"डिजिटल अरेस्टच्या नावाखाली वृद्धांना व सामान्य नागरिकांना लक्ष्य करून पैसे उकळणे हा सामान्य खंडणीपेक्षा अत्यंत गंभीर आणि निर्दयी गुन्हा आहे,” असे परखड मत नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका खटल्याच्या सुनावणीवेळी मांडले. त्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारीत वाढलेला ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर, ‘डिजिटल अरेस्ट’ आणि हे टाळण्यासाठी घ्यावयाची एकूणच खबरदारी याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान जागतिक पातळीवर झपाट्याने विस्तारत आहे. त्यातून कामातील वेग, अचूकता आणि सोयी वाढत आहेत. मात्र, याच तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगारही अधिक शिताफीने, मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यास सज्ज झाले आहेत. याच्या बातम्या सतत आपल्या वाचनात येत असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग अधिक सोयीस्कर आणि वेगवान अनुभवातून जात आहे. ‘एआय’मुळे कामातील वेग आणि अचूकता वाढत असून, चुका होण्याची शक्यता कमी होत आहे. त्याचबरोबर हे तंत्रज्ञान अखंड उपलब्ध असल्याने हवी ती माहिती कोणत्याही वेळी सहज मिळू शकते. त्यामुळे वापरणार्या व्यक्तीची निर्णयक्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
‘एआय’मधील विविध सुधारणांपैकी ‘एजंटिक एआय’ हे तंत्रज्ञान स्वतःहून टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करणारे ठरणार आहे. भविष्यात जे लोक हे तंत्रज्ञान शिकणार नाहीत, ते हे शिकणार्यांच्या मागे पडतील, हे निश्चित! हे तंत्रज्ञान जगातील महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांनी विकसित केले आहे. त्यात ‘गुगल’चे ‘जेमिनी’, ‘ओपन एआय’चे ‘चॅटजीपीटी’, ‘मेटा’चे ‘मेटा एआय’, ‘मायक्रोसॉफ्ट’चे ‘कोपायलट’ आणि ‘परफेक्सिटी’ यांचा समावेश आहे. तसेच, ‘अॅन्थ्रोपिक’च्या ‘लीड बे मायथॉस’ नावाची ‘एआय’ प्रणाली विकसित केली असून, ती कोणत्याही संगणक प्रणालीतील त्रुटी आणि माहिती-तंत्रज्ञान पायाभूत सुविधांमधील कमतरता शोधून काढण्यास सक्षम आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांत व्यावसायिक क्रांती होण्याची चिन्हे आहेत. मात्र, या तंत्रज्ञानासाठी काही मर्यादा आहेत. ‘एआय’कडे जगभरातून आलेली माहिती खरी, खोटी किंवा मुद्दाम दिशाभूल करणारी असू शकते. मोफत उपलब्ध माहिती आणि पैसे भरून मिळणारी माहिती यांत गुणवत्तेचा फरक असू शकतो. काही माहिती कालबद्ध असण्याची शयता असते. त्यामुळे ‘एआय’वर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी मूळ स्रोताची खातरजमा करणे आवश्यक आहे.
आतापर्यंत ‘सायबर गुन्हेगारी’ ही चोरट्यांच्या वैयक्तिक हुशारीवर आधारित होती. भाषा, उच्चारपद्धती आणि उपलब्ध माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून फसवणूक केली जात होती. आता मात्र ‘एआय’ची अनेक साधने बहुतेक वेळा मोफत, सहज वापरण्यासारखी आणि निनावी पद्धतीने वापरता येण्यासारखी आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आधीच मोठ्या प्रमाणात सुरू असलेले सायबर गुन्हे आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा काही प्रकारांविषयी आणि त्यासाठी सावधगिरी कशी बाळगावी?
समाजमाध्यमावर खोट्या प्रोफाईल आणि बनावट व्हिडिओ
सायबर गुन्हेगार ‘जनरेटिव्ह एआय’च्या मदतीने समाजमाध्यमावरील माहिती वापरून हुबेहूब बनावट व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ तयार करू शकतात. एखाद्या व्यक्तीचा फोटो, आवाज किंवा व्हिडिओ वापरून त्याच्यासारखी कृत्रिम व्यक्ती तयार करून फसवणुकीसाठी वापरली जाऊ शकते. ओळखीच्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने तयार केलेले बनावट व्हिडिओ पाहून अनेकजण सहज फसू शकतात. ‘एआय’च्या मदतीने हे सर्व अतिशय वेगाने मोठ्या प्रमाणावर पसरविले जाते. पूर्वी फसव्या संदेशांत असलेल्या भाषिक चुका आता दिसणार नाहीत. त्यामुळे खरे आणि खोटे यात फरक करणे कठीण होते. ‘एआय चॅटबॉट’च्या माध्यमातून समोर खरोखर व्यक्ती आहे की कृत्रिम प्रणाली, हे ओळखणे अवघड होईल. त्यातून लिंक लिक करणे, पैसे पाठविणे किंवा वैयक्तिक माहिती देणे यांसारख्या चुका घडू शकतात.
‘डिजिटल अरेस्ट’चे प्रकार
‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकीत ‘एआय’मुळे अधिक शिस्तबद्ध आणि मानसिक दबाव निर्माण करणारे तंत्र वापरता येईल. समाजमाध्यमावरील माहितीच्या आधारे तुमच्यासाठी खास स्क्रिप्ट तयार केली जाईल. कॉल करणार्यांना ‘एआय’च्या मदतीने प्रशिक्षित केले जाईल. तुमच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे तुम्हाला पद्धतशीररीत्या फसविले जाईल. तुमच्याशी संवाद साधताना तुमच्या मानसिक प्रतिक्रियांचे निरीक्षण केले जाईल आणि काही मिनिटांत संपूर्ण जाळे विणले जाईल.
बनावट कागदपत्रांची निर्मिती
‘एआय’च्या मदतीने शंका न येतील, अशी बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे, अहवाल आणि दाखले तयार करणे सहजशय होईल. प्रसिद्ध कंपन्यांच्या नावाने खोटी पॅकेजिंग तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जाऊ शकते. समाजमाध्यमांवरील माहिती वापरून भावनिक व विश्वासार्ह वाटतील अशा पोस्ट तयार केल्या जातील. उदाहरणार्थ, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात शिक्षण घेत असल्याचे फोटो वापरून खोटी घटना तयार करून जवळीक साधली जाऊ शकते.
गुंतवणुकीसाठी खोट्या बातम्यांचा वापर
जलद आणि जास्त नफ्याच्या आशेने गुंतवणूक करणार्यांना लक्ष्य केले जाईल. बाजारातील घडामोडी, सरकारी योजना किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट बातम्या पसरवून लोकांना आकर्षित केले जाईल.
बनावट वेबसाईट आणि प्रोफाईल
हुबेहूब खोट्या वेबसाईट तयार करणे, ऑनलाईन गेम खेळणार्यांना जाळ्यात ओढणे आणि मॅट्रिमोनियल वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार करणे, आता आर्थिक सोपे झाले आहे. थोडयात, पूर्वीच्या सायबर गुन्ह्यांमध्ये दिसणार्या त्रुटी आता जवळजवळ नाहीशा होतील. ‘एआय’च्या मदतीने गुन्हेगार अधिक वेगाने अधिक शिताफीने आणि मोठ्या प्रमाणावर फसवणूक करतील.
व्यवसायांसाठी वाढता धोका
व्यवसायांमध्ये वापरल्या जाणार्या माहिती-तंत्रज्ञान पायाभूत सुविधांवर ‘एआय’च्या मदतीने सायबर हल्ल्यांची शक्यता वाढत आहे. आयटी प्रणालीतील त्रुटी शोधून त्याचा फायदा घेत फसवणूक केली जाऊ शकते. उदा. व्यावसायिकाच्या ई-मेल प्रणालीमध्ये योग्य सुविधा नसल्यास ग्राहकाच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून पैशांची मागणी केली जाऊ शकते. वरील प्रकारांव्यतिरिक्तही अनेक नव्या पद्धतींनीही फसवणूक वाढण्याची शक्यता आहे.
काय काळजी घ्याल?
बँक व्यवहारांसाठी स्वतंत्र मोबाईल वापरा. त्यावर सोशल मीडिया अॅप ठेवू नका. मोबाईलमध्ये नेट बँकिंग नसेल, तर अधिक सुरक्षित. ‘यूपीआय’ (जीपे, फोनपे, पेटीएम आदी) संलग्न खात्यात कमीत कमी रक्कम ठेवा. अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करा. यूआर-कोड, एसएमएस किंवा अनोळखी ई-मेलवर त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. ओळखीच्या व्यक्तीचा फोटो, आवाज किंवा व्हिडिओ दिसत असला, तरी नंबर अनोळखी असेल, तर सावध राहा. तातडीने मदत किंवा पैसे मागितले गेल्यास घाबरू नका. संबंधित व्यक्तीला किंवा त्यांच्या नातेवाईकांना थेट फोन करून खात्री करा. कुटुंबात एक गुप्त सांकेतिक शब्द (Code word) ठरवा. तो न सांगता पैसे पाठवू नका. समाजमाध्यमांत वैयक्तिक माहिती टाकणे टाळा. अनोळखी लोकांचे ग्रुप जॉईन करू नका. नव्याने ओळख झालेल्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. पोलीस किंवा सरकारी अधिकार्यांच्या नावाने धमकीचा फोन आल्यास घाबरू नका. भारतात कोणताही खटला ऑनलाईन दाखल होत नाही; अधिकृत नोटीस पाठविले जाते. कोणताही ओटीपी, पिन किंवा बँकेचे तपशील देऊ नका. अनोळखी व्यक्तींना पैसे, गिफ्टकार्ड किंवा क्रिप्टो-करन्सी पाठवू नका. सर्व पासवर्ड नियमितपणे बदलत राहा. व्यवसायासाठी संगणक, मोबाईल किंवा इंटरनेट वापरत असल्यास, तज्ज्ञांकडून नियमित सुरक्षा तपासणी करून घ्या.
फसवणूक होऊन पैसे गेल्याचे लक्षात येताच, त्वरित ‘१९३०’ या हेल्पलाईनवर संपर्क साधा आणि लगेच https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार नोंदवा.
लेखक- शशांक गुळगुळे