दि. २६ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी ‘जम्मू-काश्मीर विलय दिन’ म्हणून साजरा केला जातो. कारण, १९४७ साली याच दिवशी महाराजा हरी सिंग यांनी भारतीय संघराज्यात जम्मू आणि काश्मीरच्या विलिनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. या ऐतिहासिक घटनेला ७९ वर्षे उलटल्यानंतर अजूनही काही देशविरोधी शक्ती काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी फुटकळ प्रयत्न करताना दिसतात. असाच एक प्रकार नुकताच दिल्लीतील ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठामध्ये निदर्शनास आला. तिथे ‘फ्री-काश्मीर’च्या घोषणा आणि भारतविरोधी घोषणांनी भिंती रंगविल्या गेल्या. त्यामुळे अशा देशविरोधी शक्तींचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.
राजधानी दिल्लीतील ‘जामिया मिलिया इस्लामिया’ या विद्यापीठामध्ये ‘भारतमाता की जय’ किंवा ‘वन्दे मातरम्’ या घोषणा दुमदुमल्या नसतील. पण, ‘जामिया’मध्ये नेहमी ‘काश्मीरमुक्ती’च्या घोषणा, भारताच्या विरोधातील घोषणा ऐकण्यास आणि तेथील भिंतींवर वाचण्यास मिळतात. सदर विद्यापीठातील अशा देशविरोधी कृत्यांबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आवाज उठवला आहे. या देशद्रोही प्रकाराबद्दल ‘अभाविप’ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारांची विद्यापीठ प्रशासनाने निष्पक्ष आणि विशिष्ट कालमर्यादेत चौकशी करावी, पुराव्यांच्या आधारे असे प्रकार करणारे कोण आहेत त्यांचा शोध घ्यावा आणि अशा घटनांना जबाबदार असलेल्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ‘एफआयआर’ नोंदवावा, अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे. विद्यापीठात विद्यार्थी संघटनांना पुन्हा कार्य करण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी ‘जामिया’मध्ये आंदोलन सुरू आहे. त्यादरम्यान, भारतविरोधी आणि काश्मीरमुक्त करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. तेथील भिंतींवर लिहिल्या गेल्या.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसंदर्भातील मागण्यांबाबत आंदोलने लोकशाही मार्गाने चालली पाहिजेत. तसेच विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांसंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्यामध्ये लक्ष घातले पाहिजे. त्याच वेळी राष्ट्रीय ऐक्यास बाधक, जातीय सलोखा बिघडविणार्या घटना घडत असतील; तर अशा घटनांचा विद्यापीठ प्रशासनाने कठोरपणे बीमोड केला पाहिजे. अशा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ‘अभाविप’ने केली आहे. विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनेला पुन्हा परवानगी द्यायची की नाही, याबाबत विचार करण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमली, हे स्वागतार्ह पाऊल आहे. विद्यार्थ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी विद्यार्थी संघटना म्हणजे लोकशाहीने उपलब्ध करून दिलेला मंच आहे. पारदर्शकता ठेवून विद्यार्थ्यांच्या योग्य मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ‘अभाविप’ दिल्लीचे प्रदेश सचिव सार्थक शर्मा यांनी, विद्यार्थी संघटनेला पुन्हा अनुमती द्यावी, या मागणीस पाठिंबा दिला आहे. मात्र, ‘फ्री-काश्मीर’ आणि विद्यापीठ परिसरात ज्या देशद्रोही घोषणा लिहिल्या आहेत, त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राजधानीचे शहर असलेल्या नवी दिल्लीतील एका विद्यापीठात ‘फ्री-काश्मीर’च्या घोषणा दिल्या जातात, भारतविरोधी घोषणांनी भिंती रंगविल्या जातात, हे सर्व गंभीरपणे घ्यायला हवे. ‘जामिया’ आणि दिल्ली परिसरातील काही शिक्षणसंस्थांना ही जी भारतविरोधी कीड लागली आहे, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. तेथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यापीठ प्रशासन यांनी अशा प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठविला, तर वेळीच ही कीड नष्ट होऊ शकेल.
संघ गणवेश घालण्याचा उत्तम निर्णय : राजेन्द्रन
केरळम्मध्ये संघकार्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून, विविध राजकीय नेते संघाकडे आकृष्ट होत आहेत. केरळम् विधानसभेचे तीनवेळा आमदार राहिलेले आणि कट्टर मार्सवादी नेते एस. राजेन्द्रन यांना संघाचे महत्त्व लक्षात आले आणि ते विजयादशमी संचलनामध्ये संघाच्या पूर्ण गणवेशात सहभागी झाले. राजेन्द्रन यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्या जुन्या डाव्या सहकार्यांनी नाराजी व्यक्त केली. पण, राजेन्द्रन हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. "आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश परिधान करून संचलनात सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला, तो अत्यंत योग्य आणि माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट निर्णयांपैकी एक होता,” असे एस. राजेन्द्रन यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्यावर ज्या डाव्या नेत्यांनी टीका केली, त्यांना आधी आपले घर ठाकठीक करण्याचा सल्ला राजेन्द्रन यांनी दिला.
