ठाणे (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case) : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून उबाठा गट आणि त्यांच्या नेत्यांकडून मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न सुरू आहे’, अशी घणाघाती टीका ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली... शिवसेना पक्षाची कार्यकर्ती असल्यानेच आपल्याला या हत्या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्याचा आणि राजकीयदृष्ट्या लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
पूर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे शिंदे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर शिंदे यांच्यावर आरोप केले जात असल्याने आज शुक्रवारी मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)
‘एफआयआर दाखल झाला त्यावेळी त्यात माझ्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यानंतर या प्रकरणात माझं नाव गोवण्यासाठी आदित्य ठाकरे,संजय राऊत ,उद्धव ठाकरे यांनी पोलिसांवर दबाव निर्माण केला. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नसतानाही माझ्यावर बेछूट आरोप करून यात मला गोवण्याचा प्रयत्न होत आहेत,’ असा दावा शिंदे यांनी केला.
‘मृत्यूनंतरही राजकारणाची पोळी शेकण्याचा प्रयत्न’
प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यूनंतर पोलिस ठाण्याबाहेर मृतदेह ठेवण्यात आल्याच्या घटनेचा संदर्भ देत शिंदे यांनी उबाठा नेत्यांवर निशाणा साधला. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)
‘एकीकडे हा अत्यंत संवेदनशील विषय असताना मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न सुरू होता. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या दुःखद प्रसंगात राजकारणाची पोळी शेकण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोप त्यांनी केला.
आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही केविलवाणी धडपड सुरू असल्याचेही शिंदे म्हणाल्या. ‘एखाद्या महिलेचा या प्रकरणात संबंध नसताना तिला गोवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण मी माझ्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहत आहे,’ असेही त्यांनी सुनावले. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)
आपल्याविरोधात आरोप करणाऱ्यांकडे पुरावे असतील तर ते समोर आणावेत, असे आव्हान देत त्या म्हणाल्या, ‘उद्या कोणत्याही घटनेत माझं नाव घेतलं म्हणून मी आरोपी ठरणार नाही. आरोप करण्यासाठी पुरावे लागतात. पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप करणे थांबवा.’
दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवर पलटवार
यावेळी शिंदे यांनी दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. ‘दिशा सालियनच्या कुटुंबीयांकडून गेली अनेक वर्षे न्यायासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्या प्रकरणातही आरोप झाले होते. मग त्या प्रकरणाचा पूर्ण तपास आणि उलगडा करण्याची मागणी तुम्ही का केली नाही?’ असा सवाल त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणातील एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांनाही अटक करण्याची मागणी का नाही करण्यात येत आता सवलाही त्यांनी उपस्थित केला. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)
राऊतांवर निशाणा
संजय राऊत मला एकनाथ शिंदेच्या खासमखास आहेत, असे म्हणाले होते. पण परवा जेव्हा ते ठाण्यात आले होते, तेव्हा आदित्य ठाकरे त्यांच्या बाजूला बसले होते. पण तुम्ही एकटेच बोलत होते. मग आम्ही असं म्हणायचं का की तुम्ही रश्मी ठाकरेंचे खासमखास आहात?, असा सवाल मिनाक्षी शिंदे यांनी केली. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)
‘पोलिस तपासाला पूर्ण सहकार्य करणार’
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून दोषी कोण आहेत, हे तपासातून समोर येईल, असे शिंदे यांनी सांगितले. आपली किंवा पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी झाली तर त्याला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)
‘ठाणे पोलिस आणि इतर तपास यंत्रणांना आम्ही पूर्ण सहकार्य करू. पोलिस तपास सुरू असताना यापुढे मी या प्रकरणावर कोणतेही भाष्य करणार नाही,’ असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या हत्येच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून तपासाचा रोख हत्येचा कट, सूत्रधार आणि आरोपींच्या भूमिकेकडे आहे. (Meenakshi Shinde Pradeep Purnekar Case)