भारतीय ‘एआय’चा अंतराळात डंका

    03-Oct-2026
India AI Satellite MOI-1A
 
भारताचा पहिलावहिला ‘एआय’ उपग्रह अंतराळात झेपावला असून, आकाशातच माहितीचे विश्लेषण करण्याची अभूतपूर्व क्षमता त्याने सिद्ध केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे अमेरिका, युरोपीय महासंघ आणि चीननंतर असा पराक्रम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला असून, भारतीय तंत्रज्ञांनी देशाची मान जागतिक मंचावर अभिमानाने उंचावली आहे.
 
हैदराबादमधील ‘टेक-मी-टू-स्पेस’ या स्टार्टअप कंपनीने ‘एमओआय-१ए’ हा भारताचा पहिलावहिला ‘ऑर्बिटल कॉम्प्युटिंग’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपग्रह नुकताच अंतराळात यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून नवा इतिहास रचला. आजवरचा जागतिक अंतराळ विज्ञानाचा इतिहास पाहिला, तर उपग्रह हे पृथ्वीचे किंवा अंतराळाची हजारो छायाचित्रे आणि डेटा गोळा करण्याचे काम करत असत. हा महाकाय असा डेटा त्यानंतर पृथ्वीवरील केंद्रांवर डाऊनलोड केला जायचा आणि मग संगणकाद्वारे त्याचे विश्लेषण केले जायचे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रचंड वेळ, इंटरनेटची बॅण्डविड्थ आणि कोट्यवधी रुपये खर्ची पडत होते. मात्र, ‘एमओआय-१ए’ हा उपग्रह अंतराळातील चालताबोलता संगणक आणि डेटा सेंटरचे काम करणार आहे. तो अवकाशातून टिपलेल्या छायाचित्रांवर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने प्रक्रिया करेल आणि आवश्यक, विश्लेषित माहितीच पृथ्वीवर पाठवेल.
 
एका अंदाजानुसार, या तंत्रज्ञानामुळे उपग्रहावरून पृथ्वीवर पाठवल्या जाणार्‍या डेटामध्ये ९० ते ९५ टक्क्यांची कपात होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी पिकाचे नुकसान झाले असेल किंवा खाणकामाचा आढावा घ्यायचा असेल, तर तो हजारो जीबीची छायाचित्रे पाठवण्याऐवजी नुकसानीचा अचूक आणि संक्षिप्त माहितीच खाली पाठवेल. ५० किलोंहून कमी वजन असलेल्या या उपग्रहात अत्यंत प्रगत असे ‘एनव्हिडिया’चे प्रोसेसर बसवले आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या काळात, पुराचा वेढा पडल्यावर किंवा युद्धाच्या परिस्थितीत सीमेवरील शत्रूच्या हालचालींवर प्रत्यक्ष वेळेत (रिअल-टाईम) लक्ष ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान भारतासाठी वरदान ठरणार आहे. पूर्वी ज्या माहितीसाठी आपल्याला तासन्तास वाट पाहावी लागायची, ती माहिती आता काही सेकंदांत थेट लष्कराच्या आणि प्रशासनाच्या हाती पडेल.
 
अभिमानास्पद बाब म्हणजे, थेट अंतराळात ‘एआय’द्वारे डेटावर प्रक्रिया करण्याचे हे गुंतागुंतीचे आणि प्रगत ‘एज कॉम्प्युटिंग’ तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील केवळ चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, युरोपीय महासंघ आणि चीन या तीनच बलाढ्य शक्तींना अंतराळातील हे तंत्रज्ञान साध्य करता आले होते. आता भारताने त्यांच्या पंक्तीत बसवण्याचा मान सन्मानाने मिळवला आहे. ज्या भारताची संभावना काही दशकांपूर्वी तिसरा ‘जगातील गरीब देश’ म्हणून केली जात होती आणि ज्यांच्या अंतराळ मोहिमांची पाश्चिमात्य माध्यमे व्यंगचित्रे काढून खिल्ली उडवत असत, तोच भारत आज थेट अंतराळात स्वतःची ‘एआय लॅब’ उभारत आहे, हे वास्तव प्रत्येक भारतीयाला सुखावणारे असेच. तथापि, भारताला हे यश एका रात्रीत मिळालेले नाही. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेले धाडसी आणि दूरदृष्टीचे निर्णयही कारणीभूत आहेत.
 
२०२० मध्ये केंद्र सरकारने भारताचे अंतराळ क्षेत्र लालफितीच्या आणि ‘इस्रो’च्या एकाधिकारशाहीतून मुक्त करून खासगी कंपन्यांसाठी खुले केले, तेव्हा अनेकांनी त्या निर्णयावर साशंकता व्यक्त केली होती. मात्र, आकडेवारी पाहिल्यास २०१४ पूर्वी देशात एक किंवा दोन स्पेस स्टार्टअप्स होते, तीच संख्या आज ‘इन-स्पेस’च्या निर्मितीनंतर ४४०च्या घरात पोहोचली आहे. इतकेच नव्हे, तर गेल्या काही वर्षांत ‘भारतीय स्पेस स्टार्टअप्स’मध्ये एक हजार कोटी रुपयांहून अधिक विदेशी गुंतवणूक आली आहे. सध्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा दोन ते तीन टक्के (सुमारे आठ अब्ज डॉलर्स) आहे, तो येत्या दशकात दहा टक्क्यांपर्यंत (४० अब्ज डॉलर्स) नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
 
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या क्षेत्रात भारत कुठेही मागे राहिलेला नाही. जगभरात नवीन तंत्रज्ञान यायचे, तेव्हा ते भारतात पोहोचायला दशके जायची आणि भारतीय तरुण पाश्चिमात्य आयटी कंपन्यांसाठी बॅक-ऑफीसचे किंवा कोडिंगचे काम करायचे. आज चित्र पूर्णपणे बदलले असून, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या योजनांनी जगभराला चकित करण्याचे काम केले आहे. भारत ‘एआय’चा वापरकर्ता राहिलेला नाही, तर तर तो ‘एआय’चा निर्माता बनला आहे. ‘टेक-मी-टू-स्पेस’ने या प्रक्षेपणाआधीच कृषी, खाणकाम, हवामान आणि विमा क्षेत्रातील २३ जागतिक ग्राहकांसोबत करार केले आहेत, हे भारताच्या व्यावसायिक आणि तांत्रिक यशाचे मोठे द्योतक आहे. भविष्यातील युद्धे आणि तंत्रज्ञानाची जागतिक शर्यत ही जमिनीवर नाही, तर अंतराळात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्याच माध्यमातून लढली जाणार आहे. भारताची तरुणाई आणि इथले नवोद्योग या शर्यतीत आघाडीवर आहेत, हे या घटनेने सिद्ध केले आहे.
 
एका बाजूला हे आशादायी आणि सकारात्मक चित्र असताना, देशातील एका विशिष्ट विचारसरणीच्या तरुणाईचे आणि राजकीय परिस्थितीचे चित्र विदारक आणि विचार करायला भाग पाडणारे आहे. दिल्लीच्या ‘जंतरमंतर’वर किंवा मुंबईतील शिवाजी पार्कवर काही युवा राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनून, खोट्या ‘नॅरेटिव्ह’ला बळी पडून, जाती-धर्माच्या आणि आरक्षणाच्या नावाखाली रस्त्यांवर आंदोलने करत आहेत. राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यासारखे नेते आणि काही विरोधी पक्ष तरुणांच्या मनात बेरोजगारीचा आणि जातिभेदाचा विखारी विचार पेरून त्यांना रस्त्यावर उतारवयाला भाग पाडत आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, रस्ते अडवणे आणि देशाच्या प्रगतीत अडथळे आणणे, यातच ही भरकटलेली तरुणाई धन्यता मानत आहे. याच देशातील ‘टेक-मी-टू-स्पेस’सारख्या कंपन्यांमधील तरुण संशोधक आणि तंत्रज्ञ बुद्धिमत्तेच्या बळावर प्रयोगशाळांमध्ये रात्रंदिवस एक करून भारताचा तिरंगा थेट अंतराळात फडकावत आहेत. रस्त्यावर उतरून हुल्लडबाजी करणारी आणि मोफतच्या आश्वासनांवर जगणारी ही तरुणाई देशाला जागतिक महासत्ता बनवू शकत नाही. देशाचे भविष्य घडवायचे असेल, तर संशोधन, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचीच कास धरावी लागते, हे या तरुणांना कोण सांगणार?
 
‘एमओआय-१ए’ उपग्रहाचे हे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे, नव्या आणि ‘आत्मनिर्भर भारता’ची उज्ज्वल नांदी ठरली आहे. ज्या तरुणांनी आपले मौल्यवान आयुष्य नेत्यांच्या घोषणाबाजीत आणि खोट्या ‘नॅरेटिव्ह’मध्ये वाया घालवण्याचे ठरवले आहे, त्यांनी हैदराबादच्या या तरुण तंत्रज्ञांचा आदर्श हा घ्यायलाच हवा. हीच प्रेरणा घेऊन युवा पिढीने स्वतःच्या नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायला हवा. राजकारणातील द्वेषाच्या ‘फेक नॅरेटिव्ह’पेक्षा अंतराळातील विज्ञानाचे हे ‘फॅट्स’ भारताला वेगाने प्रगतिपथावर नेतील. आज भारताने तंत्रज्ञान आणि अंतराळात जी उत्तुंग गगनभरारी घेतली आहे, ती येणार्‍या पिढ्यांसाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गाथा ठरेल, यात कोणतीही शंका नाही!




संबंधित मजकूर