दिल्ली म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यांचे हक्काचे स्थान! देशभरातून विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येतात. या स्पर्धा परीक्षांच्या नावे दिल्लीत विद्यार्थी उपयोगी व्यवसायांची परिसंस्थाच आहे. यात अनेक बेकायदेशीरही असून, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्याचीच परिणीती म्हणजे नुकतीच घडलेली दिल्लीची ‘सत्य निकेतन’ची दुर्घटना! या दुर्घटनेचा आणि परिस्थितीचा मागोवा घेणारा हा लेख...
दक्षिण दिल्लीतील ‘सत्य निकेतन’ या अनधिकृत व जीर्ण इमारतीच्या दुर्घटनेमध्ये विद्यार्थ्यांचा बळी जाणे, ही घटना मन विदीर्ण करणारी आहे. तरुण विद्यार्थी आयुष्यात काही विशेष करण्याच्या उद्देशाने व जिद्दीने, विविध स्पर्धा-परीक्षा प्रवेश पात्रता परीक्षेसाठी दरवर्षी राजधानी दिल्लीत मोठ्या संख्येने दाखल होतात. यासाठी त्यांच्या पालकांची हरसंभव मदतही मिळते. हे विद्यार्थी त्यासाठी आपले शहर-घर सोडून, पात्रता परीक्षांच्या तयारीसाठी दिल्ली गाठतात. मार्गदर्शन लासपासून प्रवास-निवासापर्यंत, त्यांना मोठा खर्चही करावा लागतो. हे सारेच या विद्यार्थ्यांच्या पालकांना परवडतेच, असे नाही. त्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांना, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणासाठी होणार्या खर्चावर तडजोड करावी लागते. याच तडजोडीचा दुर्दैवी परिणाम ‘सत्य निकेतन’ दुर्घटनेमुळे उघडकीस आला.
‘सत्य निकेतन’ ही इमारत दक्षिण दिल्लीच्या प्रगत वा उच्चभ्रू नागरी परिसरातील, दाटीवाटीच्या घरांसह असणारी एक बहुमजली इमारत. त्या परिसरातील या आणि अशा इमारतींमध्ये, दिल्लीबाहेरून येणार्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय वर्षानुवर्षे करण्यात आलेली. त्यासाठी या विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कमही घेण्यात येत असे. हे विद्यार्थीही मुख्यतः राजधानीत येत, ते विविध प्रवेश पात्रता वा स्पर्धा-परीक्षांच्या पूर्वतयारीसाठीच. यासाठीच्या सोयी आजही अधिकांश ठिकाणी उपलब्ध नसल्याने, दिल्लीत येणार्या या विद्यार्थ्यांना अशा निवासाचाच काय तो आसरा असे. दरवर्षी दिल्लीत येणार्या विद्यार्थ्यांची मोठी व वाढती संख्या, विद्यार्थ्यांच्या निवासाची मर्यादित उपलब्धता व त्यामुळे निर्माण सततच्या कमतरतेमुळे विद्यार्थी, म्हणजेच त्यांचे पालक प्रसंगी अधिकाधिक पैसे मोजून, या विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यास प्राधान्य देत. यातूनच काही निवासी क्षेत्रात, घरमालकांनी अवाजवी व अधिकाधिक पैसे गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वसूल करण्याचा धंदाच मोठ्या प्रमाणावर सुरू केला. त्यासाठी अवैध बांधकामाचा सर्रास वापर करून, अनधिकृत बांधकामाच्या मार्गाचाही अवलंब केला; अरुंद निवासी क्षेत्रात बहुमजली इमारतींवर अनधिकृत मजले चढविले गेले. त्यासाठी निवासी इमारतींसाठी न्यूनतमदृष्ट्या आवश्यक असलेल्या हवा, पाणी, स्वच्छता, सुलभ रस्ते, वीजपुरवठा यांसारख्या सोयींकडे दुर्लक्ष केले. मुख्य म्हणजे नागरी सुरक्षेसह, विद्यार्थ्यांची जीवित-सुरक्षेलाही या अनधिकृत बांधकामाच्या पायदळी सर्रासपणे दिले गेले.
विविध परीक्षांच्या तयारीतून आपल्या करिअरसाठी राजधानीत येणार्या या विद्यार्थ्यांच्या निवासाव्यतिरिक्त, अन्य मूलभूत व दैनंदिन गरजांची पूर्तता करण्याचा व्यवसायही कालौघात वाढत गेला. पुढे त्यालाही साथ मिळत गेली ती, अनधिकृत छोट्या-मोठ्या व्यवसायांची. या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अशा भोजनव्यवस्था वा खानावळी, उपहार केंद्र, चहा-कॉफी, धोबी व्यवसाय, झेरॉक्स इ. आवश्यक गरजा लक्षात घेऊनच, व्यावसायिकांचे लक्ष त्याकडे स्वाभाविकपणे गेले. विद्यार्थ्यांची संख्या वाढली, तशी या हमखास फायदेशीर ठरणार्या नित्योपयोगी व्यवसायकेंद्रांची संख्याही वाढत गेली. त्यामुळे या व्यावसायिकांनीपण आपला व्यवसाय आणि व्याप वाढविण्यासाठी, अनधिकृत बांधकामांसह प्रसंगी अतिक्रमणाचाही लाभ घेण्यास सुरुवात केली.
दरवर्षी विविध परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या, त्यांना आवश्यक असणारी वाढती निवासी व्यवस्था व त्यातून मिळणारा वाढता पैसा यासाठीची कायदे-नियम पायदळी तुडविण्याची प्रवृत्तीही, तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याची सुरुवात झाली, ती मर्यादित जागेतील बेकायदेशीर बांधकामाने. त्याला पुढे जोड लाभली, ती बेकायदेशीर वीज व पाणीपुरवठ्याची! परिणामी, देशाच्या सर्वच राज्यांतून स्पर्धा-परीक्षा प्रवेश पात्रता परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी येणारे विद्यार्थी, या निवासी इमारतींमध्ये दाटावाटीने राहू लागले.
विद्यार्थ्यांचा मुक्काम अशा निवासी इमारतींमध्ये सरासरी दोन वर्षे कालावधीसाठी असतो. याच काळात ते प्रामुख्याने अधिकाधिक काळ मार्गदर्शन केंद्रांमध्येच, अभ्यास-सराव यांवरच लक्ष्य केंद्रित करतात. अपुर्या व अरुंद इमारतींमधील निवासी जागेतच त्यांना राहावे लागते. या सार्यासाठी त्यांचे पालक मोठी रक्कम मोजतात, त्याहून मोठी रक्कम तिथे राहणारे विद्यार्थीही मोजत असतात. या सार्यांची धडपड सुरू असते, ती त्यांच्या मनाजोगत्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी.
या सार्याचा सामूहिक व सहजगत्या होणारा परिणाम म्हणजे, अशा वातावरणात मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या नशिबी, ‘सत्य निकेतन’सारख्या जीवघेण्या दुर्घटनेला सामोरे जाणे अपरिहार्य ठरते. या सार्या परिस्थितीत पालकांपासून दूर राहणार्या विद्यार्थ्यांना ज्या दडपणाला सामोरे जावे लागते, त्यात असुरक्षिततेच्या भावनेचीही नव्याने भर पडली आहे.
उच्च शिक्षण प्रवेश पात्रता प्रवेश परीक्षेसाठी तयारी करणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना, आर्थिक-मानसिक व भावनिक तणावासह सुरक्षेची काळजी करावी लागत आहे. ‘सत्य निकेतन’ ही दुर्घटना जरी हिमनगासारखी म्हटली, तरी विषय आणि समस्येचे गांभीर्य अनेकपटींनी वाढतेच.
‘सत्य निकेतन’ म्हणजे सत्याचा निवास असणारी वास्तू! मात्र, दिल्लीतील ‘सत्य निकेतन’ दुर्घटनेमुळे स्पर्धा-परीक्षा तयारी, या आज तद्दन व्यावसायिक झालेल्या क्षेत्राचे वास्तव सर्वांपुढे आले. या जीवघेण्या अनधिकृत प्रकरणी कारवाई सुरू झाली असली तरी याचे मूळ म्हणजे, बांधकामापासून व्यवसायापर्यंत सर्वच बाबी बेकायदेशीर होत्या.
यानिमित्ताने स्पष्ट झालेली बाब म्हणजे, दिल्ली असो की कोटा, या ठिकाणी विविध परीक्षेच्या तयारीसाठी, विद्यार्थी मर्यादित कालावधीसाठी येतात व जातात. मात्र, त्यांच्या नावे वर्षानुवर्षे सुरु असलेले विविध बेकायदेशीर व्यवसाय मात्र सुरूच आहेत. ‘सत्य निकेतन’ प्रकरणी हेच व्यावसायिक वास्तव दडले आहे.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६