मणिपूरमधील पीडित कुटुंबांना संघ, सेवा भारतीचा मदतीचा हात

    28-Oct-2026   

Manipur Violence Victims Aid
 
मुंबई (Manipur Violence Victims Aid) : मणिपूरमध्ये हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा समिती मणिपूर आणि सेवा भारती मणिपूर यांच्या वतीने रविवारी आर्थिक मदत देण्यात आली. कुकी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात लाकूड गोळा करणाऱ्या तीन मजुरांची हत्या झाल्याच्या घटनेनंतर ही मदत करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मणिपूर प्रांताचे कार्यवाह शिजागुरुमायुम तरुणकुमार शर्मा आणि ज्येष्ठ प्रचारक लैशराम जत्रा सिंह यांच्या नेतृत्वाखाली ३० जणांच्या पथकाने इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील नोंगशुम येथे जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अरुबम रोनिल मेतेई, लैरेनलाकपम इनाओबी सिंह आणि क्षेत्रीमायुम सुशील सिंह यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.  (Manipur Violence Victims Aid)
 
या भेटीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा समिती मणिपूर आणि सेवा भारती मणिपूरच्या प्रतिनिधींनी पीडित कुटुंबीयांच्या मुलांना बारावीपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. कुटुंबीयांनी ही मदत स्वीकारल्यास त्यांना ही शैक्षणिक सुविधा पुरवण्यात येईल, असे पथकाने सांगितले. ३ मे २०२३ रोजी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मणिपूर प्रांत, सेवा भारती मणिपूर आणि मणिपूर सेवा समिती हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करत आहेत.  (Manipur Violence Victims Aid)
 
याशिवाय, हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांना मणिपूरमध्ये तसेच राज्याबाहेरील विविध शाळांमध्ये निवासी स्वरूपात मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या विस्थापित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश आणि शिकवणी वर्गांची सुविधाही पुरवण्यात आली आहे. तसेच, हिंसाचारग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि वैद्यकीय शिबिरांचे आयोजनही करण्यात आले आहे.  (Manipur Violence Victims Aid)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर