मुंबई (Yeshaya Rosenman on RSS) : जेरुसलेम येथे कार्यरत असलेले इस्रायली संशोधक येशाया रोझेनमन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आलेल्या संपर्कामुळे भारतीय समाजाची ओळख झाल्याचे म्हटले आहे. संघाच्या कार्यकर्त्यांमधील मेहनत, समर्पण आणि गुणवत्तेच्या आधारावर प्रगती करण्याच्या वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देताना त्यांनी कष्ट आणि कर्तृत्वाच्या बळावर प्रगती कशी साधता येते, हे अधोरेखित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित झालेल्या ‘हंड्रेड इयर्स यंग : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकासाठी रोझेनमन यांनी लेखन केले आहे. या लेखात त्यांनी भारतीय आणि इस्रायली समाजजीवन व संस्कृती यांची तुलना केली असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, इस्रायल आणि व्यापक ज्यू समुदाय यांच्यात अधिक संवाद व परस्पर सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला परिचय कसा झाला, हे स्पष्ट करताना रोझेनमन यांनी सांगितले की, भारतात इस्रायली राजनैतिक पथकाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांची काही मित्रांशी ओळख झाली. या मित्रांनी त्यांची संघाच्या अन्य सदस्यांशी भेट घडवून आणली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर वैचारिक पातळीवर अनेक समान मुद्दे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीही त्यांचे काही विचार समान होते.(Yeshaya Rosenman on RSS)
दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली. अमेरिकेतील आणि पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांमधून संघाची जी प्रतिमा त्यांच्या मनात निर्माण झाली होती, त्यापेक्षा हा अनुभव पूर्णपणे वेगळा होता, असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमांमध्ये आपल्याला धोकादायक असे काहीही आढळले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “हे लोक प्रामाणिक आहेत. त्यांच्या मनात कार्याविषयी निष्ठा आहे. ते भौतिक लाभासाठी किंवा कोणत्याही छुप्या हेतूने काम करत नाहीत. ते आपल्या ध्येयाप्रती समर्पित आहेत आणि त्या ध्येयांपैकी अनेकांवर माझाही व्यापक अर्थाने विश्वास आहे.” पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चित्रण अनेकदा धोकादायक किंवा निमलष्करी स्वरूपाची संघटना असे केले जाते. मात्र, प्रत्यक्ष संपर्कातून आलेला आपला अनुभव या प्रतिमेपेक्षा वेगळा असल्याचे रोझेनमन यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आलेला संपर्क सकारात्मक असल्याचे सांगत रोझेनमन यांनी संघाच्या उद्दिष्टांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या समर्पणाचे कौतुक केले. संघाच्या सदस्यांनी आपले स्वागतशील व मैत्रीपूर्ण वर्तन दाखवले. त्यांपैकी काही जणांशी आजही आपली मैत्री कायम असल्याचे त्यांनी सांगितले. संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला सर्वाधिक भावलेली बाब म्हणजे त्यांची ध्येयनिष्ठा आणि वैयक्तिक लाभापेक्षा संघाच्या उद्दिष्टांसाठी काम करण्याची तयारी, असे रोझेनमन यांनी नमूद केले.(Yeshaya Rosenman on RSS)
गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाच्या आधारावर प्रगती करण्याच्या व्यवस्थेचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. एखाद्या व्यक्तीची प्रगती तिची मेहनत आणि कर्तृत्व यांवर अवलंबून असावी; तिची कौटुंबिक पार्श्वभूमी, जात किंवा आर्थिक परिस्थिती यांवर नव्हे, असे त्यांचे मत आहे. रोझेनमन म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गुणवत्तेला महत्त्व दिले जाते. तुम्ही एखाद्या विशिष्ट जातीचे आहात किंवा श्रीमंत आहात म्हणून पुढे जात नाही; तर मेहनतीच्या बळावर पुढे जाता.”
मोदींच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेमुळे विश्वस्तरावर भारताची ओळख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक लोकप्रियतेविषयी बोलताना रोझेनमन यांनी पाश्चात्त्य देशांमध्ये भारताविषयीची सर्वसामान्यांची माहिती मर्यादित असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यांच्या मते, ताजमहाल, महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी ही भारताशी संबंधित अशी काही मोजकी नावे व प्रतीके आहेत, जी पाश्चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर ओळखली जातात. मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेमुळे भारताची जागतिक स्तरावरील ओळख आणि प्रतिष्ठा वाढण्यास मदत झाली आहे, असे रोझेनमन यांनी म्हटले. मोदी यांना देशांतर्गत मिळणारा पाठिंबा समजून घेण्यासाठी केवळ वैचारिक भूमिकेचा विचार करून चालणार नाही, तर विकास आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातूनही त्यांचे मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.(Yeshaya Rosenman on RSS)
संघ, इस्रायल आणि ज्यू समुदायामध्ये अधिक संवादाची अपेक्षा
‘हंड्रेड इयर्स यंग : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकातील आपल्या लेखाविषयी बोलताना रोझेनमन म्हणाले की, या पुस्तकामुळे संघाविषयीच्या चर्चेत आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडण्याची संधी मिळाली. आपल्या राष्ट्रीय सीमा ओलांडून विविध देशांतील व्यक्ती आणि संस्थांशी विधायक संवाद साधण्याची क्षमता प्रत्येक संघटनेने विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “माझा लेख भारत आणि इस्रायलमधील समाजजीवन व संस्कृती यांची तुलना करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इस्रायल आणि ज्यू समुदायाशी अधिक जवळीक साधावी, यासाठी पुढे केलेला मैत्रीचा हात म्हणून माझ्या लेखाकडे पाहिले जावे, अशी माझी आशा आहे.” भारतीय आणि इस्रायली समाजांमधील समान धागे शोधणे, सांस्कृतिक समज वाढवणे आणि परस्पर संवादाला प्रोत्साहन देणे, हा रोझेनमन यांच्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.(Yeshaya Rosenman on RSS)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक