मुंबई, : (Tamil Nadu Shipbuilding Project)भारताला जागतिक जहाजबांधणी क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने तामिळनाडूतील थुथुकुडी येथे प्रस्तावित महाकाय जहाजबांधणी प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दक्षिण कोरियातील सोल येथे एचडी ह्युंदाईचे अध्यक्ष चुंग की-सुन यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर चर्चा केली. या प्रकल्पासाठी सुमारे चार अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे ३६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) पुढील सहा महिन्यांत अंतिम करण्याचे उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पात एचडी ह्युंदाईची जहाजबांधणी क्षेत्रातील उपकंपनी एचडी कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग प्रमुख धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून सहभागी होण्यास इच्छुक आहे. केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारच्या समन्वयातून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन केला जाणार आहे. तसेच संयुक्त भागीदारी कंपनीची रचना, गुंतवणुकीतील हिस्सेदारी आणि अंमलबजावणीची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे.(Tamil Nadu Shipbuilding Project)
थुथुकुडी येथे प्रस्तावित हरितक्षेत्र जहाजबांधणी केंद्राची वार्षिक क्षमता सुमारे २५ लाख ग्रॉस टन (जीटी) ठेवण्याचे नियोजन आहे. अंतिम क्षमता सविस्तर प्रकल्प अहवालातून निश्चित होईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक जहाजबांधणी केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे देशांतर्गत जहाजबांधणी क्षमतेत वाढ होण्याबरोबरच जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योगांची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होऊ शकते.
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील वाढत्या बाजारपेठेचा उल्लेख करताना, धोरणात्मक भागीदारी, तंत्रज्ञान सहकार्य आणि स्थानिक उत्पादनाच्या माध्यमातून एचडी केएसओईने भारतातील आपला सहभाग अधिक व्यापक करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.(Tamil Nadu Shipbuilding Project)
तामिळनाडूतील नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क (एनएसएचआयपी-टीएन) प्रकल्पासाठी आवश्यक सागरी किनाऱ्यालगतची जमीन, पायाभूत सुविधा, वीज-पाणी यांसारख्या सुविधा आणि शासकीय मंजुरींसाठी समन्वय साधणार आहे. जागेचे सर्वेक्षण, पायाभूत सुविधांचे नियोजन तसेच समुद्रतळातील गाळ काढणे आणि आवश्यकतेनुसार जमीन पुनर्भरण यासंबंधी प्राथमिक अभ्यासही पुढे नेला जाणार आहे. दि. २० एप्रिल २०२६ रोजी एचडी केएसओई आणि एनएसएचआयपी-टीएन यांच्यात या प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार झाला होता. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात जहाजबांधणी, जहाजवाहतूक आणि सागरी रसद क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याच्या व्यापक चौकटीचाही हा भाग आहे.(Tamil Nadu Shipbuilding Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.