छत्तीसगढ आणि बस्तरपुरताच विचार केला, तर आपल्याला संपूर्ण चित्र वेगळेच दिसते. सरकारने निर्धारित केलेल्या मुदतीनुसार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी छत्तीसगढसह संपूर्ण देशाला सशस्त्र माओवादी दहशतवादातून मुक्त केले. बस्तरमध्ये पंतप्रधानांपासून केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत आणि आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत देशातील सर्वोच्च नेतृत्वाने दिलेली भेट ही काही सामान्य बाब नाही. हा इतिहासातील असा महत्त्वाचा टप्पा आहे, जो देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी दिलेल्या संघर्षमय वचनबद्धतेची कहाणी सांगतो.
२०२४ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जेव्हा माओवादी दहशतवाद संपविण्याची घोषणा केली होती, तेव्हा अनेकांना त्यावर विश्वास बसत नव्हता. ‘विरोधासाठी विरोध करणारा’ वर्ग या घोषणेची खिल्ली उडवत होता. मात्र, निर्धारित मुदतीत देशातून माओवादी दहशतवादाचा अंत झाल्यानंतर विरोध करणार्यांनाच उपहासाचे धनी व्हावे लागले. अर्थात, ‘अर्बन नक्षलवादी’ आणि त्यांच्याच विचारांचे ‘बौद्धिक नक्षलवादी’ आजही बस्तरवर नजर ठेवून आहेत. मात्र, समाजही आता अधिक सजग होत असल्याने त्यांना यापुढे यश मिळणे शय होणार नाही.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रपतींनी बस्तरला भेट दिली. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ‘मुरिया दरबार’शी आणि तेथील विविध परंपरांशी राष्ट्रपतींचा परिचय झाला. ही बाब आपल्या सांस्कृतिक अंतःचेतनेचे प्रतिबिंब आहे. ही काही सामान्य घटना नाही. बस्तरच्या समृद्धीसाठी घेतलेल्या संकल्पाच्या पूर्ततेच्या दिशेने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे.
बस्तरमध्ये लोकशाहीचा खर्या अर्थाने उदय होत आहे. आता तेथील नागरिक निर्भयपणे जीवन जगत आहेत आणि देशाचे सर्वोच्च नेतृत्व त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. यापूर्वी, ‘अर्बन नक्षलवाद्यां’च्या आदेशानुसार कार्यरत असलेले सशस्त्र माओवादी तेथे हिंसाचाराचे आणि रक्तपाताचे भीषण थैमान घालत होते. ‘जनताना सरकार’च्या नावाखाली ते भारताच्या लोकशाहीला आणि संविधानाला आव्हान देत होते. त्यांना कोणत्या विचारसरणीचा आणि पूर्वीच्या कोणत्या सरकारचा उघड अथवा छुपा पाठिंबा मिळत होता, हे कोणापासून लपून राहिले आहे? मात्र, आता नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे. माओवादी दहशतवाद संपविण्यासाठी सरकारने केलेले हे धाडसी कार्य ‘न भूतो न भविष्यति’ असेच म्हणावे लागेल.
आता बस्तरमध्ये ‘बस्तर पंडुम’सारखे सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जात आहेत, ‘बस्तर ऑलिम्पिक’ होत आहे आणि पर्यटनाचा विस्तार होत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि रस्ते यांचे नवे जाळे उभारले जात आहे. भारताच्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे बस्तरमध्ये आगमन हीदेखील सामान्य बाब नाही. त्यांचे राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचणे, हीसुद्धा साधीसुधी घटना नव्हती. आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू या कन्येने देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत मजल मारली आहे, ही बाबही लक्षात घेतली पाहिजे.
अधूनमधून काही लोक भारतीय लोकशाहीला उपदेशाचे डोस पाजत असतात. वसाहतवादी मानसिकतेच्या गुलामगिरीत अडकलेले काही लोक आजही असे म्हणतात की, ‘दि. १५ ऑगस्ट १९४७ नंतरच भारतात लोकशाही आली.’ अशा लोकांनी बस्तरमधील ‘मुरिया दरबार’ची परंपरा समजून घेतली पाहिजे. शेकडो वर्षांपासून येथे लोकशाही आणि लोकसंवादाचे अद्भुत उदाहरण पाहायला मिळते. शेकडो गावांतील मांझी, चालकी आणि अन्य प्रतिनिधी ‘मुरिया दरबारा’त आपली मते मांडत असत. परिसराशी संबंधित प्रश्नांवर सखोल चिंतन आणि विचारविनिमय करण्याची ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. येथे संपूर्ण समाज एकमेकांना पूरक ठरतो.
भारताच्या कानाकोपर्यात अशी अनेक उदाहरणे आढळतात. फरक इतकाच की, भारताने केवळ लोकशाहीच्या नावाचा गजर केला नाही, तर लोकशाही आपल्या जीवनात उतरवली. मात्र, वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून मद्यपान आणि विलासी जीवनात रमणारे तथाकथित अभ्यासक, अकादमिक क्षेत्रातील मंडळी आणि कल्पित इतिहास रचणारे इतिहासकार हे वास्तव समजू शकणार नाहीत.
आपल्या आदिवासी बांधवांकडे विशिष्ट दृष्टिकोनातून पाहणार्या आणि ‘आदिवासी हिंदू नाहीत’ असे सांगणार्या लोकांनी ७५ दिवस चालणारा ‘बस्तर दसरा’ पाहावा. बस्तर दसर्याच्या आयोजनात आदिवासी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पारंपरिक रीतिरिवाज आणि श्रद्धांचे ज्या काटेकोरपणे आदिवासी समाज पालन करतो, त्याच्या सहस्रांशाइतकेही पालन आपण करू शकत नाही. हिंदुत्वाचे हेच विराट स्वरूप आहे.
जातपात, विविध वाद आणि अन्य विषारी विचारांच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र रचणार्यांनी बस्तर दसर्याच्या संपूर्ण आयोजनात भेदभावाची एक तरी घटना शोधून दाखवावी. बस्तर दसर्याच्या काळात सर्व समाजांतील लोक श्रद्धा आणि परंपरांच्या रंगांत रंगून जातात. आनंदाने धार्मिक विधी पार पाडतात. सांगण्याचा आशय इतकाच की, आता बस्तरमध्ये दारुगोळ्याचा वास नाही. त्याऐवजी निसर्ग, संस्कृती, परिवर्तन आणि विकासाची नवी चेतना तेथे संचारत आहे.
एकदा विचार करा- केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार नसते, तर देशातून माओवादी दहशतवाद संपविणे शय झाले असते का? आज बस्तरमध्ये जी सकारात्मक दृश्ये पाहायला मिळत आहेत, ती कधी प्रत्यक्षात आली असती का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने स्वतःला एकदा तरी नक्की विचारावीत.
(लेखक साहित्यिक, स्तंभलेखक आणि छत्तीसगढमध्ये पत्रकार आहेत.)
लेखक- कृष्णमुरारी त्रिपाठी अटल