मुंबई (Dnyaneshwari Mobile App) : "ज्ञानाच्या परंपरेचा सारांश भगवद्गीता असल्याने, तिच्यातील ज्ञान शाश्वत आहे. शाश्वत गोष्टी बदलत नाहीत. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हेच शाश्वत ज्ञानाचे भांडार आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत आणि मेराक इव्हेंट्स’ आयोजित ‘ज्ञानरंग : माऊलींच्या ओव्यांचा उत्सव’ हा विशेष सोहळा शुक्रवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात संपत्र झाला. या सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांच्या शुभहस्ते ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ या मोबाईल अॅपचे लोकार्पण करण्यात आले. अमेय हेटे यांनी यावेळी मोबाईल अॅपबाबत प्रास्ताविक केले, तर ‘मेराक इव्हेंट्स’च्या रेणुका देशकर यांनी युट्यूब चॅनलबाबत प्रस्ताविक केले. (Dnyaneshwari Mobile App)
"जगाचे स्वरूप आणि माणसाची प्रकृती ही शाश्वत आहे. त्यामुळे माणसाने कसे जगावे, जगाला कसे ओळखावे आणि त्याच्या जीवनाचा आधार असलेले सत्य कोणते आहे, हे सांगणारे ज्ञानही शाश्वत असते. ज्याला आपण तत्त्वज्ञान म्हणतो, त्या तत्त्वज्ञानाचा जगातील आदिम परंपरांपासून आधुनिक परंपरांपर्यंतचा निष्कर्ष मूलतः एकच आहे,” असे सरसंघचालकांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
वेद मांडणारे खरे की बुद्धांना मानणारे खरे, यावर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले, "काळाचा संदर्भ बदलतो, परिस्थिती बदलते आणि त्यामुळे अभिव्यक्तीही बदलते. केवळ अभिव्यक्तीकडे पाहिले, तर गोंधळ निर्माण होतो. वेद मांडणारे खरे की बुद्धांना मानणारे खरे, असा प्रश्न निर्माण होतो. परंतु दोघांनी सांगितलेले मूलभूत तत्त्व एकच आहे. शब्द वेगवेगळे असणारच; कारण काळ आणि परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे आपण शब्दांपेक्षा त्या परिस्थितीतून सुचवलेली आचरणाची दिशा कोणती आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. असे केले, तर संपूर्ण जगाचे हित साधण्याचा मार्ग आपल्याला सापडू शकतो. (Dnyaneshwari Mobile App)
‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ अॅपचे त्यांनी यावेळी कौतुक केले. हे अॅप अतिशय चांगले माध्यम ठरू शकते. त्याचा योग्य आणि अर्थपूर्ण उपयोग करता येतो. घरातील वातावरणही त्यामुळे सकारात्मक आणि प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते. रोजची एक ओवी ऐकावी, वाचावी, तिचा अर्थ समजून घ्यावा, तो अनुभवावा आणि त्या अनुभवातून ती आपल्या जीवनात जगावी, यासाठीच हा सगळा अट्टाहास आहे. ही केवळ ‘फॅशन’ म्हणून करण्याची गोष्ट नाही; तर आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.”
