सीजेपी विरोधात जेन नेक्स्टचा एल्गार! मुंबईत आंदोलनातून मांडली तरुणांची भूमिका

    03-Oct-2026   
Gen Next Mumbai Protest
 
मुंबई (Gen Next Mumbai Protest) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) केलेल्या आंदोलनाच्या विरोधात मुंबईतील जेन नेक्स्ट तरूणांनी आंदोलन केले. मंत्रालयाच्या शेजारील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.
 
या आंदोलनाच्या माध्यमातून युवकांची भूमिका आणि त्यांच्या भावना व्यक्त करत सीजेपीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सीजेपी ही देशविरोधी असून देशातील संविधानिक संस्थांवर त्यांचा विश्वास नसल्याची टीका या आंदोलनातून करण्यात आली. तसेच सीजेपी ही देशातील युवकांच्या जीवनाशी खेळ करत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला. (Gen Next Mumbai Protest)
 
दरम्यान, या आंदोलनात विविध घोषणांचे पोस्टर्स झळकवत तरूणांनी अभिजीत दीपके आणि सीजेपीच्या विरोधात घोषणाबाजी केली. जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या आंदोलनात जेन नेक्स्ट युवकांनी भारतीय तरूणांना भडकवले जात असल्याचा आरोप करत सीजेपीचा निषेध व्यक्त केला. तसेच सीजेपी राजकारण करत असून आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. मात्र, दिपके आणि त्यांची गँग संविधान मानत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या आंदोलनाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, असे जेन नेक्स्ट आंदोलकांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. या आंदोलकांनी आंदोलनस्थळी हनुमान चालीसा म्हणत सीजेपीच्या आंदोलनाचा निषेध व्यक्त केला.
 
केजरीवालांविरोधात घोषणाबाजी
 
शिवाय यावेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. अभिजीत दीपके हे अरविंद केजरीवाल यांचे प्यादे असल्याचा आरोप जेन नेक्स्ट आंदोलकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने मंत्रालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. (Gen Next Mumbai Protest)




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर