महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख आणि संघटनात्मक ताकद असल्याचा दावा करणार्या उबाठा गटाची सध्या ‘शोधू कुठे’ अशी अवस्था झाली आहे. विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत उबाठाने दोन ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र, दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे उबाठाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि मतदारांमधील प्रभावावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योगायोग असा की, सध्या सर्वोच्च न्यायालयात उबाठा गट ‘खरी शिवसेना कुणाची?’ हा खटला लढत आहे. एकीकडे शिवसेनेची खरी संघटना, हिंदुत्वाची भूमिका आणि पारंपरिक मतदार आमच्याकडेच आहेत, असा दावा उबाठाकडून न्यायालयात केला जात असताना, या निवडणुकीच्या निकालाने पक्षाचे वास्तव चित्र स्पष्ट झाल्याचे दिसते. अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेस आणि उबाठा गटात मैत्रीपूर्ण लढत झाली. याठिकाणी काँग्रेसच्या अदिती पोहरे, उबाठा गटाचे दत्तात्रय लहाने आणि शिवसेनेचे किरण सरनाईक हे प्रमुख उमेदवार होते. मात्र, या दोन्ही मित्रांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही उबाठाची स्थिती फारशी वेगळी नाही. दिलीप घुगे यांना पक्षाने उमेदवारी दिली. मात्र, इथे शरद पवार गटाचे प्रतापसिंह पाटील विजयी झाले. एवढेच नाही, तर पुणे पदवीधर मतदारसंघात शरद पवार गटाने हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी दिली असताना उबाठा गटाचे सुनील मोदी यांनी बंडखोरी केली. पण, इथेही उबाठाच्या हाती निराशाच आली.
विशेष म्हणजे, या निवडणुकीत पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीच्या खात्यात गेल्या असल्या, तरी उबाठा गटाच्या वाट्याला त्यातली एकही जागा आली नाही. त्यामुळे आता तरी केवळ भावनिक मुद्दे किंवा विरोधकांवरील टीका यापलीकडे जाऊन संघटन, स्थानिक नेतृत्व, मतदारांशी संपर्क आणि यंत्रणा मजबूत करण्याचे आव्हान उबाठासमोर आहे. मविआच्या विजयाच्या चर्चेत उबाठाला स्वतःच्या कामगिरीचा स्वतंत्र हिशोब मांडावा लागणार आहे. हा निकाल उबाठा गटासाठी केवळ निवडणुकीतील पराभव नसून, आगामी राजकीय वाटचालीसाठी नक्कीच धोयाची घंटा म्हणावी लागेल.
दादांची ‘राष्ट्रवादी’ कुठे हरवली?
विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचे निकाल पाहता, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुठे हरवली, असा प्रश्न पडावा. त्यामुळे या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तीन महाविकास आघाडीने, तर दोन जागा महायुतीने जिंकल्या. मात्र, उबाठा गटाप्रमाणेच दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत आपले खाते उघडता आले नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागून होते. परंतु, अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षात उफाळून आलेला अंतर्गत संघर्ष, प्रमुख नेत्यांमधील असमन्वय आणि परिणामी, ओसरत चाललेल्या प्रभावामुळे पक्षावर ही वेळ आल्याची चर्चा सध्या रंगली आहे. महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची एकमेव जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली असताना, या जागेचा प्रचार, प्रसार करणे फारसे अवघड नव्हते. महत्त्वाचे म्हणजे, या जागेवर पक्षाने विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना संधी दिलेली असतानाही फारसे यश हाती आले नाही. चव्हाण यांच्या उमेदवारीला असलेला शिवसेनेचा विरोध आणि प्रचाराचा अभाव याचा परिणाम निवडणुकीवर झाला. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी तर स्वतःच पक्षाला आत्मपरीक्षणाचा सल्लाही दिला.
तसेच ही निवडणूक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनीही चांगलीच गाजवली. छ. संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात कृषी उद्योजक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या रविराज साबळे यांनी तिसर्या क्रमांकावरील सर्वाधिक मते मिळवली. त्यांच्या मतांचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसल्याचेही काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले नितेश कराळे मास्तर नागपूर पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनीही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांची बर्यापैकी मते आपल्याकडे खेचली. दुसरीकडे, शरद पवार गटाला दोन जागांवर विजय मिळाल्याने त्यांना चांगलेच बळ मिळाले. एकूणच काय तर अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही निकालांचे चिंतन करणे अपरिहार्य असेच!