आधी कम्युनिस्ट आणि आता काँग्रेसी सत्ता असलेल्या 'केरळम्'मध्ये संघाच्या शाखा, स्वयंसेवक यांना लक्ष्य करण्याचा वैचारिक भ्याडपणा पुन्हा उघडकीस आला. अरावमचल येथे संघाच्या शाखेवर ‘सीपीएम’च्या आणि ‘डीवायएफआय’च्या गुंडांनी हिंसक हल्ला चढवला. हा एकप्रकारे आपली दहशत निर्माण करून लोकांना शाखेत सहभागी होण्यापासून रोखण्याचाच आणखीन एक प्रयत्न. उत्तर 'केरळम्'मधील कन्नूर परिसरात तर राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. एवढेच नाही तर आजवर शेकडो स्वयंसेवकांनी कम्युनिस्टांच्या या हिंसेपायी प्राणांची आहुती दिली. तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा केरळम्मधील वाढता संघटनात्मक विस्तार हा राज्यातील वैचारिक आणि सामाजिक अवकाशातील बदलाचे प्रतिबिंब म्हणावा लागेल.
केरळम्मध्ये संघाच्या गृहसंपर्क अभियानाअंतर्गत सुमारे २२ लाख घरांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले. त्यात सुमारे ६४ हजार मुस्लीम आणि ५४ हजार ख्रिश्चन कुटुंबांचाही समावेश होता. देशभरात दहा कोटींपेक्षा अधिक घरांशी संपर्क आणि तीन लाखांहून अधिक गावांपर्यंत संघ पोहोचला; आणि हेच डाव्यांच्या डोळ्यांना खुपत आहे. संघविरोधकांसाठी एक वेगळे आव्हान यानिमित्ताने उभे ठाकले आहे. शाखा मैदानावर उभी राहते; पण संघाचा प्रभाव केवळ मैदानापुरता मर्यादित राहत नाही. घराघरांत संपर्क, सामाजिक उपक्रम, युवकांशी संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध समाजघटकांशी संपर्क या माध्यमातून संघटन विस्तारण्याचा प्रयत्न होत आहे. युवक शाखेत येत आहेत, नव्या गावांमध्ये शाखा सुरू होत आहेत आणि गृहसंपर्काच्या माध्यमातून संघाचे कार्यकर्ते अशा कुटुंबांपर्यंतही पोहोचत आहेत. हा केवळ ‘सीपीएम विरुद्ध संघ असा संघर्ष नाही. हा केरळम्च्या अस्तित्वात कोणकोणत्या विचारांना, संघटनांना आणि सामाजिक शक्तींना स्थान मिळणार आहे, याचाही प्रश्न आहे. गेल्या १०० वर्षांच्या कालखंडात संघाने केरळम्मध्ये हिंसा, विरोध आणि राजकीय संघर्षाचा अनेकदा सामना केला. तरीही त्याच राज्यात शाखाविस्तार आणि गृहसंपर्क अभियान पुढेच जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कम्युनिस्ट शक्तींनी संघाला कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तरी संघाच्या वाढत्या जनाधराचा अश्वमेध ते रोखू शकणार नाहीत.
सद्भावाने प्रतिकार!
केरळम्'च्या राजकारणात आणि सामाजिक पटलावर गेली अनेक दशके वामपंथी विचारसरणीचे वर्चस्व कायम राहिले आहे. शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक संस्थांपासून ते थेट कामगार संघटनांपर्यंत सर्वच क्षेत्रांवर स्वतःची हुकूमशाही गाजवून इतर कोणत्याही विचारसरणीला मूळ धरू न देणे, हा डाव्यांचा आजवरचा मुख्य अजेंडा राहिला. मात्र, बदलत्या काळासोबत आणि विशेषतः ‘जेन-झी’ व नव्या पिढीच्या वैचारिक परिपक्वतेमुळे डाव्यांचा हा एकतर्फी प्रभाव आता पार ढासळू लागला आहे. या वैचारिक एकाधिकारशाहीला सर्वांत मोठे आणि ताकदवर आव्हान ठरत आहे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. केरळम्मधील तरुण, विशेषतः ‘जेन-झी’, डाव्यांच्या पोकळ आणि हिंसक तत्त्वज्ञानाला कंटाळला असून, संघाच्या शिस्तबद्ध, राष्ट्रवादी आणि समाजोपयोगी कार्याकडे मोठ्या संख्येने आकृष्ट होत आहे. शाखांमध्ये तरुणांची उपस्थिती गगनाला भिडत आहे. डाव्यांनी वर्षानुवर्षे पसरवलेला ‘संघद्वेषाचा’ आणि ‘भयाचा’ फुगा संघ स्वयंसेवकांमुळे पूर्णपणे फुटला आहे. १ हजार ५०० हून अधिक हिंदू संमेलनांच्या माध्यमातून संघाने तळागाळातील समाजाला एकत्र आणले असून, समाजातील ‘सज्जनशक्ती’ला सद्भाव आणि समरसतेच्या सूत्रात बांधले.
त्यामुळे अरावमचल येथे संघाच्या शांततापूर्ण चाललेल्या शाखेवर वामपंथी गुंडांनी केलेला भ्याड आणि हिंसक हल्ला हा केवळ एका शाखेवरचा हल्ला नाही; तर तो डाव्यांच्या पोटात उठलेल्या भीतीचा पुरावा आहे. शताब्दी वर्षात संघाचा होणारा ‘शाखा कार्यविस्तार’ पचवणे डाव्यांच्या पोटापाण्याच्या आणि राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने गेल्या कित्येक वर्षांत डाव्यांनी संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर छळ केला. तरीही संघ पाठीमागे हटला नाही; उलट प्रत्येक हत्येनंतर आणि हल्ल्यानंतर 'केरळम्'मध्ये संघाची ताकद दुप्पट वेगाने वाढली. अरावमचल येथील हल्ला हा डाव्यांच्या ताकदीचा नाही, तर त्यांच्या ‘अंतिम विनाशाच्या भीती’चा द्योतक आहे. डाव्या गुंडांच्या भ्याडहल्ल्यांना न घाबरता, ‘सद्भाव आणि समरसता’ या शस्त्राच्या जोरावर संघ केरळम्च्या भूमीवर वैचारिक विजय मिळवत आहे, हेच आजचे सत्य!