थरारक, उत्कंठावर्धक ‘दृश्यम् ३’

    03-Oct-2026
 
 Drishyam 3 Movie Review
 
‘दृश्यम् ३’ असो वा ‘दृश्यम् २’, अजय देवगणच्या या ‘थ्रिलर’ चित्रपट मालिकेने, प्रेक्षकांचे नेहमीच पुरेपूर मनोरंजन केले. २०१५ साली ‘दृश्यम्’चा पहिला भाग प्रदर्शित झाला. तेव्हा या चित्रपटाला एवढी लोकप्रियता मिळाली की, आजही दि. २ ऑक्टोबर रोजी ‘विजय साळगावकर फॅमिली कुठे गेली होती,’ यावर मिम होतात. या चित्रपटाचा तिसरा आणि शेवटचा भाग ‘दृश्यम् ३’ प्रदर्शित झाला आहे. खरं सांगतो, हा भाग दुसर्‍या भागापेक्षाही उत्कंठावर्धक आणि मजेशीर झाला आहे.
 
चित्रपटाची गोष्ट मागील भागातून पुढे सुरू होते. पुन्हा एकदा, देशमुख कुटुंब आपल्या मुलाच्या हत्येचा न्याय मिळवण्यासाठी, प्रयत्न करते. यावेळी, मीरा देशमुख (तब्बू) आणि तिचा नवरा महेश देशमुख (रजत कपूर), गुन्हे शाखेचा पोलीस अधीक्षक राजवीर सिंग तोमर (जयदीप अहलावत) यांची मदत घेतात. राजवीरकडे एक महत्त्वाचा पुरावा असतो, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस येते. त्यामुळे विजय साळगावकर (अजय देवगण) आणि त्याचे कुटुंब पुन्हा एकदा संकटात सापडते. चित्रपटाचा पूर्वार्ध पोलीस आणि विजयभोवती फिरत असला, तरी उत्तरार्ध न्यायालयीन खटल्यावरच लक्ष केंद्रित करतो. इथेच देशमुख कुटुंबाच्या वकिलाच्या भूमिकेत, या फ्रॅन्चायझीत नव्याने सामील झालेले इंद्रजित शेट्टी (प्रकाश राज) यांचे आगमन होते. चित्रपटात पुढे काय घडते, हे कथा वाचण्यापेक्षा, पडद्यावर पाहण्यात जास्त मजा येईल.
 
तुमची मजा खराब होऊ नये, म्हणून कथेबद्दल एवढीच माहिती पुरेशी आहे. प्रत्येक ‘दृश्यम्’चाहत्याला, दि. २ ऑक्टोबरमागचं सत्य माहीत आहेच! पावभाजी, सत्संग, चित्रपट आणि मग विजय साळगावकरचा कट, ज्याने पोलिसांना वर्षानुवर्षे गोंधळात टाकलं होतं. पण, यावेळी गोष्ट दि. २ ऑक्टोबरवरच थांबत नाही. आता आणखी एक दिनांक समोर आली आहे, दि. २३ जुलै! ही दिनांकच या चित्रपटात खरी मजा आणते. त्या दिवशी विजय कुठे होता, काय घडलं आणि पोलीस या दिनांकाचा वापर करून, विजयची संपूर्ण गोष्ट उलगडू शकतील का? यावेळी विजय खरोखरच अडकणार का, हे सगळं तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
 
‘दृश्यम् २’नंतर अभिषेक पाठकनेच पुन्हा एकदा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्याने काम उत्कृष्ट केले आहे. बर्‍याच काळानंतर आपल्याला असा एक बॉलीवूड चित्रपट पाहायला मिळाला आहे, जो लायमॅसपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. यावेळी चित्रपट केवळ विजय साळगावकरवरच नव्हे, तर इतर सर्वांच्या समान भूमिकांवरही लक्ष केंद्रित करतो. चित्रपटातील अनेक दृश्ये इतकी वेगवान आहेत की, अंगावर काटाच उभा राहातो. अगदी शेवटपर्यंत, विजय पुढे काय करणार, याची तुम्हाला खात्री नसते. अभिषेकच्या दिग्दर्शनकलेची दाद द्यायलाच हवी. चित्रपटगृहांतील प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या, हीच अभिषेकला मिळालेली खरी दाद आहे.
 
