भारताच्या स्वदेशी ‘नॅव्हिक’ला मिळणार नवी ताकद; जीएसएलव्ही-एफ१८ मोहिमेकडे देशाचे लक्ष

इस्रो आज मध्यरात्री एनव्हीएस-०३ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार

 
 
ISRO NVS-03 Launch
 
मुंबई (ISRO NVS-03 Launch): भारताच्या स्वदेशी उपग्रह दिशादर्शक प्रणालीला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आज महत्त्वपूर्ण मोहीम राबविणार आहे. भारताचा पुढील पिढीतील दिशादर्शक उपग्रह एनव्हीएस-०३ चे प्रक्षेपण शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून जीएसएलव्ही-एफ१८ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. या मोहिमेमुळे भारताच्या स्वदेशी ‘नॅव्हिक’ प्रणालीला नवी ताकद मिळण्याची अपेक्षा आहे. (ISRO NVS-03 Launch)
 
अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला पर्याय म्हणून भारताने विकसित केलेली ‘नॅव्हिक’ अर्थात भारतीय उपग्रह समूहावर आधारित दिशादर्शक प्रणाली ही देशाची स्वतंत्र उपग्रह दिशादर्शक यंत्रणा आहे. या प्रणालीच्या माध्यमातून भारतासह देशाच्या सीमांपलीकडे सुमारे १,५०० किलोमीटर क्षेत्रात अचूक स्थाननिर्धारण, दिशादर्शन आणि वेळेची माहिती उपलब्ध करून दिली जाते. नागरी वापरकर्त्यांसाठी प्रमाणित स्थाननिर्धारण सेवा, तर संरक्षण आणि धोरणात्मक वापरासाठी अधिकृत वापरकर्त्यांना मर्यादित सेवा उपलब्ध आहे. (ISRO NVS-03 Launch)
 
एनव्हीएस-०३ उपग्रहामध्ये स्वदेशी विकसित अणुघड्याळाचा समावेश हे या मोहिमेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उपग्रह दिशादर्शक प्रणालीमध्ये अचूक वेळेची गणना अत्यंत महत्त्वाची असते. यापूर्वी ‘नॅव्हिक’ मालिकेतील काही उपग्रहांमध्ये अणुघड्याळांशी संबंधित तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रणालीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला होता. त्यामुळे स्वदेशी अणुघड्याळाचा वापर भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती मानला जात आहे. (ISRO NVS-03 Launch)
 
या उपग्रहामध्ये पारंपरिक एल५ आणि एस-बँड संकेतांसोबत नवीन एल१ संकेताचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे भ्रमणध्वनी, स्मार्ट घड्याळे, वाहनांमधील दिशादर्शक यंत्रणा तसेच अन्य व्यावसायिक उपकरणांमध्ये ‘नॅव्हिक’चा वापर वाढण्यास मदत होऊ शकते. (ISRO NVS-03 Launch) 
 
१९९९ च्या कारगिल युद्धानंतर भारताला स्वतंत्र दिशादर्शक प्रणालीची गरज प्रकर्षाने जाणवली. परदेशी उपग्रह प्रणालींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘नॅव्हिक’ विकसित करण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवरही देशाच्या स्वतंत्र उपग्रह दिशादर्शक यंत्रणेचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित झाले आहे. संरक्षण, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, मासेमारी, आपत्ती व्यवस्थापन आणि दळणवळण क्षेत्रासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (ISRO NVS-03 Launch)
 
सुमारे २,२५० किलोग्रॅम वजनाचा एनव्हीएस-०३ उपग्रह प्रक्षेपणानंतर भूस्थिर संक्रमण कक्षेत स्थापित केला जाणार आहे. जीएसएलव्ही-एफ१८ हे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक कार्यक्रमातील विसावे उड्डाण आहे. भविष्यात एनव्हीएस-०४ आणि एनव्हीएस-०५ या उपग्रहांचेही प्रक्षेपण नियोजित आहे. त्यामुळे भारताची स्वदेशी ‘नॅव्हिक’ प्रणाली अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडणार आहे. (ISRO NVS-03 Launch)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर