‘सिद्धकला’च्या माध्यमातून कथकचा प्रवास!

    30-Oct-2026

Mansi Limaye Kathak Journey
 
आज ‘सिद्धकला’ या नृत्यवर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत कथकची कला पोहोचवणार्‍या ठाण्याच्या मानसी लिमये यांचा हा प्रेरणादायी प्रवास...
 
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून कथक नृत्याचे धडे गिरवणार्‍या मानसी लिमये यांनी नृत्याला केवळ छंद म्हणून न पाहता, त्याच्याशी आयुष्यभराचं नातं जोडलं. आईची नृत्याविषयीची आवड, गुरूंचं मार्गदर्शन, कुटुंबाचा विश्वास आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी ‘सिद्धकला’ या नृत्यवर्गाची स्थापना केली. दि. ९ ऑगस्ट २०१६ रोजी शुभारंभ झालेल्या ‘सिद्धकला’ने यंदा दहा वर्षांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला. या दशकभराच्या प्रवासात मानसी यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासोबतच, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत कथकची कला पोहोचवली.
 
मानसी यांना वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी नृत्याची गोडी लागली. त्यांच्या पहिल्या गुरू नृत्यालंकार निवेदिता रानडे यांच्याकडून त्यांनी नृत्याचे प्राथमिक धडे घेतले. मानसी यांच्या आईला स्वतःलाही नृत्याची आवड होती; मात्र त्यांच्या काळात त्यांना ही आवड पुरेशा प्रमाणात जोपासता आली नाही. त्यामुळे आपल्या मुलीच्या माध्यमातून तरी नृत्याची आवड पूर्ण व्हावी, या भावनेतून त्यांनी मानसी यांना नृत्यवर्गात दाखल केलं.
 
आईने पाहिलेलं स्वप्न मानसी यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं ध्येय म्हणून आकारास आलं. नृत्य शिकताना त्यांच्यातील कलागुण विकसित होत गेले आणि कथकशी असलेलं नातंही अधिक घट्ट होत गेलं. पुढे नृत्यातील ‘विशारद’ ही पदवी पूर्ण केल्यानंतर या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याची संधी त्यांच्यासमोर उभी राहिली.
 
२०१५ मध्ये मानसी लिमये यांनी नृत्यातील ‘विशारद’ ही पदवी आणि पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्या नोकरीच्या शोधात होत्या. याच काळात एका मानलेल्या बहिणीने त्यांना स्वतःचे नृत्यवर्ग सुरू करण्याचा सल्ला दिला. "तुझं नृत्यातील ‘विशारद’ पूर्ण झालं आहे, मग तू नोकरी का शोधतेस? आपल्या भागात नृत्याचे वर्गही नाहीत. तू स्वतःचे वर्ग का सुरू करत नाहीस? तू छान नाचतेस आणि तुझ्यात ती क्षमतादेखील आहे,” असं तिने मानसी यांना सुचवलं. त्या सल्ल्याने मानसी यांच्या मनात स्वतःचे नृत्यवर्ग सुरू करण्याचा विचार रुजू लागला. प्रारंभी त्यांनी लबहाऊसमध्ये चौकशी केली; मात्र तिथे अपेक्षित गोष्टी जुळून आल्या नाहीत. त्यानंतर जवळच असलेल्या एका माँटेसरी शाळेत नृत्य शिकवण्याची संधी असल्याचं त्यांना समजलं.
 
काहीशा द्विधा मनःस्थितीत असतानाही मानसी यांनी धाडस करून शाळेच्या मालकांना फोन केला. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि दुसर्‍याच दिवशी भेटीसाठी बोलावण्यात आलं. अवघ्या आठवड्याभरात नृत्यवर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. नोकरीच्या शोधात असलेल्या मानसी यांच्यासमोर आता स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि आपल्या कलेला व्यावसायिक स्वरूप देण्याची नवी संधी होती.
 
नृत्यवर्ग सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याला नाव काय द्यायचं, हा प्रश्नही त्यांच्यासमोर होता. त्यावेळी मानसी यांच्या सासूबाईंनी ‘सिद्धकला’ हे नाव सुचवलं. गणपतीला कलेचं दैवत मानलं जातं. त्यामुळे कलेच्या या प्रवासाला दैवताच्या नावाची जोड असावी, अशी त्यामागची भावना होती. हे नाव सर्वांनाच आवडलं आणि दि. ९ ऑगस्ट २०१६ रोजी ‘सिद्धकला’ नृत्यवर्गाचा श्रीगणेशा झाला. सुरुवातीला हा निर्णय इतया मोठ्या प्रवासाची नांदी ठरेल, याची मानसी यांनाही तशी कल्पना नव्हती. मात्र, योग्य वेळी मिळालेली संधी आणि ती स्वीकारण्याचं धाडस, यांमुळे मानसी यांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
कलाकाराच्या जडणघडणीत गुरूंचं स्थान अत्यंत महत्त्वाचं असतं. निवेदिता रानडे यांच्याकडून नृत्याचे पहिले धडे गिरवल्यानंतर मानसी यांच्या पुढील प्रवासात गुरू धीरेंद्र तिवारी आणि गुरू पंडित राजेंद्र कुमार गंगानी यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. पंडित राजेंद्र कुमार गंगानी यांचा एक सल्ला मानसी यांच्या विशेष लक्षात राहिला आहे, "तुम बस तुम्हारा रियाज करो और बाकी सब सही हो जाएगा अपने आप|”
 
या वाक्यातून मिळणारा संदेश साधा असला, तरी त्यामागचा अर्थ मोठा आहे. आपल्या हातात असलेलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं. प्रत्येक गोष्टीचा परिणाम लगेच मिळेल, अशी अपेक्षा न ठेवता, स्वतःच्या साधनेवर विश्वास ठेवायचा. योग्य वेळी मार्ग सापडतो, याची जाणीव या विचारातून होते.
 
प्रत्येक कलाकाराच्या प्रवासात यशाचे क्षण असतात, तसेच मनाची घुसमट करणारे टप्पेही येतात. मानसी यांच्या आयुष्यातही असा काळ आला, जेव्हा एका प्रतिष्ठित गुरूंकडे शिक्षण घेत असताना, अपेक्षित मार्गदर्शन आणि प्रगती मिळत नसल्याची भावना निर्माण झाली. जवळपास तीन वर्षे हा संघर्ष सुरू राहिला.
 
आपल्यात आणखी शिकण्याची क्षमता आहे; मात्र त्या क्षमतेला योग्य दिशा मिळत नाही, असं त्यांना वाटू लागलं. अखेर त्यांनी काही काळ कोणाकडेही पुढील शिक्षणासाठी न जाण्याचा निर्णय घेतला. स्वतःचे नृत्यवर्ग सुरू असतानाही मनात शिकण्याची इच्छा आणि योग्य गुरूच्या शोधातील निराशा यांच्यात संघर्ष सुरू होता. याच काळात धीरेंद्र तिवारी यांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मानसी यांना मिळाली. सुरुवातीला मानसी यांची कार्यशाळेत सहभागी होण्याचीही इच्छा नव्हती. पण, मैत्रिणीच्या आग्रहास्तव त्या तिथे हजर राहिल्या; मात्र पहिल्या दिवशी त्यांनी घुंगरूदेखील सोबत नेले नव्हते. सुरुवातीला त्यांनी केवळ निरीक्षण केले. मात्र, धीरेंद्र तिवारी यांची शिकवण्याची पद्धत, त्यांच्यातील ऊर्जा आणि नृत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, यांमुळे मानसी यांच्या मनात पुन्हा शिकण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांच्याशी संवाद साधून शिकण्याची इच्छा व्यक्त केली आणि नृत्यशिक्षणाचा नवा टप्पा सुरू झाला. आज धीरेंद्र तिवारी हे मानसी यांच्यासाठी केवळ गुरू नाहीत, तर मित्र आणि मार्गदर्शकही आहेत. वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणी असोत, सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे जाता येतं, ही मानसी यांच्यासाठी मोठी जमेची बाजू. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्वतःच्या नृत्याची पातळी आणखी उंचावण्याची प्रेरणा मिळत अशल्याचे त्या आवर्जून अधोरेखित करतात.
 
आज जेव्हा अनोळखी व्यक्ती भेटून "ताई, आम्ही तुम्हाला ओळखतो”, "आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो” किंवा "तुम्ही खूप छान नृत्य करता,” असं सांगतात, तेव्हा मानसी यांना मिळणारं समाधान शब्दांत व्यक्त करणं कठीण होतं. आपण ज्या कलेवर प्रेम करतो, ती कला लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि लोक तिचं कौतुक करत आहेत, हीच कलाकारासाठी मोठी पावती असते.
स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेणं जितकं महत्त्वाचं असतं, तितकीच त्या निर्णयाला कुटुंबाची साथ मिळणंही गरजेचं. ‘सिद्धकला’ सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मानसी यांच्या आईने आणि नवरा श्रीरंग यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला.
या प्रवासाने त्यांना एक महत्त्वाची शिकवण दिली, यश एका रात्रीत मिळत नाही. एखाद्या क्षेत्रात उतरल्यावर लगेच मोठी ओळख निर्माण होईल, अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा संयमाने आणि सातत्याने काम करत राहणं महत्त्वाचं आहे. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
 
आईच्या नृत्याविषयीच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छेतून सुरू झालेला हा प्रवास आज मानसी लिमये यांच्या स्वतंत्र ओळखीपर्यंत पोहोचला आहे. ‘सिद्धकला’ची दहा वर्षांची वाटचाल ही केवळ एका नृत्यवर्गाची यशोगाथा नाही; तर ती आईच्या स्वप्नांची, गुरूंच्या आशीर्वादाची, कुटुंबाच्या विश्वासाची आणि स्वतःच्या मेहनतीवर ठाम राहणार्‍या एका कलाकाराच्या जिद्दीची कहाणी आहे.
‘सिद्धकला’च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने मानसी लिमये यांचा प्रवास एकच संदेश देतो, स्वप्न पाहा, मेहनत करा, योग्य मार्गदर्शन स्वीकारा आणि आपल्या कलेवरील विश्वास कधीही ढळू देऊ नका!
 
लेखक- कपिल देशपांडे 




संबंधित मजकूर