‘हनुमान अंश’ या सिनेमाने, बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. या सिनेमाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे की, असं या सिनेमात नेमकं काय आहे, की प्रेक्षक भरभरून प्रेम सिनेमाला देत आहेत. या सगळ्याविषयी चित्रपटात पार्वतीच्या भूमिकेत दिसणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा परांजपेशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. चित्रपटाला एवढं मोठं यश मिळेल, असा प्रदर्शनाच्या वेळेस विचार आला होता का ?
नाही, असा विचार नक्कीच नव्हता केला. कारण, चित्रपट कमी बजेटचा होता. शिवाय, यातील सगळे कलाकारही तसे नवखेच होते. पण प्रेक्षकांच्या प्रेमाने, आम्ही खरच भारावून गेलो आहोत.
जवळपास दोन कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट झाला. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्या शनिवार-रविवारची मिळकत होती दहा लाख. अचानक असा काय चमत्कार घडला की, दुसर्या आठवड्यात चित्रपट एकदम ४०० कोटींपर्यंत जाऊन पोहोचला? बरं, याच काळात हिंदी चित्रपटही आले. या सगळ्यांतही या चित्रपटाने तग धरला आणि सगळ्यांना धोबीपछाड देत कोटींची उडाणे घेतली.
मला असं वाटतं की, यामागे अनेक कारणं आहेत. सुरुवातीचे दोन आठवडे तर कदाचित चित्रपटाला ‘सेट’ व्हायलाच लागले. कारण, बजेट कमी असल्याने त्याचा जसा प्रचार हवा होता, तसा झाला नाही. मोठ्या शहरात चित्रपटाचं पोस्टर दिसतही असेल, पण सतना किंवा चित्रकूट अशा छोट्या गावांमध्ये तेही नव्हतं. इथेही बर्याच ‘मल्टिप्लेसेस’मध्ये पोस्टर नव्हतं. त्यामुळे ज्यांनी चित्रपट बघितला, त्यांना आवडला. त्यामुळे झालेल्या ‘माऊथ पब्लिसिटी’च्या जोरावरच चित्रपटाने वेग धरला. समाजमाध्यमांवर रील्स व्हायरल झाल्याचाही फायदा झाला. यामुळेही प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत पोहोचले.
चित्रपट जेव्हा सुरू झाला, तेव्हा अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला. बरेचदा प्रदर्शनाची तारीखही, बदलण्यात आली. आता अडचणींवर मात करून जे यश मिळालंय, ते बघून काय वाटतंय?
विशाल सरांनी आधीच सांगितलं होतं की, आपण कमी स्क्रीनपासून सुरू करत आहोत. सगळ्यांनाच माहीत होतं, आमचं बजेट कमी होतं. जास्त स्क्रीन घेतल्या असत्या, तर ते वाढलं असतं. चित्रपट किती लोक बघतील, याची आम्हालाही शाश्वती नव्हती. आम्ही ७० एमएम स्क्रीनवर दिसणार, याचाच आम्हाला आनंद होता. तरीही एक सुप्त इच्छा होतीच की, आमचा चित्रपट लोकांनी बघावा, तो ‘हिट’ व्हावा अशी. दि. १५ ऑगस्ट रोजी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. पण, ते बॉस ऑफीसवर चालले नाहीत, याचाही आम्हाला कुठेतरी फायदाच झाला. समाजमाध्यमांवरच्या व्हायरल रिल्सचाही आम्हाला फायदा झाला.
शिवाय, ’टॉक्सिक’पण बॉक्स ऑफीसवर चालला नाही. त्यामुळे अचानक आमचे शोज् देशभरात वाढू लागले. हे सगळंच अनाकलनीय होतं. मला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघण्यासाठी ‘थिएटर व्हिजिट’ करायचे होते; पण माझं शूटमुळे ते शय होत नव्हतं. तिसर्या आठवड्यात शुक्रवारी मला वेळ होता. त्यामुळे मी सहज शोज् पाहिले, तर एकट्या ठाण्यातच ६० शोज् होते. हा माझ्यासाठी एक सुखद धक्काच होता, हा बाबाजींचाच आशीर्वाद म्हणावा लागेल.
चित्रपटात पार्वतीची भूमिका तू साकारलीस. पार्वती नेमकी कशी आहे? ही भूमिका तुला कशी मिळाली?
पार्वती निम करोली या गावातील एक सामान्य स्त्री. ती निम करोली बाबा यांची भक्त होते; म्हणजे त्यांच्या अनुयायांपैकी एक. बाबांच्या सान्निध्यात राहून तिला कळतं की, आपण कसं राहायला हवं. बाबांकडे कुठल्या दिव्य शक्ती आहेत, हे त्यांच्या जवळच्या लोकांना प्रकर्षाने जाणवू लागतं. मग, त्यांच्यातील बदल दर्शवणारी ही भूमिका आहे.
दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्यासोबत, काही वर्षांपूर्वी मी एक जाहिरात केली होती. त्यामध्ये त्यांनी माझ्याशी बर्याच वेळा बुंदेली भाषेबद्दल चर्चा केली. कारण मी जबलपूरची असल्याने, मला ती भाषा येते. ते बर्याचदा माझ्याशी त्याच भाषेत संवाद साधत. ती भाषा येणंच माझ्या पथ्यावर पडलं. नंतर सरांनी मला सांगितलं की, ते माझी ‘टेस्ट’ घेत होते आणि त्यात मी ‘सिलेट’ झाले.
‘स्टार प्रवाह’च्या ‘आनंदी’ मालिकेत सध्या तू काम करत आहेस. ‘स्टार’सोबत तू याआधीही काम केलं आहेस. त्यामुळे ‘स्टार’सोबत एक वेगळंच नातं झालंय का?
‘आनंदी’ मालिकेलाही, प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवड्यात मी खरेदीसाठी गेले असता; एका दुकानात दोन बायका माझ्याकडे बघून बोलत होत्या की, "यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय.” मग मीच त्यांना विचारलं, "तुम्ही कुठे, काय बघितलंय?” तर त्यांनी आठवत नव्हत. मग मीच त्यांना विचारलं "आनंदी’ बघता का?” तर त्या आनंदाने "हो” म्हणाल्या. हा मालिकेचा परिणाम आहे. मालिकेमुळे तुम्ही घराघरांत पोहोचता. ‘स्टार प्रवाह’सोबत मोठी भूमिका असलेली ही माझी दुसरी मालिका. त्यामुळे इथे सगळ्यांसोबतच मस्त नाते तयार झाले आहे.
‘हनुमान अंश’ची ‘पार्वती’ साकारल्यावर काही फरक जाणवत आहे का?
जास्त फरक मला इंन्स्टाग्रामवरच जाणवला. इंस्टाग्रामवर मला संपूर्ण जगभरातून संदेश येत आहेत, प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे भारावून जायला होते. माझ्या काही मैत्रिणी हैदराबादला आहेत, त्यांनीही चित्रपट बघितल्याचे फोन करून कळवलं. तसेच, विशेष म्हणजे, दक्षिण भारतीय लोकही ते हिंदीतला चित्रपट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे खरच कमाल आहे. नुकतीच मी खंडव्याला गेले होते, तिथेही खूप प्रेम, सन्मान मिळाला. प्रेक्षकांची ही प्रेमाची पावती बघून, भारावल्यासारखे होते. चित्रपटातील माझी भूमिका लोकांना आवडत आहे, याचे समाधान आहे. त्यामुळे आता सहाजिकच जबाबदारीही वाढली आहे. भविष्यात बाबांच्या आशीर्वादामुळे अजून चांगलं काम करण्याचा हुरूपही आला आहे.
बाबांचे भक्त जगभरात असून, अनेक सेलिब्रिटीही त्यांचे भक्त आहेत. तर अशा व्यक्तिरेखेवरील चित्रपटात काम करून कसं वाटत आहे?
खूपच छान! एक वेगळा आनंद यासाठी की, पहिलाच चित्रपट आपण आस्थेला धरून असणारा केला आणि तो ‘सुपरहिट’ही झाला. शिवाय, त्यामध्ये आपण काम केलं आहे, यापेक्षा चांगली भावना काय असू शकते? विराट कोहली, अनुष्का शर्मापासून अनेक मोठे सेलिब्रिटी त्यांचे अनुयायी आहेत. ‘हनुमान अंश’मध्ये एक आस्था घेऊनच चित्रपट निर्मिती केली. बरं, तो बाबांच्या अनुयायांबरोबरच, सर्वसामान्य प्रेक्षकांनीही बघितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही तुम्ही भेटलात. त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय पंतप्रधान यांनी आमचं कौतुक केल्याचे पाहूनच, मला आनंद झाला. "आपण चित्रपट अजून बघितला नसून, लवकरच बघणार आहे,” असं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भजन जामिंग’मध्येही सहभागी झाले होते. त्यामध्ये त्यांनी खंजीर वाजवून आमच्या ‘पार्वती’ गाण्याला जो प्रतिसाद दिला, तो डोळ्यांचे पारणे फेडणाराच होता. त्यांनीही आमचं प्रचंड कौतुक केलं.
मुलाखत : कपिल देशपांडे