‘एआय’ एक मृगजळ?

    29-Oct-2026


AI Investment Bubble

 
प्रत्येक तंत्रज्ञान क्रांती एक आर्थिक भ्रमही जन्माला घालते. या नवतंत्रज्ञानाची क्षमता अमर्याद मानली जाते आणि त्याच्या नावाने उभ्या प्रत्येक व्यवसायाचे भविष्यही. इंटरनेटच्या काळात हेच घडले. आता ‘एआय’च्या बाबतीतही असेच घडते आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण, चीनमध्ये ‘एआय’ कंपन्यांच्या समभागांत गेल्या काही महिन्यांत मोठी घसरण झाली. हा केवळ चिनी बाजाराचा प्रश्न नसून, जागतिक भांडवलाच्या विवेकाचा प्रश्न आहे. चीनच्या ‘एसटीएआर-५०’ निर्देशांकाने या चार महिन्यांत सुमारे ४० टक्के मूल्य गमावले असून, जवळपास ४८० अब्ज डॉलरचे बाजारमूल्य नाहीसे झाले आहे. चीनचा ‘सीएसआय-३००’ निर्देशांकही जूनच्या उच्चांकापासून सुमारे २० टक्क्यांनी घसरला. ‘एआय’विषयीचा जागतिक आशावाद अद्याप कायम असला; तरीही त्या आशावादावर वाढलेल्या समभागांच्या किमती आता दबावाखाली येताना दिसत आहेत. चीन त्याचेच उदाहरण! तंत्रज्ञानाचे भविष्य आणि त्याच्या कंपन्यांचे बाजारमूल्य यांची गल्लत करणे, हा बाजाराचा जुनाच आजार. इंटरनेटने जग बदलले; पण त्याच्या नावे उभ्या अनेक कंपन्या इतिहासजमा झाल्या. तंत्रज्ञान खोटे नव्हते; त्यातून प्रत्येक गुंतवणूकदार श्रीमंत होईल, हा समज खोटा ठरला. ‘एआय’विषयी याच पुनरावृत्तीचा धोका आहे.
 
चीनच्या बाजारात ‘एआय’शी संबंधित समभागांचा वाटा सुमारे ४२ टक्के, तर व्यवहारांमध्ये ५७ टक्के होता. गुंतवणूकदारांनी भविष्यातील प्रचंड मागणी गृहीत धरली; पण त्यातून किती उत्पन्न मिळेल, याची खात्री नव्हती. ‘युनिट्री’ या रोबोटनिर्मिती कंपनीचे समभाग सूचीबद्ध झाल्यावर काहीच काळात निम्म्यावर आले. ‘मेटाएस’ आणि ‘मूर थ्रेड्स’ या चिपनिर्मात्या कंपन्यांनाही मोठी घसरण सोसावी लागली. या घसरणीमागे केवळ बाजारातील अतिआशावाद नाही, तर ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या अर्थकारणात होणारे बदलही आहेत. अमेरिकेने ‘एआय’ प्रारूपांमध्ये मक्तेदारी सांगण्याच्या काळातच, चीनने ‘डीपसीक’ हे प्रारूप जगासमोर आणले. यातून तुलनेने कमी खर्चात सक्षम ‘एआय’ विकसित करण्याची शक्यता जगाला दिसल्याने अमेरिकेच्या तंत्रज्ञानवर्चस्वाला एकप्रकारे आव्हान मिळाल्याची चर्चा सुरू झाली. पण, या यशाचा दुसरा अर्थही होता. ‘एआय’ विकसित करण्याचा खर्च कमी होऊ शकत असेल, तर त्यातून शेकडो अब्ज डॉलर खर्च करणार्‍या कंपन्यांचे आर्थिक गणितही बदलण्याचा धोका समोर होता. तंत्रज्ञान स्वस्त होणे ग्राहकांसाठी लाभदायकच. मात्र, त्यातून कंपन्यांचा नफा वाढेलच असे नाही.
 
चीनमधील ही घसरण अमेरिकेसाठीही इशारा आहे. ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘गुगल’, ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘मेटा’सारख्या कंपन्या डेटा सेंटर, चिप्समध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहेत. आज क्षमता उभारली नाही, तर उद्याचा बाजार गमवावा लागेल, हा त्यामागचा तर्क. पण, सर्वांनीच मोठी क्षमता उभारली आणि मागणी त्या वेगाने वाढलीच नाही, तर काय? याचा विचार होताना दिसत नाही.
 
चीनची ताकद केवळ स्वस्त श्रमच नाही; त्याचे औद्योगिक जाळेही आहे. ‘एआय’ आणि ‘रोबोटिस’मुळे उत्पादन क्षमता वाढू शकते. पण, यातून पुरेशी बचत झाली नाही, तर तंत्रज्ञानाचे आर्थिक औचित्य कंपन्यांना सिद्ध करावे लागेल. यातून एक संशय पुढे येतो, तो म्हणजे चीनमधील घसरण हा अमेरिकेविरुद्धचा रणनीतिक डाव आहे का? ‘एआय’मधील गुंतवणूक फुगलेली असल्याची धारणा निर्माण झाली, तर अमेरिकी कंपन्यांच्या खर्चाच्या धोरणावरच प्रश्न उपस्थित होतील. याचा राजनैतिक लाभ चीन नक्कीच घेऊ शकतो. चीनची आजवरची धोरणे बघता, चीन नक्कीच अशी चाल खेळू शकतो.
 
मात्र, सगळ्याकडे पाहताना ‘एआय’च्या नावे केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीचे भविष्य उज्ज्वल असेलच असे नाही, हे अधोरेखित होते. इंटरनेटच्या काळात काही कंपन्या कोसळल्या, काही टिकल्या आणि काहींनी अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलले. ‘एआय’चा दीर्घकालीन प्रभाव आणि आजच्या गुंतवणुकीच्या मूल्यांकनांची वेगळी परीक्षा होईलच. तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत मोठे प्रारूप कोण तयार करतो, एवढेच निर्णायक ठरणार नाही. त्यातून उत्पादनक्षमता किती वाढते, ग्राहक त्यासाठी किती पैसे मोजतो आणि गुंतवलेल्या भांडवलातून किती शाश्वत उत्पन्न निर्माण होते, हेही महत्त्वाचे ठरेल. चीनच्या बाजाराने हा प्रश्न उपस्थित केला आहे; अमेरिकेलाही नजीकच्या भविष्यात त्याचे उत्तर द्यावे लागेल.
 
लेखक- कौस्तुभ वीरकर
 




संबंधित मजकूर