कर्जतच्या भरपाईमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला बळ

साईडोंगर पम्प स्टोरेज प्रकल्पाच्या भरपाईचे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात वर्ग करण्याचे निर्देश

    28-Oct-2026

 

Saidongar Pumped Storage Project



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कर्जतच्या साईडोंगर पम्प स्टोरेज प्रकल्पाच्या उपाययोजनेअंतर्गत विकासक कंपनीने वन विभागाला सुपूर्द केलेले खासगी क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वर्ग करण्याची चर्चा राज्य वन्यजीव मंडळात पार पडली (Saidongar Pumped Storage Project). नुकत्याच पार पडलेल्या मंडळाच्या बैठकीत पाटण तालुक्यात कंपनीकडून देण्यात आलेल्या पर्यायी क्षेत्राची तपासणी करुन ते क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले (Saidongar Pumped Storage Project). हे पर्यायी क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला लागूनच असून त्याठिकाणी वाघाचा वावर आहे (Saidongar Pumped Storage Project). त्यामुळे हे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात वर्ग होणे गरजेचे असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी मांडले आहे. (Saidongar Pumped Storage Project)

 

कर्जत येथे साईडोंगर पम्म स्टोरेज प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनक्षेत्र वळते करण्यात आले आहे. म्हणून भरपाई योजनेअंतर्गत या प्रकल्पाच्या विकासक कंपनीने प्रतिकरात्मक वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरणाला (कॅम्पा) ३२६ लाख रुपये हे वन्यजीव आणि जैवविविधता व्यवस्थापनाकरिता दिले आहेत. याखेरीच पाटण तालुक्यातील २५२ हेक्टर खासगी क्षेत्र विकत घेऊन सातारा वन विभागाकडे वर्ग केले आहे. कऱ्हाड चिपळूण महामार्गाजवळील घाटमाथा परिसरातील केमसे आणि ढाणकल येथील खासगी जागा ही वन विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. केमसे येथील १९६ हेक्टर आणि ढाणकल येथील ५५ हेक्टर क्षेत्र हे सातारा वनविभागाला देण्यात आले आहे. हे सर्व क्षेत्र खासगी मालकीचे होते. मात्र, ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात येते होते. त्यामुळे हे खासगी क्षेत्र वन विभागात वर्ग करणे आवश्यक होते.
या २५२ हेक्टरवरील पर्यायी क्षेत्रावर ०.७ घनता असलेले सदाहरित वनक्षेत्र आहे. हे क्षेत्र व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असल्याने ते व्याघ्र प्रकल्पात वर्ग करणे आवश्यक होते. त्याविषयीची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. २६ आॅक्टोबर रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत झाली. दै. मुंबई तरुण भारतचे संपादक आणि मंडळाचे सदस्य किरण शेलार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर याची तपासणी करुन हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वर्ग करण्याचे निर्देश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. यासंबंधी विकासक कंपनीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार त्याठिकाणी ७० हजार झाडे नैसर्गिकरित्या असून ३० हजार झाडांची लागवड केली जाणार आहे.

तांत्रिक बाबी तपासून निर्णय
सध्या सातारा वन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या या क्षेत्रात एसटीआर-टी०३ या म्हणजे बाजी नामक वाघाचा वावर असून हा संपूर्ण प्रदेश सह्याद्री व्याघ्र भ्रमणमार्गातील महत्वाचा परिसर आहे. त्यामुळे यासंबंधी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या क्षेत्राची तांत्रिक तपासणी करुन ते क्षेत्र व्याघ्र प्रकल्पात विलिन करण्याचा निर्णय घेण्यात येईल.




संबंधित मजकूर