कपिल देशपांडे
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘रामायण’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, चित्रपटाच्या भव्यतेइतकीच चर्चा त्याच्या तिकिटांच्या दरांचीही होत आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या काही प्रीमियम IMAX 3D शोसाठी तिकिटांचे दर तब्बल ३,१७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 5 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
विशेष म्हणजे, मुंबईतील लोअर परळ येथील PVR ICON: Phoenix Palladium या चित्रपटगृहातील निवडक शोसाठी रिक्लायनर सीटचे दर तीन हजार रुपयांपेक्षा अधिक आहेत. हे दर पाहता चित्रपटाचा मोठ्या पडद्यावरील भव्य अनुभव घेणे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी महागडे ठरण्याची शक्यता आहे.
‘रामायण’च्या तिकिटांच्या दरांमध्ये शोची वेळ आणि आसनाच्या प्रकारानुसार मोठी तफावत दिसून येत आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, मुंबईतील Phoenix Palladium येथील निवडक IMAX 3D शोसाठी रिक्लायनर सीटचे दर पुढीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत.
सकाळी ७ वाजताच्या शोसाठी – १,८५० रुपये
दुपारच्या शोसाठी – २,५७० रुपये
संध्याकाळच्या शोसाठी – ३,१७० रुपये
रात्री ११ वाजताच्या शोसाठी – २,७७० रुपये
हीच स्थिती मुंबईतील इतर चित्रपट गृहांची पण आहे. मुंबई ठाण्यातील काही चित्रपटगृहात 2500, 2000, 1500 रुपयांपर्यंत तिकीट दर आहेत. सध्या चित्रपट गृहात आहे तब्ब्ल 500 रुपयांपर्यंत तिकीट दर आहेत.
मोठ्या बजेटचा, भव्य दृश्यांचा आणि दमदार कलाकारांचा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. मात्र, एका तिकिटासाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने चित्रपट पाहणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य लोकांना ऐन सणासुदीच्या दिवसात एवढ्या मोठ्या दराने तिकीट खरीदणे अजिबात परवडणारे नाही.
आजच्या काळात चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर मोठ्या पडद्यावर दृश्यात्मक अनुभव घेण्याचे माध्यमही बनले आहे. विशेषतः पौराणिक कथा, भव्य युद्धदृश्ये, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोठ्या कलाकारांचा सहभाग असलेल्या चित्रपटांसाठी प्रेक्षक IMAX आणि 3Dसारख्या पर्यायांना पसंती देतात.
‘रामायण’सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडूनही प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर नेत्रदीपक अनुभवाची अपेक्षा आहे. मात्र, एका व्यक्तीच्या तिकिटासाठी तीन हजार रुपयांहून अधिक खर्च करावा लागणार असेल, तर कुटुंबासह चित्रपट पाहण्याचा खर्च आणखी वाढू शकतो.
उदाहरणार्थ, चार जणांच्या कुटुंबाने प्रत्येकी ३,१७० रुपये दराने तिकिटे घेतल्यास केवळ तिकिटांसाठी १२,६८० रुपये खर्च होतील. यामध्ये प्रवास, खाद्यपदार्थ आणि इतर खर्चांचा समावेश नाही. त्यामुळे प्रीमियम शोचा अनुभव घेण्यापूर्वी प्रेक्षकांना आपलं बजेट बघावा लागेल.
तिकिटांचे दर चर्चेत असले, तरी ‘रामायण’विषयीची उत्सुकताही लक्षणीय आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. हा दोन भागांतील चित्रपट प्रकल्प असून, पहिल्या भागाच्या प्रदर्शनाकडे भारतीय चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.