अभिषेक पाठकची जमेची बाब ही की, त्याने पहिल्या दोन भागांप्रमाणे यावेळी मल्याळी आवृत्तीची नक्कल न करता, ‘फ्रेश’ कथा प्रेक्षकांसमोर सादर केली. इथेच त्याने बाजी मारली. कारण, यामुळे चित्रपट अजून उत्कंठावर्धक झाला आहे. कथेत नवीन प्रश्न जोडले गेले असून, दि. २३ जुलैचा भाग सर्वांत रंजक आहे. चित्रपट पटकन कथानकात शिरतो, पात्र परिचयात जास्त वेळ वाया घालवत नाही. प्रेक्षकांना विजयचे जग आधीच माहीत असल्याने, चित्रपट थेट सुरू होतो.
 
पण, हीच त्याची कमकुवत बाजूही आहे. पहिल्या दोन भागांमध्ये विजय आणि त्याच्या कुटुंबातील भावनिक बंध अधिक घट्ट होते. यावेळी, कथा विजयच्या पुढील वाटचालीवर अधिक लक्ष केंद्रित करते. थरार वाढला आहे; पण कौटुंबिक भावना काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. पटकथा या चित्रपटाची सगळ्यांत मोठी ताकद. चित्रपट उत्तरे देण्याऐवजी, सातत्याने नवीन प्रश्न निर्माण करतो.
 
अजय देवगणने आपल्या आधीच्या दोन चित्रपटांमध्ये दाखवलेला संयम, विजय साळगावकरच्या भूमिकेत पुन्हा एकदा आणला आहे. त्याच्या अभिनयावरून हे सिद्ध होते की, सध्या भारतातला तो सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. बर्‍याच दृश्यांमध्ये तो फक्त डोळ्यांमधून बोलला आहे. त्याच्या चेहर्‍यावर फारसे हावभाव नाहीत, आवाजात फारसा बदल नाही, पण त्याचे डोळे खूप काही सांगून जातात. जयदीपच्या उत्कृष्ट अभिनयामुळेही हा चित्रपट पाहण्याचा आनंद अजून वाढतो. त्याचे संवादही अप्रतिम आहेत. अनेक ठिकाणी त्याचा अभिनय जबरदस्तच आहे.
 
चित्रपटाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे, अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील संघर्ष. प्रकाश राज यांनीही उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या संवादफेकीमुळे आणि शैलीमुळे, न्यायालयातील दृश्ये प्रभावी ठरतात. तब्बू आणि रजत यांनी नेहमीप्रमाणेच, मीरा आणि महेश देशमुखांच्या भूमिका संयतपणे साकारल्या. यावेळी पटकथेत त्यांच्यासाठी फार काही नव्हते, तरीही त्यांचे काम उत्तम आहे. मागील दोन्ही चित्रपटांमध्ये, विजयची पत्नी आणि मुलगी यां पात्रांचे संवाद उत्तम होते. त्यांना अधिक वावही मिळाला होता. मात्र, यावेळी कथा विजय आणि राजवीर यांच्यावर केंद्रित असल्याने, त्या दोघांनाही फारसा वाव नाही. तरीही, श्रिया आणि इशिता यांनी भूमिकांना न्याय दिला आहे. गायतोंडेंची भूमिका साकारणारे कमलेश सावंत सिनेमाची जान असून, त्यांचे ‘वन लाईन पंचेस’ मजा आणतात.
 
अमर मोहिले यांचे पार्श्वसंगीत ही चित्रपटाची प्रमुख ताकद. विजयच्या योजना जसजशा उलगडतात, तसतसे संगीत उत्कंठा वाढवते. अनेक दृश्यांमध्ये काहीतरी घडणार आहे, हे आपल्याला आधीच कळते. तरीही, संगीत अस्वस्थता वाढवते. एकूणच काय, तर ‘दृश्यम् ३’ हा या वर्षातील सर्वोत्तम थरारपट आहे, जो तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
 
निर्माता : आलोक जैन, अजीत अंधारे, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक
दिग्दर्शक : अभिषेक पाठक
लेखक : अभिषेक पाठक, अमाल कियान खान, परवेज शेख
कलाकार : अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर, जयदीप अहलावत , प्रकाश राज, कमलेश सावंत, इशिता दत्ता, सौरभ शुला
 
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर