देशात सध्या ‘झुरळ पार्टी’चे आंदोलन, आंदोलनकर्त्यांच्या धमक्या, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करून चाललेली ‘मीडिया ट्रायल’, ‘फेक नॅरेटिव्ह’ एसपर्ट राहुल गांधी यांचे ‘व्होटचोरी’चे आरोप त्यामानाने थोडा कमी चर्चेत असलेला ‘आयआयटी मुंबई’तील विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रश्न यांचा जोर असतानाच, ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने एक वेगळीच हवा निर्माण केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना-सव्वा महिना झाला, तरी चित्रपटगृहाकडे जाणारी पाऊले संपत नाहीत. कारण, हा चित्रपट जीवनमूल्ये जागविणारा चित्रपट ठरला आहे.
विविध चॅनेल्सवर अजूनही ‘हनुमान अंश’ या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. चित्रपट शूटिंगवेळी अनुभवाला आलेले चमत्कार, ‘जब जिद पे आ गयी पार्वती’ या गाण्यावरची नृत्ये, या गाण्याला पार्वतीने दिलेले उत्तर (यातील चित्रपटात काही नाही.) लोकप्रतिभेतून निर्माण झालेले हे सर्व विषय आहेत. ‘जब जिद पे आ गयी पार्वती’ हे गाणं ‘व्हिडिओ साँग’ या रूपात जेव्हा आपण पाहतो आणि ऐकतो, तेव्हा असे वाटते की, चित्रपटातही ते तसेच असेल, पण चित्रपटात ते तसे नाही. एका प्रसंगात ते पार्श्वसंगीत म्हणून वापरले आहे.
या गाण्याचा प्रभाव किती? तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी गायक तिवारी यांच्या मुखातून हे गाणं ऐकताना तल्लीन झालेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला आहे. मोदींनी तल्लीन होणे, काही विशेष नाही. कारण, ते सनातन धार्मिक प्रवृत्तीचे पंतप्रधान आहेत. नवरात्रीत नऊ दिवस उपवास करतात. सर्व तीर्थक्षेत्रांची यात्राही करतात. रामजन्म स्थानावरील भव्य राममंदिराच्या लोकसमर्पण कार्यक्रमात ते प्रभू रामाची पूजा करतात. त्यांचे पंतप्रधानपद याच्या आड येत नाही.
मुस्लीम तुष्टीकरणासाठी देशावर ‘सेयुलॅरिझम’ लादणार्या राजकीय प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांचा व्यवहार आहे. ‘जब जिद पे आ गयी पार्वती’ याचा अर्थ असा की, पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. नरेंद्र मोदी हेदेखील ‘जब जिद पे आ गये मोदी’ असे म्हणून देशाला आपल्या पूर्ववैभवाने मंडित करण्याची तपश्चर्या करीत आहेत. ही अवघड तपश्चर्या आहे. यात असंख्य विघ्नं आहेत, पण नरेंद्र मोदी कशानेही डगमगत नाहीत. पार्वतीप्रमाणे ते दृढ आहेत.
आज देशाचा विचार करता, देशात वेगवेगळ्या प्रकारच्या असुरी शक्तींचे थैमान चालू आहे. असुरी शक्ती या मायावी शक्ती असतात. मायावी शक्ती म्हणजे, खोटी रूपे घेऊन लोकांना फसविणारी असतात. रावणाने सन्याशाचे मायावी रूप घेऊन सीतेला पळवून नेले. भोळी-भाबडी सीता सन्यासी रूपाला फसली. एक मायावी रूप आहे, ‘संविधान बचाव’चे. दुसरे रूप आहे, ‘लोकशाही धोयात’ असल्याचे, तिसरे रूप आहे, ‘हुकूमशाही’च्या संकटाचे. चौथे रूप आहे, ‘देशाची बहुविध संस्कृती धोयात’ आणण्याचे. या सर्वांची कथानके आहेत. इंग्रजीत त्याला ‘नॅरेटिव्ह’ म्हणतात. ती चालविणार्या काही वृत्तवाहिन्या आहेत आणि असंख्य पत्रकार आहेत.
या असुरी शक्तींशी दैवीशक्तीला संघर्ष करायचा आहे. ‘हनुमान अंश’ चित्रपट हा अन्य चित्रपटांप्रमाणे केवळ एक चित्रपट नव्हे. नीम करोली बाबा या सत्पुरुषाची जीवनकहाणी, म्हणजे हा चित्रपट आहे. सत्पुरुषांच्या जीवनावर आतापर्यंत असंख्य चित्रपट झाले आहेत. त्यातील काही चालतात, काही अयशस्वी होतात. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित झाला आणि तीन-चार दिवसांतच तो चित्रपटगृहातून गायब झाला. ‘हनुमान अंश’ चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित झाला. पहिले काही दिवस प्रेषकांची या चित्रपटासाठीही फारशी गर्दी नव्हती आणि आता गर्दी कमी होण्याची चिन्हे नाहीत.
मग असे कोणते सामर्थ्य या चित्रपटात आहे? नीम करोली बाबा यांची भूमिका करणार्या कलावंताचे नाव आहे, शोभिनव सत्या. हा कलावंत संपूर्ण चित्रपटात आणि चित्रपट संपल्यानंतर लोकांच्या मनात नीम करोली बाबा म्हणूनच निवास करतो. सत्पुरुषाची भूमिका करणे वेगळी आणि सत्पुरुषाशी एकरूप होऊन ती भूमिका जगणे वेगळे! संत तुकारामांची भूमिका करणारे लोकांना कधी तुकाराम वाटले नाहीत. त्या नटाचे व्यक्तिमत्त्व लोक कधी विसरत नाहीत. त्याला अपवाद १९३६ साली प्रदर्शित झालेल्या ‘संत तुकाराम’ चित्रपटाचा आहे. विष्णुपंत पागनीस हे विष्णुपंत पागनीस कधी वाटलेच नाहीत. ते ‘संत तुकाराम’ झाले, असे या ‘हनुमान अंश’ चित्रपटाचे सामर्थ्य आहे.
नीम करोली बाबांचे सहज बोलणे, हास्यविनोद, मानेची आणि डोळ्यांची अत्यंत सूचक हलचाल करून संदेश देणे, जे काम आठ-दहा वायांत केले जाऊ शकते, ते काम या सुचकतेतून व्यक्त केले गेले आहे. भूमिका जगल्याशिवाय असला चमत्कार कोणाला करता येणार नाही. ‘हनुमान अंश’ हे चित्रपटाचे नाव खूप विचार करायला लावणारे आहे. नीम करोली बाबांचा विचार करता, त्यांना हनुमानाचे अंश, रूप मानण्यात आले. ते हनुमानभक्त होते. आपल्या हयातीत त्यांनी शंभरेक हनुमंताची मंदिरे बांधली.
परंतु, ‘हनुमान अंश’ याचा एवढाच अर्थ होत नाही. हनुमान ही प्रचंड शक्ती असलेली देवता आहे. तिची कथा आहे. जन्मतः पवनपुत्र हनुमानाला प्रचंड शक्ती प्राप्त झाली. या शक्तीचा अनेकांना उपद्रव होऊ लागला. ॠषींनी त्याला शाप दिला की, "तुझ्यात असलेल्या असामान्य शक्तीचे तुला विस्मरण होईल.” नंतर ॠषींची क्षमा-याचना केल्यानंतर "योग्य वेळी शक्तीचे स्मरण करून दिले असता, ती शक्ती जागृत होईल,” असा उश्शाप त्यांनी दिला. आपला समाज हा हनुमंतासारखा आहे. ज्याला आपल्या अफाट शक्तीचे विस्मरण झालेले आहे आणि तो गाढ झोपलेला आहे. आजूबाजूला वावरणारे मायावी राक्षस कोण आहेत, हे त्याला समजत नाहीत. अज्ञानाने तो त्यांच्या पाठीमागे धावतो. त्यांना बळ देतो. आपण आपलाच घात करून घेत आहोत, हे त्याच्या लक्षात येत नाही. मोहम्मद बिन कासीमच्या आक्रमणापासून ही परंपरा चालू आहे आणि आजही ती चालू आहे.
समाजाच्या अज्ञानी घोर निद्रेचे उग्र पार्वती तप या देशात अनेक वर्षे चालू आहे. त्याचा परिणाम म्हणून रामजन्मभूमी मुक्त झाली, तेथे भव्य मंदिर उभे राहिले. नऊ-दहा कोटींचा महाकुंभ झाला. सर्वसामान्य लोक आता आपली मूळं शोधायला लागली आहेत. आपण कोण आहोत, आपल्या परंपरा काय आहेत, आपली जीवनमूल्ये काय आहेत, आपल्या आस्था कोणत्या आहेत, याचा प्रत्येकजण आपआपल्या परीने शोध घेत आहेत.
या शोधयात्रेत ‘हनुमान अंश’ चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्यात आपला सनातन साधेपणा आहे. मूल्याधारित पारिवारिक जीवन आहे. भोंदूगिरी न करता लोककल्याणासाठी देह झिजविणारा तपस्वी आहे. दैवीशक्तीचे प्रचंड सामर्थ्य असतानाही त्या शक्तीचा वापर केवळ आणि केवळ लोककल्याणासाठी करण्याची बाबांची मनोवृत्ती आहे. हा चित्रपट रुढार्थाने विचार करता करमणूक करणारा चित्रपट नाही, तो जीवनमूल्ये देणारा चित्रपट आहे. अतिथी स्वागत कसे करायचे, पार्वतीबाईच्या प्रसंगातून आपल्याला दिसेल. देशभक्त क्रांतिकारकाच्या जीवनाचे रक्षण दैवीशक्तीच्या आधारे कसे करायचे, हे चित्रपटात बघायला मिळेल आणि पार्वतीच्या तपश्चर्येचे व्रत अवलंबविणार्या नीम करोली बाबांच्या पत्नीचे दर्शन आपल्याला होईल. चित्रपटातील प्रत्येक घटना आणि प्रसंग थेट हृदयाला जाऊन भिडणारे आहेत.
ते केवळ हृदयाला जाऊन भिडत नाहीत, तर आपल्या प्रत्येकात असलेली ‘हनुमान अंश’ शक्ती काही प्रमाणात जागृत करीत जातात. देशाचा विचार करता, समाजाने आपल्या शक्तीनिशी नित्य जागृत असणे अत्यंत आवश्यक आहे. जातवादी, तुष्टीकरणवादी आणि मायावी त्यांना मिळालेल्या घटनात्मक अधिकारांचा दुरुपयोग करून कसा नंगानाच करीत आहेत, हे आपण पाहतो. त्यांना सर्व सामर्थ्यानीशी रोखावे लागेल, पराभूत करावे लागेल, नेस्तनाबूत करावे लागेल.
हे केवळ इच्छा करून होणार नाही, भाषणे आणि लेखन करूनही होणार नाही, तर नीम करोली बाबांच्या शिकवणीचा विचार करता, ती आपल्याला जगावी लागेल. ते सांगून गेले, "प्रेम करा, सेवा करा आणि नामस्मरण करा.” सर्व भारतीय आपले बांधव आहेत, त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम अपेक्षित आहे. ज्याला ज्याची गरज आहे, ती भागविण्याची क्षमता समाजाने दाखविणे, ही गरज आहे आणि लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती रूपात ‘शस्यश्यामला भारतमाते’चे नामस्मरण नित्य करणे गरजेचे आहे.
दरवर्षी हजारो चित्रपट येतात आणि जातात. मी अन्य चित्रपटांची तुलना करीत बसत नाही, पण ‘हनुमान अंश’ चित्रपटाने सर्व व्यवसायिक चित्रपटांना मागे सारून एक शाश्वत संदेश दिला आहे. तो म्हणजे, आपल्या सनातन धर्माचे स्मरण करा, त्याचे पालन करा, आपली जीवनमूल्ये रोजच्या व्यवहारात जगा. हनुमानशक्ती जागरणाचा हा मार्ग या चित्रपटाने लोकांसमोर ठेवला आहे, असे मला वाटते.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१