तेटोळके शाळेत गेले. मुख्याध्यापकांवर त्यांनी हल्ला चढवला. त्यांना उभे जाळले, अग्निशमन दलाची गाडी आली, तर गाडीतल्या कर्मचार्यांवर हल्ला केला आणि ती गाडी जाळून टाकली. हे का? तर, शाळेमध्ये वातानुकूलित यंत्र नाही, साधनसामग्री नाही, शैक्षणिक अनुदानात कपात केली. यामुळे फ्रान्स सरकारविरोधात आंदोलन छेडले. हे आंदोलन म्हणे विद्यार्थ्यांचे होते. पण, सत्य काय होते, तर फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्या सरकारचे म्हणणे आहे की, "देशातील ‘ला फ्रान्स इन्सुमीझ’ या कट्टर डाव्या राजकीय पक्षाने या आंदोलनाला फूस लावली. "जवळजवळ ३००च्या वर शाळांना या आंदोलकांनी उद्ध्वस्त केले. हे सगळे पाहून आठवते, ते आपल्याकडेही ‘झुरळं’ अशीच वळवळत आहेत आणि शाळेच्या नावावर समाजात अस्वस्थता पसरविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
तर, फ्रान्समध्ये आगामी वर्षात निवडणुका आहेत. सत्ता मिळवण्यासाठी जगभरातले डावे जे प्रयत्न करतात, तेच प्रयत्न फ्रान्समध्येही ते करणार, यात नवल काय? सत्ता ही हिंसेच्या आंदोलनाने आणि समाजाला चिथावूनच मिळवता येते, असा यांचा विकृत समज. त्यामुळे डाव्या विचारसरणीचे लोक जिथे असतील, तिथे सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही घटनेत हिंसा माजवण्याचा प्रयत्न करतात. असाच जगभराचा इतिहास दिसून येतो. बरं, राक्षस रावणाला जशी दहा तोंडे, तसे यांनाही मुखवटे आहेत. दिसताना तो राजकीय पक्ष एकदाच समोर येतो; मात्र देश आणि समाजात यांच्या अजेंड्यानुसार आंदोलन (बहुतेकदा हिंसकच) करण्यासाठी त्याच त्याच मूठभर संघटना लोकांना चिथावतात. कधी सरकारविरोधात, कधी प्रशासनाविरोधात कधी बहुसंख्याकांविरोधात, कधी व्यवस्थेविरोधात. हिंसक विरोध हा त्यांच्या कार्यशैलीचा स्थायीभाव. त्यामुळेच फ्रान्सचा डाव्या कट्टरतावादी पक्ष ‘ला फ्रान्स इन्सुमीझ’ या सगळ्याला अपवाद कसा असेल? आपल्याकडेही आपण पाहतो की, शेतकरी आंदोलन असू दे, की ‘सीएए’ असू दे, यांविरोधात डावे पक्ष, त्यांच्या संघटनांनी आंदोलनाच्या नावावार लोकांना वेठीस धरलं होतं. नवी दिल्ली ‘जंतरमंतर’वर पेपरफुटीवरून झालेले झुरळांचे आंदोलन आणि त्यामध्ये झुरळांचे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेले तेचतेच ते डाव्या विचारसरणीचे नेते हे सगळ्या भारताने पाहिले होते. त्यामुळे फ्रान्समध्ये चाललेल्या या हिंसक आंदोलनांची आणि त्यामध्ये डाव्या संघटनांनी दिलेल्या चिथावणीची तीव्रता भारतीय चांगलेच समजू शकतात.
असो. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारने असेही आरोप केले आहेत की, डाव्या विचारांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या संघटनांनी हिंसा व्हावी, यासाठीची चिथावणीखोर भाषणे केली. ही भडकावू भाषणे ऐकून तिथे जमलेल्या लोकांना चेव आला. या गर्दीचा फायदा घेऊनच समाजकंटकांनी शाळांना आगी लावल्या. शाळेतल्या कर्मचार्यांवर हल्ला केला. फ्रान्स सरकारने १ हजार ९०० आंदोलकांना ताब्यात घेतले. पण, अर्थातच, ते काही सगळे विद्यार्थी नाहीत, तर त्यामध्ये डाव्या विचारांचे कार्यकर्ते, तसेच फ्रान्सने कधीकाळी आसरा दिलेले निर्वासित लोक आहेत. आसरा घेण्यासाठी फ्रान्समध्ये आलेले हे निर्वासित! या सगळ्यामुळेच की काय, युरोपियन युनियनच्या २७ सदस्य देशांनी नुकतेच ‘रिटर्न हब्स’ नावाच्या योजनेला मंजुरी दिली. त्यानुसार दुसर्या देशातील लोक बेकायदेशीररीत्या युरोपमध्ये आश्रय घेत असतील, तर त्यांच्यावर कडक कारवाई करत, त्यांना देशाबाहेर हाकलवले जाईल, तर या घटनेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यार्थीही आहेत. चिथावणी दिल्यामुळे त्यांचे पाऊल हिंसेकडे वळले. त्यामुळे त्यांना अटक झाली. त्यांच्यावर फ्रान्स सरकार कारवाईही करेल. यावर डाव्या विचारांच्या राजकीय पक्षांनी पुन्हा दि. ६ ऑक्टोबर रोजी फ्रान्समध्ये आंदोलनाची हाक दिली. सरकारने विद्यार्थ्यांवर कारवाई केली, असा त्यांनी कांगावा केला. मूळ मुद्दा असा आहे की, हिंसा करणारे सगळेच विद्यार्थी नव्हते. पण, जे विद्यार्थी हिंसेत सामील होते, त्यांना काय विद्यार्थी आहेत म्हणून हिंसा करण्याचा आणि शिक्षकांना जिवंत जाळण्याचा परवाना मिळाला होता? पण, विद्यार्थी म्हटले की त्यांचे पालक आले आणि त्यांचा समाजही आला. त्यामुळे सत्ता गेलेले जगभरातले सैरभैर झालेले लोक विद्यार्थ्यांच्या नावावर त्यांचे त्यांचे हिंसात्मक अजेंडे चालवताना दिसतात. भारत असो की फ्रान्स, हेच सुरू आहे. मात्र, भारतीय अशा झुरळांना व्यवस्थित चिरडतात, फ्रान्स काय करेल, हे कळेलच!
९५९४९६९६३८