मुंबई (CJP Shivaji Park Protest) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात आंदोलन करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या कामकाजातील कथित अनियमितता आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर करण्यात आलेल्या राजकीय टीकेमुळे आंदोलनाच्या मूळ उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन आयोजित करण्यात आले. यापूर्वीच स्थानिक नागरिकांनीही आंदोलनामुळे होणाऱ्या संभाव्य गैरसोयींबाबत आक्षेप नोंदवले होते. अशा परिस्थितीत आंदोलनाच्या ठिकाणापासून ते आंदोलनातील भाषणांपर्यंत अनेक मुद्द्यांवर वाद निर्माण झाले. (CJP Shivaji Park Protest)
वैयक्तिक टीका कशासाठी?
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी ही आंदोलनाची प्रमुख भूमिका असताना, अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा एक पाय फेव्हिकॉलचा, तर दुसरा फेव्हिस्टिकने चिकटवलेला असल्याचे वक्तव्य करत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. या वक्तव्यांमुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयीच्या प्रश्नांपेक्षा राजकीय संघर्षालाच अधिक महत्त्व मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. (CJP Shivaji Park Protest)
लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित करणे आणि त्यासाठी आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र, अशा आंदोलनांमध्ये उपस्थित केलेले मुद्दे, त्यामागील पुरावे आणि अपेक्षित कार्यवाही यांवर चर्चा होणेही तितकेच महत्त्वाचे असते. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करताना राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर वैयक्तिक स्वरूपाची टीका करण्यापेक्षा निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटी आणि त्यावरील उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते.
आंदोलनाचा मूळ हेतू भरकटला?
निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे हा आंदोलनाचा मूळ हेतू असला, तरी त्यामध्ये इतर राजकीय नेत्यांवरील टीकेचा समावेश झाल्याने आंदोलनाचा केंद्रबिंदू व्यापक राजकीय विरोधाकडे सरकल्याची चर्चा सुरू झाली. निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आणि सत्ताधाऱ्यांवरील राजकीय टीका या दोन स्वतंत्र बाबी आहेत. त्यामुळे आंदोलनाची विश्वासार्हता आणि त्याचा मूळ हेतू स्पष्ट ठेवणे गरजेचे होते. मात्र, तसे काहीही दिसले नाही. (CJP Shivaji Park Protest)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....