अॅपच्या लोकार्पणापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनांवर आधारित विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि केतकी चैतन्य यांनी गायन सादर केले, तर डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. (Dnyaneshwari Mobile App)
‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ विशेष उपक्रम युट्यूबवर प्रसारित
याच सोहळ्यात सरसंघचालकांच्या शुभहस्ते ’संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ हा विशेष उपक्रमही युट्यूबवर प्रसारित करण्यात आला. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरी ऐकण्याच्या माध्यमातून तिचा आशय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम साकारण्यात आला आहे. या उपक्रमाची संकल्पना आणि ज्ञानेश्वरी वाचन रेणुका देशकर यांचे असून, श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन श्रीनिवास वर्णेकर यांनी केले आहे. ध्वनिमुद्रण आणि संगीताची जबाबदारी शैलेश दाणी यांनी सांभाळली आहे. (Dnyaneshwari Mobile App)
योग्य उच्चार शिकू इच्छिणार्यांसाठीही उपयुक्त अॅप
प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी आहे, पण वाचताना भाषा थोडी अवघड वाटत असल्यामुळे तिचे नियमित वाचन होत नाही. यासाठीच हे अॅप एक सुंदर सुरुवात आहे. अॅपमध्ये ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि गीतेचे श्लोक ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे. योग्य उच्चार शिकू इच्छिणार्यांसाठीही हे अॅप उपयुक्त ठरेल. त्यासोबतच अॅप परस्परसंवादी असल्यामुळे शिकणे आणि समजून घेणे अधिक सोपे व आनंददायी होईल. ही तर फक्त सुरुवात आहे. लवकरच अॅपमध्ये इंग्रजी भाषांतर, तसेच अॅनिमेशनच्या माध्यमातून सांगितलेल्या कथादेखील उपलब्ध करून दिल्या जातील. आजच अॅप डाऊनलोड करा आणि माऊलींना आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनवा.- अमेय हेटे, व्यवस्थापकीय संचालक, व्हॅल्युएबल ग्रुप (Dnyaneshwari Mobile App)
उपक्रमाचा उद्देश काय?
‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ अॅप दि. २ ऑक्टोबर रोजीनंतर ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि ‘अॅपल अॅप स्टोअर’वर विनामूल्य उपलब्ध होणार आहे. ज्ञानेश्वरीचा आध्यात्मिक आणि तात्त्विक आशय आजच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेषतः नव्या पिढीपर्यंत, तसेच जगभरातील मराठी आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. (Dnyaneshwari Mobile App)
अॅपचे वैशिष्ट्य काय?
‘ज्ञानाचा अमृतसागर’ हे ब्रीद घेऊन साकारण्यात आलेल्या या अॅपच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील ओव्या आधुनिक डिजिटल माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओवी ऐकणे, ऐकताना शब्दागणिक वाचन करता येण्यासाठी शब्दानुसरण, ओवींचा मराठीतील सुलभार्थ, तसेच माऊलींच्या जीवनाशी आणि विचारांशी संबंधित प्रेरणादायी कथा, अशी विविध वैशिष्ट्ये या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. भगवद्गीतेतील श्लोकांसोबत अर्जुन, श्रीकृष्ण, संजय आणि धृतराष्ट्र या पात्रांचे अॅनिमेटेड चित्रणही अॅपमध्ये पाहता येणार आहे. (Dnyaneshwari Mobile App)
जग अध्यात्माच्या दिशेने पाहत आहे!
"भौतिक ज्ञानाचा मोठा आढावा घेतल्यानंतर आज जग अध्यात्माच्या दिशेनेही पाहू लागले आहे. विज्ञान आता ‘कॉन्शसनेस’ अर्थात ‘चेतना’ या विषयाचा अभ्यास करत आहे. जगात एकच चेतना आहे आणि सर्व गोष्टींच्या मुळाशी तीच चेतना आहे, या विचाराच्या दिशेनेही वैज्ञानिक अभ्यास सुरू झाला आहे,” असे सरसंघचालकांनी सांगितले.
कुराण हा आदेश, तर हदीस पैगंबरांचा जीवनमार्ग
"इस्लाममध्ये ‘कुराण’ आणि ‘हदीस’ असे दोन प्रकार आहेत. ‘कुराण’ हा आदेश आहे; त्या आदेशाचा कसा अर्थ लावायचा आणि त्याचा आचरणात कसा उपयोग करायचा, याचे वर्णन ‘हदीस’मध्ये आढळते. पैगंबरांनी आपल्या काळातील परिस्थितीत तो संदेश स्वतः जगून दाखवला,” असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी यावेळी सांगितले. (Dnyaneshwari Mobile App)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक