नगरप्रदक्षिणेतून सिंहस्थाच्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडणार आहे, तर उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रामकुंड तीर्थावर दुपारी १२.०२ वाजता धर्मध्वजारोहण होणार असून धार्मिक विधी, गोदावरीपूजन आणि सायंकाळी महाआरती होणार आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)
प्रशासनाकडून चोख व्यवस्था
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, प्रवेश-निर्गमन व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांच्या सज्जतेवर भर देण्यात येत आहे. तसेच नाशिक ग्रामीण व शहरी भागात ड्रोन उड्डाणावरही निर्बंध लागू करण्यात आले आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)
पंचवटीतील ३५ शाळांना सुट्टी
आज सकाळी ८ वाजल्यापासून उद्या रात्री ८ वाजेपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. रामकुंड, पंचवटी आणि गोदाकाठ परिसरात बॅरिकेडिंग, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच उद्या पंचवटी विभागातील ३५ शाळांना सुटी देण्यात आली आहे. वाहतुकीवरील निर्बंध आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. (Nashik Simhastha Kumbh Mela)
स्वच्छता आणि सुशोभीकरणाला वेग
महापालिकेकडून घाट परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण हटाव, रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. भाविकांची सुरक्षित ये-जा आणि आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवण्यावर भर दिला जात आहे. (Nashik Simhastha Kumbh Mela)
तीन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन
आज, दि. ३० ऑक्टोबर (आश्विन कृष्ण पंचमी)
सकाळी ८.१५ वाजता : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा व नगरप्रदक्षिणा
सकाळी ९ ते १२.३० : प्रायश्चित्त संकल्पपूर्वक तीर्थपूजन, पंचार्घ्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेशपूजनादि पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधान देवता स्थापना आणि नवग्रह रुद्र स्थापना
दुपारी २.३० ते सायंकाळी ७.३० : स्नपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना
उद्या, दि. ३१ ऑक्टोबर (आश्विन कृष्ण षष्ठी)
सकाळी ८ ते १ : स्थापित देवता प्रातःपूजन
सकाळी ११ ते १२.३० : महामहीम राष्ट्रपती व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेशपूजन, पंचार्घ्य समर्पण व तीर्थपूजन
दुपारी ठीक १२.०२ वाजता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण, गोदाआरती व प्रार्थना
सायंकाळी ४.३० ते ७.३० : प्रतिष्ठापना हवन, सायंपूजन व गोदाआरती
दि. १ नोव्हेंबर (आश्विन कृष्ण सप्तमी)
सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० : प्रातःपूजन, उत्तराखंड हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्म समर्पण