मुंबई, : (INS Gulabdar Project)सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ या प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड-गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे.
भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ, पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभिनंदन केले.
'द वीक मॅगेझीन' तर्फे ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड-गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम प्रधानमंत्री संग्रहालय व ग्रंथालय नवी दिल्ली येथे मंगळवार, दि.२७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभात केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.(INS Gulabdar Project)
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने, अधिक्षक अभियंता संजय पाटील, ॲक्वाटिक टूरझिमच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात ‘एक्स-आयएनएस गुलदार’ या निवृत्त युद्धनौकेवर पाणबुडी पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ₹४६.९१ कोटी, तर महाराष्ट्र शासनाने ₹११२.४६ कोटींची तरतूद केली आहे.
भारतीय नौदलात ३९ वर्षे सेवा बजावलेली ही युद्धनौका १९ मे २०२६ रोजी समुद्रात सुमारे २२ मीटर खोलीवर ठेवण्यात आली. या नौकेचे रूपांतर कृत्रिम प्रवाळभित्तीत होणार असून, त्यामुळे सागरी जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलनाला चालना मिळणार आहे.(INS Gulabdar Project)
पर्यटकांना पाणबुडी व स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्राखालील जहाज, प्रवाळ आणि मत्स्यजीवनाचा अनुभव घेता येणार आहे. याशिवाय प्रमाणित डायव्हिंग मोहिमा, पाण्याखालील छायाचित्रण तसेच सागरी शिक्षण व संशोधनाच्या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. जागतिक दर्जाच्या ‘रेक डायव्हिंग’ स्थळांच्या धर्तीवर विकसित होणारा हा प्रकल्प भारतातील पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटनासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड’ अंतर्गत मिळालेला ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ हा सन्मान महाराष्ट्राच्या पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीयस्तरावर गौरव मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.
- शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री