एस. राजेन्द्रन हे देवीकुलम विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार. विजयादशमीच्या दिवशी 'केरळम्'मधील विविध ठिकाणी मोठ्या संख्येने पथसंचलने काढण्यात आली होती. त्यामध्ये पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशाच एका संचलनात माजी मार्सवादी आमदार एस. राजेन्द्रन संघाच्या पूर्ण गणवेशात उपस्थित होते. राजेन्द्रन यांनी देवीकुलम मतदारसंघाचे १५ वर्षे प्रतिनिधित्व केले होते. नंतर मार्सवादी पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला. "कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून भिजत पडलेल्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांनी लक्ष दिले नाही. तुम्ही आयुष्यभर कंठशोष करून घोषणा देत राहा; पण भाजप वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाकडे यावर योग्य उपाय असल्याचे आपणास वाटत नाही,” असे राजेन्द्रन यांनी म्हटले आहे.
"भारताच्या राजकीय मंचावर सातत्याने भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘डावी विचारसरणी व्यवहारात आणण्यावर खूप मर्यादा आहेत,” असेही ते म्हणाले. "संघाचा गणवेश परिधान केल्याबद्दल आपणास मुळीच वाईट वाटत नाही. अनेक वर्षांच्या अनुभवाने माझा निर्णय आधीच परिपक्व झाला होता,” असे ते म्हणाले. प्रदीर्घ काळ डाव्या पक्षात राहिलेले एस. राजेन्द्रन यांनाही अखेर उपरती झाली आणि त्यांनी डाव्या पक्षास रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. विजयादशमीच्या दिवशी संघाचा पूर्ण गणवेश परिधान करून ते संचलनात सहभागी झाले.
म्युनिकमध्ये ‘भारत प्रथम’साठी निदर्शने!
जर्मनीमधील म्युनिक शहरातील भारतीय नागरिकांनी अलीकडेच ‘भारत प्रथम’ हा मुद्दा पुढे ठेवून निदर्शने आयोजित केली होती. गेल्या दि. २४ ऑक्टोबर रोजी म्युनिकमध्ये शांततापूर्ण निदर्शने केली. भारतामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या मोदी सरकारला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी जर्मनीतील भारतीयांनी या शांततापूर्ण निदर्शनांचे आयोजन केले होते. ‘एनआरआय फॉर भारत राईज’ या संघटनेच्या वतीने या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. विदेशात जो भारतविरोधी विमर्श पसरविला जात आहे, त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे रक्षण, भारतात होत असलेले लोकशाही मूल्यांचे रक्षण, तसेच भारताने केलेला विकास या गोष्टी आंतरराष्ट्रीय जनसमुदायाच्या लक्षात आणून देण्यासाठी या निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या निदर्शनात भारतीय व्यावसायिक, विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निदर्शनासाठी संपूर्ण जर्मनीतून भारतीय म्युनिकमध्ये आले होते. १४० कोटी भारतीयांनी लोकशाही मार्गाने जी निवड केली आहे, त्या निर्णयाचा मान राखला पाहिजे, असे या निदर्शकांनी आवाहन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची जी नकारात्मक प्रतिमा निर्माण केली जात आहे, त्यास सर्व शक्तिनिशी विरोध करण्याचा निर्धार निदर्शकांनी व्यक्त केला. भारतीय राजकीय व्यवस्था, आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय हिताच्या संदर्भात जे चुकीचे विमर्श पसरविले जात आहेत, त्यास उत्तर देण्यासाठी या ‘भारत प्रथम’ निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. काही व्हिडिओच्या माध्यमातून जो भारतविरोधी अपप्रचार केला जात आहे, त्यास या निदर्शनांच्या द्वारे उत्तर देण्यात आले. या फुटकळ व्हिडिओमधून व्यक्त होणारी मते, ही काही संपूर्ण विदेशस्थ भारतीयांची मते नाहीत, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. विदेशात राहून जे भारतातील घटनांबद्दल भाष्य करतात, ते भारताचे प्रतिनिधित्व करतात, असे समजता कामा नये, हेही निदर्शकांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. या निदर्शनात सहभागी झालेल्या विदेशस्थ भारतीयांनी येणार्या-जाणार्या जर्मन नागरिकांशी संवाद साधून भारतात नेमके काय वातावरण आहे, हे सांगितले आणि भारताबद्दल चुकीचा विमर्श कसा पसरविला जात आहे, हे लक्षात आणून दिले. विविध फलक आणि ‘तिरंगा’ राष्ट्रध्वज घेऊन भारतीय या निदर्शनात सहभागी झाले होते.
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२